दिवाळी प्रकाशपर्वात पर्यावरण रक्षणासाठी ज्ञानदिप प्रज्वलित करूया....

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

कोरोना अजून संपलेला नाही. रुग्ण सापडण्याची संख्या कमी झाली म्हणून कोरोनाचा प्रभाव कमी झाला वगैरे कोणी समजू नये. जर्मनीसह अन्य काही देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे.

सर्वांचा आवडीचा असा दिवाळी उत्सव सुरू होत आहे. दिवाळी म्हटली की आनंद, प्रकाश पर्व. आपण सगळेच उत्साहात असतो. यावर्षीची दिवाळी जराशी वेगळी असेल. कोरोनाच्या महामारीने मार्चपासून सगळ्यांचेच गणित बिघडवले आहे. लोक आत्ता कुठे सावरत आहेत. कोरोना अजून संपलेला नाही. रुग्ण सापडण्याची संख्या कमी झाली म्हणून कोरोनाचा प्रभाव कमी झाला वगैरे कोणी समजू नये.

जर्मनीसह अन्य काही देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. आपल्या देशात तर हिवाळा सुरू आहे. हिवाळी मोसमातील वातवरण कोरोनासाठी पोषक आणि लोकांसाठी काळजी करायला लावणारे. त्यातच पुढील दिवस हे उत्सवांचेच आहेत. मौजमस्ती, आनंद लुटण्यासह दिवाळीत फटाके फोडणे, नरकासूर प्रतिमेचे दहन हेही आले. गोव्यात तर यापुढे उत्सव पर्व सुरू होत आहे. जत्रा, काले आणि अन्य उत्सवांना लवकरच सुरवात होईल. कोरोनामुळे सुरू झालेले लॉकडाउन हळूहळू शिथिल होत गेले तसतशी गर्दी वाढू लागली. लोकही बिनधास्तपणे फिरत आहेत. बाजारात तोबा गर्दी उसळत आहे. हे सर्व दृश्‍य पाहिल्यावर कोरोनाचा कहर गेले आठ महिने होता याचा विसर पडावा.
आपण अजूनही गांभीर्य ओळखलेले नाही. नुकतेच कुठे कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. पण मृत्यू पावणाऱ्यांची संख्या अजूनही कमी झालेली नाही.

हे मृत्यू कोरोनामुळेच होतात की कोरोना निमित्त मात्र आहे, ही गोष्ट अलाहिदा. परंतु मृत्यू काही कमी होत नाहीत. काळ जसा पुढे जातो तसे आपण भूतकाळ विसरतो किंवा विसरण्याचा प्रयत्न करतो. वाईट गोष्टी मनात साठवून ठेवायच्या नसतात. तसेच कोरोनाचे झाले आहे. कोरोनाने पार घाबरवून टाकले होते. नुसते नाव जरी ऐकले तरी भीतीने गाळण उडायची. अनलॉकनंतर मात्र कोरोनाविषयीची मनात दाटलेली भीती काहीशी कमी झाली आहे. परिणामी सगळेच जण बंधने झुगारून फिरत आहेत. मास्क वापरणे तर काहीजण विसरलेले आहेत. सुरक्षित अंतर राखणेही बंद झाले आहे. हे सगळे पाहिल्यावर कुठे काय झाले होते, असा प्रश्‍न पडतो.
अनलॉक झाले, सीमा मोकळ्या झाल्या, पर्यटन स्थळे उघडी झाली. यामुळे गोव्यात तर पर्यटक मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत. इथे अगोदरच कोणी सुरक्षा उपायांकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यात बिनधास्तपणे फिरणाऱ्या पर्यटकांची भर पडली आहे. काही प्रवासी बसेस सुरू आहेत. त्यात प्रवासी अक्षरश: कोंबले जातात. हे पाहिल्यावर कोरोना नावाचा राक्षस मेला की काय, असे वाटू लागते.

मासळी मार्केटमध्ये तर काहीच विचारू नका, अशी स्थिती. सरकार. आरोग्य खाते, कोरोनाकाळात उपचार करणारे डॉक्टर रोज आवाहन करतात. ‘सांभाळा... अजूनही कोरोना काही गेलेला नाही, त्यावर जालीम असे औषधही अजून आलेले नाही. काळजी घ्या, सुरक्षिततेचे सर्व नियम पाळा...’, पण ऐकतो कोण, मनावर घेतो कोण? आपल्याला सगळीकडेच दुर्लक्ष करायची सवयच जडलेली आहे. लगेच विसरायचे... पण कोरोना काही इथून हललेला नाही. हां... सध्या तो काहीसा शांत आहे एवढेच. म्हणून गाफील राहून चालणार नाही. सावध राहायलाच हवे. पुरेशी काळजी घ्यायला हवी. मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होते. आपण अशी कारवाई ओढवून घेतो एवढे अशिक्षित आणि अडाणी आहोत काय? सरकारने नियम कडक केले, निर्बंध घातले तरच आपण सुधारणार काय? स्वत:ला शिस्त लावून घेतली आणि नियमात वागलो तर सर्व काही सुरळीत होते. त्यासाठी सरकारच्या निर्णयाची वाट पाहायची गरजच नाही. आठ महिन्यांत कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्सेस व अन्य कर्मचारी आपल्या घरी पाहिजे तसे जाऊ शकलेले नाहीत, कुटुंबियांसोबत, मुलाबाळांसोबत खुल्या मनाने वेळ घालवू शकलेले नाहीत. त्यांच्या जिवावर आपण मात्र सुरक्षित होतो. या कोविड योद्‍ध्‍यांचा विचार नको का करायला? त्यांना गणेशचतुर्थीही मनाप्रमाणे साजरी करता आली नाही. आता दिवाळीचा उत्सव तरी साजरा करायला मिळायला हवा. पण हे केव्हा शक्य आहे? जेव्हा आम्ही सगळेच जण कोरोनापासून दूर राहिलो तर...

दिवाळीच्या पूर्वरात्री नरकारसूर प्रतिमांचे दहन केले जाते. दरवर्षी स्पर्धा भरायच्या, काही ठिकाणी मिरवणुकाही असायच्या. यंदा मात्र त्यांना मर्यादा आहेत. पर्यावरणाचे रक्षण करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. नरकासूर प्रतिमा दहन यावर्षी टाळता आले असते किंवा अशा प्रतिमा केवळ औपचारिकता म्हणून अगदीच छोट्या बनवल्या असत्या तर चांगले झाले असते. पण पणजीच्या महापौरांनी त्यासाठी नियम जारी केले आणि दोन दिवसांतच पलटी मारली. राज्यात अनेक ठिकाणी सध्या नरकासूर प्रतिमा तयार करण्यात येत असल्याचे दृष्टीस पडते. कोरोना रुग्णांना श्‍वास घ्यायला त्रास होता कामा नये. यासाठी प्रदूषण टाळायला हवे. धुरामुळे अशा रुग्णांना अधिक त्रास होईल. एरवीही लोकांना धुराचा त्रास होतो. फुफ्फुसांवर त्याचा परिणाम होतो. सरकारने दिवाळीत फटाकेही लावायला खरे तर बंदी घालायला हवी होती. काही राज्यांनी अशी बंदी घातली तर काहींनी थोडी सवलत दिली. पण राष्ट्रीय हरित लवादाने फटाक्यांवर बंदी घातली आहे. फटाक्यांचा धूर तर अतिशय वाईट. हिवाळ्यात तर असा धूर हवेत बराच काळ टिकून राहतो. त्याचाही आरोग्यावर परिणाम होतो.

गेल्या काही वर्षांत गणेशचतुर्थीत फटाके लावण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ख्रिस्ती धर्मीयांनीही फेस्त किंवा अन्य उत्सवांना फटाके लावणे कमी केले आहे. यावेळच्या दिवाळीत तर कोरोना अजूनही आहे. त्यामुळे या दिवाळीत नरकासूर प्रतिमा वध, फटाक्यांना आपण दूर ठेवू शकतो. तसे केले तर प्रदूषण कमी होईल आणि कोरोना रुग्ण आणि इतर लोकांनाही त्रास होणार नाही. फटाक्यांवरील खर्च कमी होईल. ते पैसे आपण फराळासाठी, कपडे खरेदी करण्यासाठी वापरू शकतो. आधीच कोरोनाच्या महामारीमुळे उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. त्यासाठी आर्थिक नियोजन करताना अशा अनावश्‍यक खर्चांना आपण कात्री लावू शकतो.

दिवाळीच्या निमित्ताने आपण पर्यावरण रक्षणाची शपथ घ्यायला हवी. राज्य ‘स्वच्छ आणि सुंदर’ बनवण्यासाठी योगदान द्यायला हवे. आज कुठलाही रस्ता घ्या, अगदी गावातला वा महामार्ग... सर्वत्र कचरा फेकलेला दिसतो. हा कचरा कोण फेकतो? आपल्यापैकीच कोणीतरी हे दुष्कर्म करीत असतात. त्यातून परिसर विद्रुप होतो आणि पर्यावरणालाही बाधा येते. आपण घरी कचरा गोळा करून ठेवला आणि तो पंचायती, पालिकांच्या कचरा गोळा करणाऱ्यांकडे दिला तर त्याची विल्हेवाटही व्यवस्थित होते. व्यावसायिक आस्थापने आणि काही हॉटेल्स व अन्य आस्थापनांचा कचराही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आलेला पाहायला मिळतो. कचऱ्याची उचल अनेक गावांत, शहरात होत असतानाही असा कचरा मग येतो कुठून, असा प्रश्‍न पडतो. हा प्रकार बंद व्हायला हवा. नरकासूर प्रतिमा जाळल्या की त्याचा जो सांगाडावगैरे कचरा दुसऱ्या दिवशी रस्त्यावर पडलेला दिसून येतो, त्याची जबाबदारी कोणाची? पंचायती, पालिका की अशा प्रतिमा बनवणाऱ्यांची? कचरा करून प्रदूषण वाढवण्यापेक्षा असा कचरा होणारच नाही, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. तरच आपण पर्यावरण रक्षण करण्यात यशस्वी होऊ. हे सारे काही एकाच झटक्यात होणार नाही. पण निदान सण, उत्सवावेळी आपण काळजी घेतली आणि कचरामुक्त, प्रदूषणमुक्त उत्सव साजरे केले तर अशा सण, उत्सवांचे महत्त्वही वाढेल आणि आपण समाजाच्या विकासासाठी, पर्यावरणासाठी काहीतरी योगदान देऊ शकलो याचे समाधान मिळेल. आपला आनंद द्विगुणित होईल. कोरोनाच्या काळात आलेल्या या दिवाळीत तरी आपण असा संकल्प करूया आणि प्रकाशपर्वात समाजात पर्यावरण रक्षणासाठीचे झानदीप प्रज्वलित करूया. अशाने आपली दिवाळी सत्कारणी लागेल.

- किशोर शां. शेट मांद्रेकर

संबंधित बातम्या