गोवा पालिका निवडणूक 2021: वैश्विकतेच्या उंबरठ्यावर पणजीतले रण

गोवा पालिका निवडणूक 2021:  वैश्विकतेच्या उंबरठ्यावर पणजीतले रण
Eleven municipal and one municipal elections in Goa will be held next week

राज्यांत अकरा नगरपालिका आणि एकमेव महापालिकेच्या निवडणुका पुढील सप्ताहात होणार आहेत. सगळ्यांच्या नजरा मात्र पणजी महापालिका, मडगाव नगरपालिका निवडणुकीकडे लागल्या आहेत. एकेकाळी मडगाव नगरपालिका पणजीपेक्षा वरचढ होती पण महापालिका बनल्यानंतर सत्ताच नव्हे व्यापार, व्यवहाराच्या उलाढालीचे केंद्र म्हणून पणजी महापालिकेला महत्त्व आले. वास्तवात लोकसंख्या अभ्यासल्यास पणजीपेक्षा मडगाव, मुरगाव नगरपालिकांचे आधी महापालिकेत रुपांतर व्हायला हवे होते परंतु पणजीचे माजी आमदार, पूर्व मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद हाती येताच पणजीच्या कायापालटाचा ध्यास घेतला होता. मनी आले ते साकार करण्यासाठी त्यांनी ताळगावचा थोडा भाग पणजी नगरपालिका क्षेत्राला जोडून महापालिकेची अधिकृत मांडणी केली, विधेयक संमत केले आणि म्हणता म्हणता गोव्याच्या राजधानीला महापालिकेचा दर्जा देण्यात मिळाला. राजकारणाच्या सोयीसाठी पणजी नगरपालिका रात्रीत महापालिका झाली पण खऱ्या अर्थाने ती महापालिका झाली आहे का ? महापालिका कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी झाली आहे का?

पणजी आत्मनिर्भर झाली आहे का ? स्मार्ट सिटी मोहीमेखाली स्व. पर्रीकर यांनीच पणजीला रेटले पण राजधानी स्मार्ट झाली का ? नाही हेच उत्तर मिळेल. पणजीत विकासकामे झाली आहेत, कचरा व्यवस्थापनातही पणजीने विशेष प्रगती केली आहे, स्मार्टनेसकडे तिची घोडदौडही सुरु असली तरी जोपर्यंत महापालिका व राजकारणी महापालिकेच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहात नाहीत तोपर्यंत ती स्मार्ट होणार नाही.

स्व. पर्रीकर ध्येयप्रणित नेता होते, त्यांचा दृष्टीकोणही विशाल होता, तो फक्त पणजीच्या विकासासाठी नव्हता तर राज्याचा विकास हे त्यांचे लक्ष्य होते. त्यांनी पणजीवर स्वतःचा हक्क कधी सांगितला नाही, पणजी माझीच ती कोणीही ओरबाडून घेऊ शकत नाही असेही दावे त्यांनी कधी केले नाहीत, पणजीत आपल्या वारसदारासाठी त्यांनी तरतूद केली नाही, भांडलेही नाहीत कारण त्यांना एक गोष्ट अवगत होती ती म्हणजे पणजी आपली राजकीय कर्मभूमी असली तरी जन्मभूमी नव्हे. जन्मभूमीप्रमाणे त्यांनी पणजीवर प्रेम केलेही नसेल तरी ते पणजी, पणजीवासियांसाठी झटले म्हणूनच कदाचित त्यांना पणजीवासियांनी आपले मानले असावे तेही मूळ पणजीचे नसताना.

पणजीसाठीचे स्व. पर्रीकर यांचे ध्येय 100 टक्के साध्य झाले नाहीच उलट पणजी आज एका विशिष्ट वळणावर येऊन पोचली आहे. कांही शक्ती पणजी कोणाची? पणजी माझी अशी तोलमोल भाषा करू लागले आहेत, मतदारांच्या भल्यापेक्षा स्वार्थ अधिक नसावा ना? अशा शंका अशा भाषेतून नागरीकांच्या मनात येणे साहजिक आहे. पणजीची ग्रेटर पणजी झाली, कशी? ताळगाव, कुंभारजुवे, सांताक्रूज, सांत आंद्रे मतदारसंघाचे तुकडे तुकडे ग्रेटर पणजीत सामावून. तेथेच पणजी वैश्विकतेच्या उंबरठ्यावर येऊन पोचली आणि पणजीचे अस्तित्वही पणाला लागले आहे. त्यामुळे स्व. पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत होणाऱ्या २०२१ मधील पणजी महापालिका निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

पणजी नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर २००२ साली झाल्यानंतर पूर्वीचेच नगरपालिकेचे मंडळ विशेष तरतुदींद्वारे महापालिका मंडळ झाले, भाजपचे पणजीतील गटनेते अशोक नाईक महापौर झाले. 2004 साली पहिली महापालिका निवडणूक झाली.

श्री. नाईक यांचे महापौरपद कायम राहीले. अधिक प्रभाग पणजी मतदारसंघात आणि कमी प्रभाग ताळगाव मतदारसंघात अशी पणजी महापालिका प्रभागांची रचना राहीली आहे. महापालिका निवडणुकीतून पणजी मतदारसंघात शिरकाव करण्याचे प्रयत्न सातत्याने विद्यमान आमदार आतानासियो उर्फ बाबुश मोन्सेरात यांनी चालू ठेवले

होते. स्व. पर्रीकर हयात असेपर्यंत त्यांच्या त्या प्रयत्नांना यश मिळाले नाही पण महापालिकेवर त्यांनी हळुहळू कब्जा मिळवला होता. त्यासाठी स्व. पर्रीकर यांच्याशीही ते समन्वय साधून होते व त्यांतून महापौर, उप महापौरपदे दोन्ही गटाकडे अधूनमधून येत असत. कधी श्री. मोन्सेरात गटाच्या कारोलिन पो तर कधी स्व.पर्रीकर गटातील वैदेही नायक या महिला महापौरपदी त्यामुळे आरूढ झाल्या.

एक गोष्ट येथे सांगाविशी वाटते मागील म्हणजे 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रथमच श्री. मोन्सेरात यांच्या गटाला पणजी मतदारसंघात चांगले यश मिळाले होते पण ते 100 टक्के नव्हते. दुसऱ्या बाजूने त्याच निवडणुकीत भाजपचे तत्कालीन प्रवक्ते, नेते दत्तप्रसाद नाईक यांनी ताळगावातील कांही प्रभागांना खिंडार पाडून श्री. मोन्सेरात यांच्या ताळगाववरील वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न केला. श्री. मोन्सेरात यांच्या गटातील हुकमी एक्का मानले जाणारे माजी उप महापौर बेंतो लाॅरेना यांचा नगरसेवक, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष शितल दत्तप्रसाद नाईक यांनी केलेला पराभव पणजीच्या आमदारांच्या जिव्हारी लागणारच. यंदाच्या निवडणुकीत बेंतो आहेत पण शितल नाहीत तरीही माजी उप महापौरांना विजयाची पताका फडकावणे शक्य आहे का हे मतदारांचा कौल कसा असेल त्यावर अवलंबून राहील. मागील निवडणुकीत श्री. मोन्सेरात यांना कांही प्रभागात स्व. पर्रीकर यांच्या समर्थकांनी जबरदस्त आव्हान देऊन मुक्तपणे वावरण्यापासून रोखले होते. तेथे आता श्री. मोन्सेरात ताठ मानेने आमदार म्हणून उमेदवारांसमवेत फिरत असले तरी कांही प्रभागांतील उमेदवारांची संख्या बरीच उलथापालथ करणार असल्याची चिन्हे आहेत.

मृतवत अशी एकेकाळी समजली जाणारी पणजी गेल्या वीस वर्षांत झपाट्याने बदलली, कसिनोंचे शहर बनली आणि त्यामुळे शहरात रात्रीचे अड्डे जमू लागले, जत्रा भरू लागली. कसिनोबरोबर अंमली पदार्थ, मानवी वाहतूकही शहरात शिरली. शहरातल्या मूळ पणजीवासियांनी मुख्य रस्त्यांपासून दूरवरच्या कोपऱ्यात स्थलांतर केले आणि महापालिकेच्या प्रभाग फेररचनेच्या राजकारणात कांही इकडचे नागरीक तिकडचेही झाले आहेत. कांहीची नावे पणजी मतदारसंघात आणि पणजी मतदारसंघाशी, महापालिकेशी संलग्न असली तरी त्यांना प्रभाग फेररचनेत ताळगाव निवासी व्हावे लागले आहे.

कुटुंब विभाजनातून स्वतंत्रपणे वास्तव्यास गेलेल्यांची जुन्या प्रभागात नावे आहेत, नातेही आहेत.

वीस वर्षांत पणजीचा चेहरामोहरा बराच बदलला, काँक्रीटीकरणातून गोव्याबाहेरचे बांधकाम उद्योजकही पणजी व आसपासच्या भागात स्थिरस्थावर होत आहेत, सेकंड होम विकत घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. व्यावसायिकरणाचा विळखा पणजीला पडल्यामुळे समस्याही वाढतात परंतु त्यांचे पूर्णपणे निवारण करण्यात अद्याप महापालिकेला यश मिळालेले नाही. तारांकीत मार्केट पणजीला मिळाले पण मार्केटच्या आजूबाजूचे वातावरण, वाढता बेकायदेशीरपणा महापालिकेची डोकेदुखी बनली आहे. मार्केट शिस्तबद्ध करण्याचा निर्धार, मळा येथे अर्धवटावस्थेत पडलेल्या मार्केट इमारतीसंबंधात निर्णय घेऊन काम पूर्ण करीत जागेचा योग्य उपयोग करण्याचे आव्हान आहेच.

वैश्विकतेतून पणजीतील मुख्य रस्त्यांवर रात्रंदिवस होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पे पार्किंग उपयोगी ठरले आहे का ? उलट या पे पार्किगचा स्थानिकांना मनस्ताप होऊ लागला आहे आणि त्याचे पडसाद मतदानातून उमटणारच नाहीत असे नव्हे. पे पार्किगसाठी मोकळ्या जागांचा वापर करण्याऐवजी रस्त्याकडेचाच भाग वापरल्यामुळे वाहनांची गर्दी संपलेली नाही. पे पार्किंगसाठी साधनसुविधा निर्माणच झाल्या नसताना पे पार्किंग योग्य ठरतेय का हा नागरीकांचा सवाल, आहे का उत्तर महापालिकेकडे?

वैश्विकतेच्या उंबरठ्यावर पोचलेल्या पणजीत मूळ पणजीवासीय कमीच. पणजीतच जन्मलेले, खेळत, शिकत व्यवसायात पाय रोवलेले माजी भाजप प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक हेही पणजीला पोरके होण्याची भीती आहेच, त्यांचा प्रभागच ताळगांवशी स्पर्धा करतोय. ताळगावांतून पणजीत येत मतदारसंघात बस्तान बसवणारे, पाय पसरवणारे श्री. मोन्सेरात यांची खरी स्पर्धा दत्तप्रसाद नाईक यांच्याशीच आहे ते त्यांचे समाजबांधव शहरात सर्वाधिक संख्येने असल्यामुळे. स्व. पर्रीकर यांच्या तालमीत तयार झालेल्या दत्तप्रसाद यांनी व त्यांच्या समाजबांधवांनी मनावर घेतल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत श्री. मोन्सेरात यांच्याशी ते चांगली टक्कर देऊ शकतात ती वैश्विकतेच्या बळावरच. महापालिका निवडणूक ही त्याची सुरवात नसेल ना? भाजपतील स्व.पर्रीकर समर्थक गटांनी एकजूट बांधल्यास, काँग्रेसने त्यांना साथ दिल्यास आणि श्री. मोन्सेरात यांनी भाजपला रामराम ठोकल्यास भाजपला बालेकिल्ला राखणे शक्य होईल का? ही भाषा जर तरची असली तरीही राजकारण लवचिक असते हे विसरता येणार नाही. तुर्तास श्री. मोन्सेरात भाजपत असल्यामुळे महापालिका निवडणुकीत तीसही प्रभागांवर वर्चस्व ठेवत पणजी, ताळगाव हे दोन्ही मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्याचा त्यांचा इरादा दिसतो, येथेही वैश्विकता पणाला लागणार हे नक्की. त्या वैश्विकतेतून राज्याचे किंग अथवा किंगमेकर होण्याची इर्शाही त्यांच्या मनात नसावी ना?

वैश्विकतेला मूळचे पणजीवासिय थोडे कंटाळलेलेच आहेत, कारण ती झोपडपट्टीपासून टोलेजंग इमारतीपर्यंत पसरत आहे. त्यांतून पणजीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण उदभवणार नाही, पणजीची मांडवी, मिरामार समुद्रकिनारा, मोकळी मैदाने, शिल्लक राहिलेल्या मोकळ्या जागा वैश्विकतेखाली गाडल्या जाणार नाहीत याची हमी कोणी देऊ शकेल का? खाड्या बुजवल्या जात आहेत, खाडीच्या काठावर तारांकीत हाॅटेल्सही उभारली गेली आहेत, मांडवीत कसिनोंचे अतिक्रमण वाढले आहे आणि जुनै वैभव परत मिळवून देण्याच्या घोषणांची परिपूर्ती रखडली आहे.

विधानसभा, सचिवालय, मंत्रिमंडळ पर्वरीला गेले तरी पणजीचा राजधानीचा दर्जा कायम असून भविष्यात तो कायम राहावा, खळखळ वाहाणारी मांडवी टिकावी असे ज्यांना वाटतेय त्यांनी सुशिक्षीतच नव्हे उच्चशिक्षीत नगरसेवकांना निवडून आणायला हवे. स्व. पर्रीकर पणजीचा बुलंद आवाज म्हणून निवडून येत देशाचे संरक्षणमंत्री झाले, त्यांनी गोव्याला शान, मान मिळवून दिला. त्यांच्यानंतर पणजी भाजपच्या हातातून निसटली, श्री. मोन्सेरात भाजपत डेरेदाखल झाल्यानंतर पणजी मतदारसंघ भाजपकडे आला तरी अपात्रतेची टांगती तलवार त्यांच्याही डोक्यावर आहे. महापालिका निवडणूक पक्षाच्या निवडणूक चिन्हावर होत नसली तरी श्री. मोन्सेरात यांचे समर्थन लाभलेल्या उमेदवारांना भाजपचा पाठिंबा जाहीर झाला आहे. पक्षातील गटबाजी मिटवण्याच्या प्रयत्नात दत्तप्रसाद नाईक यांना प्रवक्तेपद गमावावे लागले पण इतरांना अभय मिळाले. शह काटशहाच्या राजकारणात महापालिका निवडणुकीत कोणी काय गमावले, कमावले ते कोणी पाहाणार नाही, महापौरपदी कोण असेल तिकडेच डोळे लागलेले असतील. 30 उमेदवार जिंकून आले नाहीत पण बहुमत मिळाले तरी पणजी, ताळगाववरील पकड घट्ट करण्यासाठी श्री. फुर्तादो पती पत्नी किंवा अन्य उमेदवार जिंकल्यास श्री. मोन्सेरात त्यांना आपल्या बाजूने वळवणार नाहीत का? पणजी मतदारसंघ भाजपने श्री. मोन्सेरात यांच्या हाती मागील विधानसभा निवडणुकीत सोपवला, महापालिकाही त्यांच्या हाती राहीली तरीही पणजीवर हक्काचा दावा त्यांना करता येईल का? महापालिका जिंकणाऱ्याच्या हाती आमदारकी येते असे नव्हे हेही यापूर्वी पणजीने दाखवून दिले आहे आणि लोकप्रतिनिधीच्या हाती महापालिकेच्या दोऱ्या न देण्याचा पायंडा पणजी महापालिकेनेच घालून दिला आहे. कां? पणजीला कोणाचाही वरचष्मा सहन होत नाही म्हणूनच विरोधकांप्रमाणे सत्ताधारीही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात महापालिका बैठकीत पेटून उठतात, त्यांतील उत्तम उदाहरण द्यायचेच झाल्यास महापौर उदय मडकईकर, माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांची देता येतील. कधी विरोधक सत्ताधारी होतील, सत्ताधारी विरोधक होतील ते सांगणे कठीण, तेच तर खऱ्या लोकशाहीचे लक्षण आहे. वैराच्या भावनेतून पणजीवासिय एकमेकांकडे पाहात नाहीत त्यामुळेच तर पणजी पणजीत राहाणाऱ्यांना, निवासाला असलेल्यांना त्यांची वाटते. पणजी विश्वातील, देशातील, राज्यातील उद्योगपतींची, कष्टकऱ्यांची, सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची, व्यापाऱ्यांची, विश्वातील लहान थोर नागरीकांची आहे. सर्वांना आपल्यात सामावून घेणाऱ्या, त्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या पणजीला सांभाळण्याचे कर्तव्य सगळ्यांचे आहे, महापालिका निवडणूक ही फक्त झलक आहे, रण मोकळे आहे, मोकळ्या रणात आजच्या घडीला योद्धे होऊन उतरणे महत्त्वाचे आहे, हारणे, जिंकणे नव्हे. माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी श्री. मोन्सेरात यांच्या विरोधात रणांगणात उतरण्याचे धाडस दाखवले आहे, त्यांच्यामागे कांही छुपे रुस्तमही आहेत, उच्चशिक्षीत उमेदवारही त्यांच्या गटात आहेत पण मतदारराजा श्रेष्ठ आहे, त्याच्याशी थेट संपर्क साधा, आपलेसे करा, सुखदुःखे जाणून घ्या. तसे केल्यास फक्त पैसा नव्हे आपले कोणी तरी आहे हे मतदाराराजाला समजेल, मतही मिळेल.

-सुहासिनी प्रभुगांवकर

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com