Gomantak Editorial : संकटे अटळ, जबाबदार कोण?

पंचायती असोत वा शहरे, पावसाच्‍या पाण्‍याचा निचरा होण्‍याची व्‍यवस्‍था पूर्णतः कोलमडली आहे. ती सुधारण्‍यासाठी ठोस प्रयत्‍न यंदाही दिसलेले नाहीत.
Minister Nilesh Cabral And Mayor rohit  Monserrate
Minister Nilesh Cabral And Mayor rohit Monserrate Dainik Gomantak

पा वसाळ्यातील आपत्तींसाठी यंत्रणा सज्‍ज असल्‍याची मुख्‍यमंत्र्यांची घोषणा तेवढी वेळेत झाली आहे. आकस्मिक आलेल्‍या संकटालाच ‘आपत्ती’ म्‍हणतात हे बहुदा प्रशासनाच्‍या ध्‍यानी नसावे. वेळेचे जराही भान नसलेल्‍या बेदरकार प्रशासन आणि मुजोर ठेकेदारांनी विकासकामांच्‍या सबबीखाली जागोजागी जो घोळ करून ठेवला आहे, तो निस्‍तरण्‍यातच आपत्ती यंत्रणेची सर्वाधिक ताकद खर्च होईल, यात संदेह नसावा.

मार्ग नूतनीकरणाचा ठेका मिळाल्‍यानंतर डांबर पडण्‍याची खोटी; नवा रस्‍ता म्‍हणेपर्यंत कुठल्‍यातरी भूवाहिन्‍यांसाठी तो खोदायला सुरुवातही होते. आजूबाजूला ना सूचना फलक ना काही विधिनिषेध. स्‍मार्टसिटी पणजीची अवस्‍था तर भयावह आहे. पावसाळ्यात ओढवणाऱ्या स्‍थितीविषयी कल्‍पनाच न केलेलीच बरी.

एकंदरीत खोदकामे 15 मेपर्यंत पूर्ववत करण्‍याचा प्रघात आहे. तसे झाले तरच पावसापूर्वी मानवनिर्मित चुकांमुळे होणारी हानी टाळता येते. यंदा कामे पूर्णत्‍वाची कालमर्यादा पंधरा दिवसांनी पुढे गेली आहे. परिणामी विदारक समस्‍यांचा काला अटळ आहे. त्‍याची जबाबदारी कोण घेणार, हे देखील मुख्‍यमंत्र्यांनी जाहीर करावे.

आपत्ती व्यवस्थापन योजनेची आखणी प्रामुख्‍याने तीन भागांत होते. ‘आपत्ती प्रतिबंध’ हा मुद्दा त्‍यात अति महत्त्वाचा. त्‍याद्वारे संभाव्य आपत्तींचे वर्गीकरण तसेच जोखमीचा अंदाज घेतला जातो. किती नागरिक प्रभावित होतील, याबाबतचा ठोक आराखडा तयार केला जातो.

कळीचा मुद्दा ठरलेल्‍या राजधानी पणजी संदर्भात तसा अदमास घेतला आहे का? नसेल तर आपण सरकारने केवळ आपत्तीसज्जतेची ग्‍वाही दिली आहे, असाच त्‍याचा अर्थ होतो. पणजीत ठेकेदारांसह प्रशासनाने कमालीची बेफिकिरी बाळगली आहे.

जागोजागी खोदलेले रस्‍ते, सोबत धुळवड आणि सांडपाण्‍याने वैतागलेल्‍या नागरिकांना पावसाळा कसा जाईल, याची चिंता आहे. ‘मलनिस्‍सारण’साठी खोदलेले खड्डे तूर्त डांबर टाकून बुजवले जातील खरे; परंतु पावसाळ्यात रस्‍ते खचतील, हे सांगायला कुणा तज्‍ज्ञाची गरज नाही. ‘मलनिस्‍सारण’ तसेच ‘जल’वाहिन्‍या फुटण्‍याचा आणि सांडपाण्‍याचा नागरिकांना पुरवठा होण्‍याचीही दाट संभावना आहे.

बेमुर्वत प्रशासनाची परिणती म्‍हणून गंभीर अपघात घडल्‍यास, कोणी जायबंदी झाले वा प्राणहानी झाली तर त्‍याला जबाबदार कोण? ‘आपत्तीचे उपशमन’ अर्थात आपत्ती उद्भवू नये याकरता काही ठोस उपाययोजना केलेल्‍या कुठेच दिसत नाहीत. बांधकाममंत्री काब्राल स्‍पष्‍टवक्‍ते आहेत. पणजीतील स्‍थिती पाहून तेही चक्रावले असावेत.

‘मलनिस्‍सारण’च्‍या मुद्यावर त्‍यांनी ‘जीसूडा’च्‍या ढिसाळपणाकडे अंगुलिनिर्देश केला आहे. नागरिकांना त्रास सहन करावा लागेल, हा त्‍यांचा मुख्‍यमंत्र्यांसाठीही सूचक इशारा ठरतो.

राजधानीला स्‍मार्ट करताना दर्जा राखण्‍याची जबाबदारी ‘इमॅजिन पणजी’वर होती. राज्‍याचे मुख्‍य सचिव त्‍याचे चेअरमन. जिल्‍हाधिकारी, आमदार, महापौर सदस्‍य आहेत. तरीही राजधानीची युद्धभूमी होते आणि मुख्‍यमंत्री त्‍याकडे दुर्लक्ष करतात, हेच आम्‍ही पाहत आलो आहोत.

दुर्दैवाने कारवाईचे इशारे बहुत झाले, प्रत्‍यक्ष कृती दिसत नाही. शब्‍दाला धार असती तर एव्‍हाना कंत्राटदारांवर गुन्‍हे दाखल झाले असते. जी कामे महिनोन् महिने नियंत्रणात आली नाहीत, पुढील पंधरा दिवसांत पूर्ण आटोक्‍यात आणणे म्‍हणजे मलमपट्टीपेक्षा काही निराळे नसेल.

शिवोलीत खोदकाम केलेल्‍या रस्‍त्‍यामुळे दुचाकी अपघात होतो, कुडचडे पालिका क्षेत्रात रस्‍त्‍यांत ट्रक रुततात; काणकोणातही रस्‍ता खचून अवजड वाहने कलंडतात, ही माजलेल्‍या ठेकेदारांची किमया आहे. त्‍यांना न आवरता आपत्ती नियंत्रणाच्‍या घोषणा म्‍हणजे ‘आ बैल मुझे मार’.

राज्‍यात खाजन भागात भराव टाकून बांधकामे वाढत आहेत. त्‍यावर कुणाचे नियंत्रण नाही. त्‍यामुळे समुद्र पातळी वाढत आहे. हल्‍लीच्‍या काळात पावसाचे चक्र बदलत आहे. प्रारंभी जून कोरडा जातो, जुलैच्‍या उत्तरार्धात पाऊस वेग घेतो आणि अनेकदा चार महिन्‍यांचे एकूण पर्जन्‍यमान केवळ दीड महिन्‍यात पूर्ण होते. त्‍याचा विपरीत परिणाम नागरी जीवनावर होतो. अशावेळी शहरांना तळ्यांचे स्वरूप प्राप्‍त होत आहे.

पंचायती असोत वा शहरे, पावसाच्‍या पाण्‍याचा निचरा होण्‍याची व्‍यवस्‍था पूर्णतः कोलमडली आहे. ती सुधारण्‍यासाठी ठोस प्रयत्‍न यंदाही दिसलेले नाहीत. गाळाने भरलेली गटारे, नाले स्‍वच्‍छतेच्‍या कामांत बहुतांश पालिका पिछाडीवर आहेत. पाण्‍याचा निचरा होण्‍याची व्‍यवस्‍थाच खिळखिळी बनल्‍याने पूरजन्‍य स्‍थितीचा सामना करावा लागतो.

तिळारीचे पाणी कधी सोडतात, याचा गोवा सरकारला पत्ता नसतो. त्‍यातून नागरिकांची तारांबळ उडते. यंदा असा प्रकार टळावा ही अपेक्षा. पावसाळा १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मान्‍सून सुरू झाल्‍यानंतर कामे करता येणार नाहीत. आपत्ती व्‍यवस्‍थापनाची व्‍याख्‍या व्‍यापक आहे. सज्‍जता असणे नक्‍कीच चांगले; परंतु लक्षात घ्‍या, ‘प्रिव्‍हेन्‍शन ईज बेटर दॅन क्‍युअर’!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com