''उठा उठा दिवाळी आली मोतीस्नानाची वेळ झाली..!’ ही जाहिरात टीव्हीवर झळकू लागली की आपल्याला दिवाळी जवळ आल्याची आठवण करून देते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वेध लागतात ते दिवाळीचे, गोड धोड फराळाचे, आकाशकंदील बनविण्याचे व अंगणात सुंदर रांगोळी काढण्याचे... यावर्षी कोरोनामुळे सगळीकडे उत्साह जरा कमी दिसत असला तरीही परंपरेनुसार आणि पारंपारिक पध्दतीनेच दिवाळी सण साजरा करण्यावर सगळ्यांनी भर दिला पाहिजे.
दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव… रोषणाई! दिवाळी म्हणजे आनंदाचा सण हे ''दिवाळी'' या शब्दातच आपल्याला दिसून येते . म्हणूनच तर म्हणतात “दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा!” दिवा किंवा दीप हा अंधाराला दूर करून प्रकाश निर्माण करतो आणि म्हणूनच मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच कारणामुळे दीपावलीच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधःकार दूर व्हावा म्हणून दीपोत्सव किंवा दिवाळी सण साजरा केला जातो.
दिवाळी साजरी करण्यासाठी प्रत्येकजण उत्साहित असतो. नवीन कपडे खरेदी करून परिधान करण्याचा आनंद सर्वांनाच असतो. ज्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवले तोच दिवस म्हणजे ''नरक चतुर्दशी'' होय. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे अंगाला उटणे, तेल लावून अभ्यंगस्नान केले जाते व आपण दिवाळीस प्रारंभ करतो! आश्विन अमावस्येला भक्तिभावाने लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. विशेषतः व्यापारी मंडळी हा दिवस फार उत्साहात साजरा करतात. त्यानंतरचा दुसरा दिवस म्हणजेच कार्तिक महिन्यातील पहिल्या दिवशी पाडवा असतो, त्यास बलिप्रतिपदा असेदेखील म्हटले जाते. पाडव्याच्या दिवशी काही लोक सोनं खरेदी करतात, तर काही घरात नवीन वस्तू विकत आणतात. त्यानंतर येतो तो भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा दिन, म्हणजेच भाऊबीज. त्या दिवशी बहीण आपल्या भावाची आरती ओवाळून , त्याचे आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीचे होवो अशी प्रार्थना करते.
आपल्या गोव्यात नरकचतुर्दशीच्या दिवशी तुळशीच्या समोर उभे राहून ''गोविंदा गोविंदा'' म्हणत ''कारिट'' नावाचे कडू फळ नरकासुर असल्याचे मानत पायाच्या अंगठ्याने चिरडले जाते. या दिवसाला गोव्यात ''धाकटी दिवाळी'' असे म्हणतात. फराळात अनेक पोह्यांचे प्रकार चाखायला मिळतात. गोडाचे फोव, तिखशे फोव, फोण्णे फोव, रोसातले फोव…. एवढेच नव्हे तर ह्या पोह्यांसोबत आंबाड्याची आंबट-गोड चटणी, वाटाण्याची उसळ.. ह्यांचाही समावेश असतो. पण आता दिवाळी म्हणजे ‘नरकासुर’ हेच गोव्यात दिवाळीचे मुख्य उद्दिष्ट झालेले आहे. नरकासुराची भव्य प्रतिमा करून, वाजत गाजत मिरवणूक काढली जाते व प्रतिमा स्पर्धेत उतरविल्या जातात आणि त्यानंतर भल्या पहाटे दहन केले जाते.
नरकासुराची भव्य प्रतिमा बनवून ती जाळली नही तर दिवाळीची काय मजा असे काही लोकांना वाटते. पण खरंतर दिवाळी हा सण एकदम पारंपरिक पद्धतीनेच दिव्यांची सर्वत्र रोषणाई करून साजरा केला तर त्यातच खरा आनंद आहे. आपली संस्कृती टिकून राहते आणि त्यातच आमचे कल्याण आहे.
सध्या कोरोनामुळे संपूर्ण जग दु:खाच्या काळोखात बुडून गेलेले आहे. अस्थिरता आणि असमंजसपणामुळे आपल्या जीवनातील प्रकाश पूर्णपणे नाहीसा झाला आहे. अशा परिस्थितीत, अपेक्षांचा आणि उत्साहाचा हा दिवा आपल्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा बनू शकतो. आपण हा दिवा आपल्यासाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी प्रकाशित केला पाहिजे. जेव्हा प्रत्येक घरात हा आनंदाचा दिवा पेटेल, तेव्हा त्याचा प्रकाश आपल्या देशाला, आम्हा सर्वांना शक्ती देईल, योग्य मार्ग दाखवेल.. आणि आपल्या जीवनात स्थिरता आणि आनंद पुन्हा येईल...!!
ही आनंदोत्सवाची , उत्साहाची , दिवाळी सर्वांच्या जीवनात खूप यश, आनंद , सुख आणि उत्साह देऊन जावो हीच शुभेच्छा!
दीपावलीच्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा !!!
- वर्णिता सुहास नाईक