कर्म तुमची आणि दोष आम्हाला..!

आमच्या देवलोकात ना, माझा बराच दबदबा आहे. इंद्रदेवानंतर मीच जणू. पण माझ्याबद्दल ना एक गैरसमज येथे पसरलेला आहे.
कर्म तुमची आणि दोष आम्हाला..!
Environmental Story of Goa Dainik Gomantak

Environmental Story : आमच्या देवलोकात ना, माझा बराच दबदबा आहे. इंद्रदेवानंतर मीच जणू. पण माझ्याबद्दल ना एक गैरसमज येथे पसरलेला आहे. इथल्या सगळ्यांना वाटते, की मी खूप रागीट आहे, शीघ्रकोपी आहे, गर्विष्ट आहे, ॲरोगंट आहे. पण खरं सांगायचे तर मी अजिबात तसा नाही. माझ्या माहितीनुसार हे देवलोकातले माझ्याबाबतीतले गैरसमज तुमच्या लोकांतही पसरलेले आहेत.

 Environmental Story of Goa
IFFI 2021: विश्वाला जोडणाऱ्या इफ्फीचा वारसा जपा!

तुमची नेहमीच माझ्याबद्दल तक्रार असते, की हा सूर्य किती तळपत असतो? किती उकाडा निर्माण करतो. कितीतरी झाडेझुडपे, शेती भाती करपून टाकतो. वरुणदेवाला कमी पडायला देतो आणि आपल्या प्रखर धगधगत्या उष्म्यावरून वायुदेवाला भलत्याच दिशेला वाहात जायला सांगून आमच्यासारख्यांच्या अंगातून घामाच्या धारा काढतो. तुमच्यातले खूप लोक मी फारच उकाडा निर्माण करतो म्हणून माझ्याकडे बोट दाखवतात. माझ्या उकाड्याचा त्रास होतो म्हणून डोक्यावर चित्रविचित्र प्रकारच्या हॅट घालतात. घरात हवा थंड करणारी यंत्रे बसवून घेतात. कुठल्याही हॉटेलात जाताना ते एअर कंडिशन आहे की नाही, याची चौकशी करतात आणि मगच तिथे जातात. थोडक्यात तुम्हा सर्वांना वाटते की, मीच त्या उकाड्याला कारणीभूत आहे आणि त्यामुळे तुमच्या खिशाला बसणाऱ्या चटक्यालाही. हिमालयातला बर्फ माझ्यामुळेच वितळतो, असं तुमचं म्हणणं आहे. बर्फ वितळल्यामुळे अवेळी नद्यांना पूर येतो, त्यालाही तुम्ही इनडायरेक्टली मलाच जबाबदार धरता. आपल्या गोव्याचे माझ्यामुळे माळरान होत चालले आहे, वगैरे वगैरे.

ठीक आहे. फॉर आरग्युमेंट सेक तुमचं म्हणणं मान्य करूं की, तुमच्या त्या सगळ्या प्रॉब्लेम्सना मीच कारणीभूत आहे. पण आता जरा मी काय सांगतो ते ऐका. बऱ्याच काळामागे जा. अगदी आदीमानवाच्या काळाचे सोडा. तुमच्या शिवाजी महाराजांच्या काळात चला. बरं तेही नको. तुम्ही असं करा. तुम्ही तुमच्या बांदोडकरांच्या काळात जा. आता जिथे तुमच्या गोव्याची कला अकादमी दिमाखात उभी आहे तिथे आधी काय होते ते आठवा. त्याच कला अकादमीच्या ओळीत पुढे मिरामारचा प्रसिद्ध असा गास्पार डायस क्लब आहे. अकादमी ते गास्पार डायस या पूर्ण भागात आधी काय होते? बांदोडकरांच्या काळातसुद्धा तिथे विस्तीर्ण शेती पसरलेली होती आणि एकच जो रस्ता होता, त्याच्या आजूबाजूला प्रचंड मोठी झाडे होती. जवळपास जंगलच होते ते सगळे. आणि आता तिथे काय आहे? मोजून तीन ते चार झाडे. शेती गायब. त्याजागी भराव घालून त्यावर मोठमोठ्या इमारती व बंगल्यांचे काँक्रिट जंगल. हे सगळे फक्त तुमच्या गोमंतकातच नव्हे, तर एशिया खंडात, भारत वर्षात, संपूर्ण जगभरात झालेले आहे. त्यामुळे वातावरणाचे संतुलन बिघडले. पाऊस कमी झाला. तुम्ही आमच्या वरुणाला आणि मला दोष दिला. वेगवेगळी हाय-लो प्रेशर तयार होऊन वादळे निर्माण झाली. तुम्ही दोष वायूला आणि मला दिला. गरमी वाढायला लागली की दोष माझ्यावर आला. सगळा दोष, सगळं सगळं काही तुम्ही आमच्या माथ्यावर मारत आलात.

जरा एक क्षणभर थांबा आणि विचार करा. हे जग चालवण्यात तुमचीही काही जबाबदारी आहे की नाही? संपूर्ण जगाचे संतुलन बिघडवण्यात तुमचा काहीच हात नाही का? अहो, वर उदाहरण म्हणून मी दिलेल्या बांदोडकर मार्गाचेच बघा. आधी ते जवळपास पूर्ण जंगलच होते. आणि आता जंगल आहे पण ते झाडांचे नसून कॉंक्रिटचे आहे. आता यातली केमिस्ट्री लक्षात घ्या.

 Environmental Story of Goa
सावधान...विद्यार्थ्यांनाही जपा!

झाडे ऑक्सिजन देतात. तुम्ही माणसे तोंडातून, तुमच्या वाहनांतून, तुम्ही वापरत असलेल्या विविध यंत्रांतून कार्बन मोनोक्साईड बाहेर सोडता. मी तुच्याकडचा समुद्र, नद्या गरम करतो. नद्या आणि समुद्र पाण्याची वाफ निर्माण करतात. ही सगळी गरमागरम वाफ मग वजनाने हलकी असल्यामुळे वर आकाशात जाते आणि मग तिथे त्यांचे पाण्याने भरलेले ढग होतात. त्याचाच वरुण पाऊस करतो. मग तो तुमच्या धरतीवर धो धो कोसळतो.

सगळीकडे पाणी पाणी होते. नद्या भरभरून वाहायला लागतात. तुमची धरणे भरतात. तुमची पाण्याची टंचाई मिटते. शेती फुलते. अन्नधान्ये, फळफळावळ पिकतात, आबादी आबाद होते. सगळीकडे आनंद पसरतो. तुमचे सण जोरात आणि जोषात साजरे होतात. रोगराई कमी होते. एकूण काय तर सगळीकडे सगळं ठीकठाक होते. ना कुणाला दोष, ना कुणाबद्दल तक्रार. पृथ्वीवर तुम्ही लोक जे काही करता किंवा करत नसता, त्यामुळे सुकाळ, दुष्काळ, उपासमारी, महामारी अशा गोष्टी घडतात. तिथे त्यात आमचा कसलाही हस्तक्षेप नसतो. आम्ही आमचं काम अनादी काळापासून जसे चालले आहे तसेच करतो आहोत; पण तुमच्या वर सांगितलेल्या हस्तक्षेपामुळे आमच्या कामाचे संतुलन बिघडते आणि मग तुम्हा लोकांना माझी गरमी जास्त जाणवायला लागते. तुम्ही झाडे कापता आणि इमारती व रस्ते बांधता. लोकसंख्या वाढते. त्यांच्या घरातले एसी व त्यांची वाहने वाढतात. लोकसंख्या वाढते तसा कार्बनही वाढतो. झाडे कमी झाल्यामुळे ऑक्सिजन कमी होतो. संतुलन बिघडते. दुष्काळ, उपासमारी, महामारी यात वाढ होते. आमच्यावरचे तुम्ही दिलेले दोष वाढतात. पण तुमच्या जबाबदारीचे काय?

मी असे रोखठोक सांगतो म्हणूनच मी शीघ्रकोपी, गरम माथ्याचा, ॲरोगंट नाही का? तुम्हीच विचार करा. मी जातो माझं काम करायला, अगदी अनादी काळाप्रमाणे करत होतो तसेच इमाने-इतबारे करायला. सी. यू.

प्रदीप माधव तळावलीकर

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com