पर्यटनाच्या नावाखाली गोव्याचे धिंडवडे!

Enjoy the beautiful nature of Goa
Enjoy the beautiful nature of Goa

गोवा म्हणजे इतर राज्यातील लोकांना आणि विशेषतः देशी विदेशी पर्यटकांना ‘आव जाव घर तुम्हारा’ असा प्रकार हा आताचाच नाही तर पूर्वीपासून सुरू आहे. पर्यटनाच्या नावाखाली तर गोव्याचे धिंडवडे काढण्याचे प्रकार पूर्वीही झाले आहेत आणि आताही होत आहेत. फक्त शासनातील माणसे बदलतात, प्रवृत्ती बदलत नाही, त्यामुळेच गोव्याच्या संस्कृतीची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार प्रत्येकवेळी होत आहे. खुज्या मनोवृत्तीच्या लोकांमुळेच तर गोव्याला असे उघडे पाडण्यात येते, हे आधी लक्षात घ्यायला हवे.

पर्यटनाच्यादृष्टीने नंदनवन ठरलेले गोवा हे इतर ठिकाणांपेक्षा सुरक्षित मानले जाते, त्यासाठीच तर गोव्यात पर्यटनासाठी येणाऱ्या देशी असो व विदेशी पर्यटकांची संख्या वाढतच असते. या वाढत्या संख्येला फक्त यंदा तेवढी मर्यादा लागू झाली, ती सुद्धा कोरोनाच्या महामारीमुळे. आता कोरोनाचा प्रभाव गोव्यात बऱ्याच अंशी कमी झाल्याने राज्यात देशी, विदेशी पर्यटक दिसू लागले आहेत. पर्यटनाच्यादृष्टीने वाढणारी ही पर्यटकांची संख्या रोजगाराच्यादृष्टीने अथवा व्यवसायाच्या दृष्टीने दिलासादायक असली तरी राज्याच्या प्रतिमेचे काय..!


कुणीही यावे टपली मारून जावे, असा आपला प्रदेश आहे का, की सीमा सताड उघड्या आहेत, कुणीही या, काहीही करा आणि बिनधास्त निघा, असा प्रकार आहे? दोन आठवड्यांपूर्वी गोव्यातील दोन घटनांनी राज्यातील सांस्कृतिक, सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. एक म्हणजे काणकोणच्या चापोली धरणावर कोण तरी पूनम पांडे नावाची एक नटी येते आणि नग्न अवस्थेत शूटिंग करते, दुसरा मिलिंद सोमण नावाचा एक महाभाग जो एक मॉडेल आहे तो आपल्या वाढदिनी कोलव्याच्या समुद्र किनाऱ्यावर नागडा धावतोय. हे थेर करूनही वर स्वतःच प्रसिद्धी करतात, काय चाललेय हे..! गोव्याला या लोकांनी गृहित धरले आहे काय? या दोन्ही घटनात एक साम्य आहे, ते म्हणजे जी नटी नग्नावस्थेत जो काही धिंगाणा घालते, या प्रकाराला तिच्या नवऱ्याचीच साथ आहे, दुसरी बाब म्हणजे किनाऱ्यावर जो माणूस नागडा धावतोय, त्याचे शूटिंग खुद्द त्याची बायकोच करतेय! यातून काय अन्वयार्थ काढायचा, तो तुम्हीच काढा. काही तरी सनसनाटी करण्याच्या, बक्कळ पैसा कमावण्याच्या नादापायी आपण एखाद्या सुसंस्कृत प्रदेशालाच नागडा उघडा करतोय, याचे भान या दोन्ही घटनांतील सहभागींना तर नाहीच, पण आपल्या सुरक्षा यंत्रणेचे काय?


मुळात चापोली धरणावर अशाप्रकारच्या शूटिंगला सरकारी यंत्रणेतील जबाबदार घटकांनी कशी काय बुवा परवानगी दिली, यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा. दुसरी बाब म्हणजे एखादा माणूस आपल्या वाढदिनी किनाऱ्यावर नग्न धाऊन बिभत्सतेचे दर्शन घडवतो, त्याची व्हिडिओ अपलोड करतोय, आणि आपण स्वस्थ आहोत. आपली सुरक्षा यंत्रणा अशा प्रकाराची दखल घेते, पण ती किती उशिरा...! तुम्हाला सांगतो, कुणाला काहीही पडलेले नाही. सगळं रामभरोसे चालले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे आपल्या गोव्याची जी बदनामी होतेय ना? त्याला आपणही तेवढेच जबाबदार आहोत. 
पर्यटनाच्या नावाखाली आपण गोव्याची जी प्रसिद्धी करतोय, त्याला कुठेही तारतम्य नाहीच मुळी. आता सनबर्न पार्टीचेच पहा. कोरोनाची महामारी काही संपलेली नाही. अशा स्थितीत सनबर्नसारखी पार्टी गोव्यात आयोजित करून नेमके काय साध्य होणार आहे, याचा ज्याने त्याने विचार करावा. कोरोनाचे संक्रमण गोव्यात काही अंशी कमी झाले असले तरी अजून कोरोनापासून आपण मुक्त झालेलो नाही. कोरोनामुळे जगभर काय हाहाःकार उडाला तेही आपण पाहिले आहे. कोरोना काळात सर्वसामान्य माणूस किती हतबल ठरला आणि महनीय, अतिमहनीय व्यक्तींनी महागड्या इस्पितळांची वाट कशी धरली त्याचाही आपण अनुभव घेतला आहे. त्यामुळे कोरोनाचे काही अंशी कमी झालेले संक्रमण आपण अशा पार्ट्यांनी वाढवणार आहोत काय, आता कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती आहे. पाश्‍चात्य राष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आलीसुद्धा आणि दुसऱ्यांदा भले मोठे लॉकडाऊनही पुकारले आहे. त्यामुळे आपल्या देशात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, याचे भान प्रत्येकाने ठेवायला हवे. आपण डोकीचे काढून कमरेला कसे बांधतो आणि तेथून ते घरंगळत गुढघ्यापर्यंत कसे सरकते तेही पाहिले आहे. चेहऱ्यावरील मास्क आता हनुवटीवर आला आहे, काहीजणांच्या चेहऱ्यावरील मास्क गायब झाला आहे. त्यामुळे उद्या कोरोनाची दुसरी लाट आली तर आपण त्यात वाहून जाऊ शकतो, याचेही स्मरण प्रत्येकाने ठेवायला हवे. 


विषय आहे तो, गोव्यातील बाजारू पर्यटनाचा. गोव्याच्या पर्यटनासाठी आताच नाही तर पूर्वीही वीस, तीस वर्षांमागे गोव्याची जाहिरात विदेशात करण्यात आली आहे. प्रत्येकवेळी गोवा म्हणजे खा, प्या, मजा करा, असा संदेश आपण देत आलो आहोत. गोवा म्हणजे कोणतेच निर्बंध नाहीत, नियम, कायदे असले तरी ते आपण हवे तसे वागू शकतो, असा काहीसा समज पर्यटकांत आहे. त्यामुळेच तर मिलिंद सोमण नामक कुणी तरी मॉडेल गोव्यातील किनाऱ्यावर बिनधास्तपणे नागडा धाऊ शकतो. विचार करा, या माणसाने देशातील इतर किनाऱ्यांचा या कामासाठी का विचार केला नाही? याचाच अर्थ गोव्यात काहीही चालते, असे त्याला सांगायचे आहे काय? वर्षभरापूर्वी तर एक पर्यटक महिला मोटरसायकलच्या टाकीवर उताणी झोपली आहे, आणि तिचा प्रियकर ही दुचाकी चालवत असल्याचा फोटो जेव्हा पोलिसांत पोचला, तेव्हा कारवाई झाली. देशातील इतर राज्यांत असे प्रकार करण्याचे धाडस तरी या लोकांत झाले असते का? आपल्या देशात व्यक्तिस्वातंत्र्य असले तरी त्यालाही काही मर्यादा आहेतच की. सार्वजनिक ठिकाणी वावरताना सभ्यता महत्त्वाची ठरते, मात्र सभ्यता कोळून प्यालेल्या माणसांकडून आणखी कशाची अपेक्षा धरणार. काही वर्षांपूर्वी किनाऱ्यावर नागड्या अवस्थेत धावलेल्या याच तथाकथित मॉडेलच्या आदम आणि ईव्हवरील फोटोमुळे गदारोळ माजला होता, त्याचेही स्मरण या ठिकाणी करणे क्रमप्राप्त ठरते. 


विदेशातील लोक आपल्यापेक्षा कमी कपडे घालतात. टू पीस मध्ये वावरणारे हे लोक सार्वजनिक ठिकाणी नग्नतेचे हिडीस दर्शन घडवत नाही. विदेशातील काही किनाऱ्यांवर तर ‘न्यूड एरिया’ म्हणून काही भाग निर्धारित केलेला आहे. या न्यूड एरिया भागात अन्य कुणाला प्रवेश नसतो. आपल्या किनाऱ्यांची काय अवस्था आहे? विदेशी पर्यटक वन पीस, टू पीसमध्ये बिनधास्त वावरत असताना आपले आंबटशौकीन देशी पर्यटक त्या ठिकाणी कशा घिरट्या घालतात, हे काय नव्याने सांगायला हवे काय? त्यासाठीच तर किनाऱ्यांवर असे काही भाग हे निर्बंधित असायला हवेत. पूर्ण किनारा त्यासाठी बंद करण्याची गरजच नाही. किनाऱ्यांचा एक भाग हा निर्बंधित केला तर गुन्हेगारी कृत्यांना थाराच मिळणार नाही.  राज्यातील खाणी बंद पडलेल्या आहेत, बंद खाणींमुळे महसुलाचा एक मोठा स्त्रोत आटला आहे. त्यामुळे पर्यटनावरच आता गोव्याची भिस्त आहे. त्यासाठी आपले पर्यटन धोरण हे ‘परफेक्‍ट’ असायला हवे. योग्य नियोजन करण्याबरोबरच देशी विदेशी पर्यटकांना सुविधा पुरवताना बिभत्सतेला कुठेही थारा मिळणार नाही, याकडे कटाक्ष ठेवायला हवा. गोमंतकीय हातांना काम मिळण्याबरोबरच पर्यटनातून व्यापार उदिमाला चालना मिळण्याची आवश्‍यकता आहे. किती काळ आपण या सोनेरी किनारपट्टीवर विसंबून राहणार आहोत, त्याचाही विचार व्हायला हवा. गोव्यातील सुंदर निसर्गाचा आणि येथील सुबक सुंदर देवालयांच्या पर्यटनाची व्याप्ती वाढली पाहिजे. गोवा म्हणजे हातात बिअरचा ग्लास आणि ड्रग्जचा झुरका हवाच, असे काही नाही. त्यामुळेच गोव्याच्या हिताचे निर्णय घेताना सर्वंकष विचार व्हायला हवा. हा विचार जेव्हा आपण करू तेव्हा महसूल वाढीसाठी सनबर्नसारख्या पार्ट्यांची आपल्याला गरजच भासणार नाही, हे नक्की!

-नरेंद्र तारी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com