अधिक वास्तववादी व्हा.. विधायक व्हा.....

दैनिक गोमन्तक
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

डॉ.सालिम अली यांनी आपल्या पक्षियात्रेत दुर्बिणीइतकेच लेखणीलाही महत्त्व दिले. जनमानसात पक्ष्यांविषयीचे कुतूहल वाढवून पर्यावरणविषयक जाणिवा प्रगल्भ करण्याच्या मोहिमेचा तो भाग होता.

डॉ.सालिम अली यांनी आपल्या पक्षियात्रेत दुर्बिणीइतकेच लेखणीलाही महत्त्व दिले. जनमानसात पक्ष्यांविषयीचे कुतूहल वाढवून पर्यावरणविषयक जाणिवा प्रगल्भ करण्याच्या मोहिमेचा तो भाग होता. "द मेटिंग ऑफ पॅराकिटस'' हा त्यांचा १ मार्च १९२७ मध्ये लिहिलेला अशा प्रकारचा पहिला लेख. खुमासदार व वेधक भाषा, नर्मविनोदाचा शिडकावा यामुळे शास्त्रीय माहिती देणारा लेख किती वाचनीय होऊ शकतो त्याचा हा उत्तम नमुना. त्यांचे शैलीतले लालित्य वाखाणण्यासारखे. "द मुघल  एम्पोरर्स ऑफ इंडिया ॲज नॅचरॅलिल्डस ॲण्ड स्पोर्टसमेन'' ही लेखमाला त्यांनी लिहिली. एका पक्षितज्ज्ञाने कला आणि इतिहास क्षेत्रात केलेला हा अनिरुध्द संचार स्तिमित करणारा आहे. कुठल्याही विषयाच्या मुळाशी जाऊन विचार करण्याची पध्दती. १९४१ मध्ये त्यांनी "द बुक ऑफ इंडियन बर्डस्‌'' हे पुस्तक लिहिले. ते अतिशय गाजले. या कामात त्यांची पत्नी तेहमिना हिने त्यांना खूप मदत केली. या पुस्तकाच्या अकरा आवृत्त्या निघाल्या. परिपूर्णतेकडे त्यांचा कटाक्ष होता.

पक्षिसर्वेक्षणावर आधारित त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. ‘बर्डस्‌ ऑफ कच्छ', ‘इंडियन हिल्‌ बर्डस', ‘द बर्डस ऑफ त्रावणकोर- कोचीन' व ‘द बर्डस ऑफ्‌ सिक्कीम' इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली. मुंबई परिसरातील पक्ष्यांवरही त्यांनी ‘द बर्डस् ऑफ बॉम्बे ॲण्ड सालसेट'  हे पुस्तक लिहिले. ‘पिक्‍टोरियल गाईड टू द बर्डस् ऑफ इंडिया ॲण्ड सब-कॉन्टिनेंट’,  या ग्रंथनिर्मितीसाठी त्यांनी अपार परिश्रम घेतले. पक्ष्यांचा मागोवा घेणारा अशा प्रकारचा सचित्र ग्रंथ नव्हता. ती उणीव या ग्रंथाने भरून काढली. "हॅण्डबुक ऑफ बर्डस ऑफ इंडिया ॲण्ड पाकिस्तान'' हा ग्रंथमाला प्रकल्प डॉ. सालिम अली यांनी १९६४मध्ये इंदिराजींच्या हस्ते प्रकाशित झाला. या सर्व खंडात भारतीय उपखंडात आढळणाऱ्या १२०० पक्षिजाती त्यांच्या २१०० उपजातींसह नोंदविल्या आहेत. त्यांची सर्वांगीण माहिती, ११३ उत्कृष्ट रंगीत चित्रे, रेखांकन, नकाशे, आकृत्या यामुळे हे खंड परिपूर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे भारतातील पक्ष्यांची स्थानिक नावे त्यांत नोंदविली आहेत. या खंडातील जमशेद पी. इराणी यांच्या कौशल्यपूर्ण चित्रांचा आवर्जून उल्लेख करायला हवा.

भारतीय पक्षीविज्ञानाला अधिकृततेची बैठक आणि संदर्भग्रंथाची जोड देण्याचे कार्य सालिम अली आणि रिप्ली या जोडगोळीने केले. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात या ग्रंथमालेला मान्यता मिळाली. हा दशखंडात्मक ग्रंथ हाताळणे अवघड झाल्यामुळे त्याची संक्षिप्त आवृत्ती प्रसिध्द करावी लागली. त्यांच्या पक्षिविषयक ग्रंथनिर्मितीबरोबरच त्यांचे "द फॉल ऑफ अ स्पॅरो'' हे आत्मचरित्रही गाजले.
या आत्मचरित्राचे काही गुणविशेष नोंदविणे आवश्‍यक आहे. यातील निवेदनशैली प्रत्ययकारी आहे. विनोदाचा आल्हाददायी शिडकावा त्यात आहे. निकटवर्तीयांची व्यक्तिचित्रे त्यांनी रेखाटली आहेत. आत्मप्रशंसा आणि आत्मश्‍लाघा यांचा मोह त्यांनी टाळलेला आहे. कोणाबद्दल कटुता न बाळगता प्राजंळपणे आपली जीवनकहाणी त्यांनी सांगितली आहे. त्यात कमालीची अलिप्तता आहे. पक्ष्यांचा अभ्यास हा त्यांच्या आयुष्याचा गाभा. मूलाधार तोच त्यांच्या आत्मचरित्राचा आलेख. रंजकता आणि वाचनीयता ही त्यांच्या लेखनाची प्रमुख वैशिष्ट्ये.

त्यांच्या लेखनाची एक विशिष्ट पध्दत होती. लेखन सुरू करण्यापूर्वी ते प्रथम संबंधित विषयाचे मुद्दे काढत. मग त्यांच्या आधारे पहिला मसुदा तयार व्हायचा. तो मसुदा आठवडा दोन आठवडे ते ठेवून देत. तोवर ते आपला विचार पक्का करत. मग नवा सुधारित मसुदा. हा मसुदाही दोन ओळीत तीन-तीन ओळीचं अंतर सोडून टंकलिखित करत. याचीही फेरतपासणी व्हायची. बाणाखुणांनी तो रंगायचा. प्रत्येक मुद्याचे नि मजकुराचे स्थान निश्‍चित व्हायचे. पुन्हा नव्याने टंकलेखन... ही निर्दोष प्रत छापखान्यात रवाना होण्यापूर्वीही सालिम अली त्यावर एक नजर टाकायला विसरत नसत.
हा त्यांचा परिपूर्णतेचा ध्यास त्यांच्या वयाच्या नव्वदीपर्यंत कायम राहिला. अनेक वर्षांपासून डॉ. सालिम अलींचे एक स्वप्न होते. हिमालयाच्या कुशीत, निसर्गाच्या सान्निध्यात एक छोटेसे घर बांधायचे. भोवताली सुंदर वनश्री, पक्षी, मनमुराद भ्रमंती आणि साथीला प्रगल्भ, तरल, प्रसन्न, खेळकर मनाची तेहमिना. त्यासाठीच त्यांनी डेहराडून निवडले. शिवाय तेथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या ग्रंथालयाचे त्यांना आकर्षण. तेथील वास्तव्यात डॉ. अलींनी हिमालयात पक्षिसर्वेक्षणे आणि निरीक्षण मोहिमा पार पाडल्या. डोंगरी लाव्याचा कसून शोध घेतला.

चार वर्षे सुखा-समाधानाची गेली. एका साध्याशा शस्त्रक्रियेत ९ जुलै १९३९ रोजी तेहमिनाचा मृत्यू झाला. सालिम अलींचे घरटे उन्मळून पडले. विलक्षण उदासीने त्यांना घेरले त्या स्थितीत ते मुंबईत परतले. मनाचे रितेपण घालविण्यासाठी परदेशातील पक्षिसर्वेक्षण हाती घ्यावे असे ठरविले. अनेक देशी-विदेशी संस्थांशी त्यांनी पत्रव्यवहार केला. पण त्यात त्यांना यश आले नाही.
शेवटी पक्षिनिरीक्षण आणि अभ्यास हाच त्यांनी आपला एकमेव छंद मानला. त्यातच विसावा शोधला.तेच त्यांच्या जगण्याचे प्रयोजन ठरले. मुंबईला बहिणीकडे तळमजल्याच्या स्वतंत्र खोलीत ते रहायला लागले.. सर्वत्र पुस्तकेच पुस्तके .. जमिनीवर पुस्तकांचे उंच चौथरे... पुस्तकांच्या गर्दीत डॉ. सालिम अली दिसतही नसत. त्यांचा व्यासंग असा अव्याहत चाललेला... नीरव शांततेचा भंग कोणी केला ते पाहायला ते एखाद्या चौथऱ्याकडून समोर येत.

डॉ. अली यांच्या पुस्तकांच्या संग्रहात एक जुन्या छायाचित्रांच्या अल्बमसचाही एक चौथरा असे. त्या जुन्या स्मृतींत ते रमत असत. भल्या पहाटे साडेचार-पाचलाच ते उठत. मग न्याहारी करून पक्षिनिरीक्षणासाठी ते बाहेर पडत. दुपारी बारापर्यंत त्यांची भ्रमंती चाले. शिस्तबध्द जीवन ते जगले. ते मिताहारी होते. त्यांच्या या दिनक्रमाचे साग्रसंगीत चित्रण या चरित्रात लेखिकेने केले आहे ते मुळातून वाचण्यासारखे आहे.
उदा. ‘‘गोंधळ, धांदल हेही शब्द त्यांच्या कोशात नव्हते. कमालीची शिस्त अन्‌ जाणीवपूर्वक आत्यंतिक काटेकोरपणा हे त्यांचे खास स्वभावविशेष, इंग्रजांच्या जमान्यात वरच्या वर्गात वावरायला मिळाल्यामुळे असो की त्यांच्या उपजत वृत्तीमुळे असो त्यांच्या कामात, वागण्यात, उठण्याबसण्यात, खाण्यापिण्यात जराही बेशिस्त, ढिलाई वा गाफिलपणा यांचा अंशही नसे. सगळं कसं आखीव-रेखीव, टापटीप, चटपटीत. कुठलाही घोळ न घालता- प्रत्येक काम त्यांना मनापासून केलेलं हवं असे. निष्काळजीपणा चुकारपणा, चालढकल त्यांच्या स्वभावात नसल्याने इतरांना त्याची सवलत नव्हती. त्यांच्या सहकाऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी हातावेगळं केलेलं काम, लिहिलेला अहवाल, निरीक्षणं ते पुन्हा पुन्हा तपासून त्याच्या निर्दोषत्वाची खात्री करून घेत.स्पेलिंगची चूकही खपत नसे. सरळ फाईल भिरकावली जायची.''

डॉ. सालिम अलींच्या अविरत प्रयत्नांचे फळ म्हणजे मुंबई विद्यापीठाने सोसायटीला पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी १९५७ साली दिलेली मान्यता. एम.एससी आणि डॉक्‍टरेटचा अभ्यासक्रम सोसायटीत सुरू झाल्यावर सालिम अलींचे काम अधिकच वाढले. त्यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी होते. ती व्यक्ती नसून एक संस्थाच होती. तरुण पिढीतील कित्येकांना त्यांनी पक्षिशास्त्राकडे आकृष्ट केले. त्यांच्यावर योग्य ते संस्कार करून त्यांचा नावलौकिक वाढविण्यास ते कारणीभूत ठरले. 
वयाची ८५ वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांची तब्येत ठणठणीत राहिली. स्वतःच्या शारीरिक दुर्बलतेचा ते चारचौघांत उच्चार करीत नसत. मृत्युविषयी विचार करायला त्यांनी फुरसतच ठेवली नव्हती. पण त्यांच्या आयुष्याचे उत्तरायण क्षीणतेचे आणि आधिव्याधींनी ग्रस्त राहिले. पण आपल्याला आयुष्य हव्या असलेल्या कारणासाठी घालविता आले याविषयीची कृतार्थतेची भावना त्यांच्या मनात होती.

लेखिकेने डॉ. सालिम अलींच्या व्यक्तिमत्त्वाची, वैशिष्ट्ये सांगितली आहेत. ती येथे अधोरेखित करावीशी वाटतात. "सालिम म्हणजे संपूर्ण, अभंग, निरोगी, जशाचा तसा..सालिम अलींच्या प्रदीर्घायुष्याचा पट पाहिला तर त्यांच्या नावातली सार्थकताच जाणवते. अचूक, आखीव रेखीव, निग्रही अभंग सालिम अली निरोगीही होते. वक्तशीर, निर्व्यसनी सालिम मिताहारी होते. त्यांची तब्येत नेहमीच शंभर टक्के खणखणीत. त्यात मैलोन्‌ मैलांची चाल. त्यामुळे अंगकाठीही चिवट, काटक, आजारपण जवळपासही फिरकत नसे.''
आयुष्याच्या क्षीण काळातही ‘पक्षी विज्ञान अभ्यास संस्था' स्थापन करण्याचा ध्यास त्यांनी सोडला नाही. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे सचिव शेषन त्यांना किहिमला येऊन भेटून गेले होते. या संस्थेच्या उभारणीसाठी केंद्र सरकार काय मदत करू शकेल, कोणत्या अटीवर करील यासंबंधी विचारविनिमय झाला होता. पण तो संकल्प काही पूर्ण होऊ शकला नाही.

त्यांना भेटायला येणाऱ्या तरुणांना ते सांगत असत, "अधिक वास्तववादी व्हा.. विधायक व्हा. आयुष्यातल्या छोट्या छोट्या सुखांना पारखे होऊ नका. साध्यासाध्या गोष्टींतून मिळणारा आनंदही आयुष्याला खूप काही देऊन जातो''  आयुष्यात निश्‍चित स्वरूपाची जीवननिष्ठा स्वीकारून आनंद प्राप्त करणारे ते मुक्त पक्षी होते. (उत्तरार्ध)

संबंधित बातम्या