गोयंकारांच्या स्वयंपाक घरामध्ये पदार्थांना पोर्तुगीज आणि हिंदू संस्कृतीच्या मिलाफाचा दरवळ

Exploring Goa A guide for foodies in Goa
Exploring Goa A guide for foodies in Goa


जर तूम्ही या आज ३१ सेलिब्रेट करण्यासाठी  कुठे जाण्याच्या विचरात असाल तर आम्ही तूमची नक्कीच मदत करू, कारण नेहमी काय होतं कुठे जायचं म्हटल की आपण खूप उत्साहाने तयार तर होतो पण नेमकं तिथे गेल्यावर कुठे फिरायचं काय खायचा हा मोठा प्रश्न आपल्यापुढे उभा असतो.

आणि आता उद्या तर नविन वर्ष, तेव्हा तूम्ही नविन वर्षात गोव्यात जाण्याचा विचार करत असाल तर आणि   तुम्ही जर खाण्याचे आणि फिरण्याचे शौकीन असाल तर हा लेख तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. गोव्यात अशी अनेक ठिकाणे आहेत जेथे खाद्यसंस्कृति खुप छान प्रकारे जपली जाते. मासे खाण्यात आणि खावू घालण्यात हार न मानणारे म्हणजे गोयंकार. गोयंकारांच्या स्वयंपाकघरातल्या पदार्थांना पोर्तुगीज आणि हिंदू संस्कृतीच्या मिलाफाचा दरवळ आहे..

गोयंकार जगात कुठेही  कुठेही गेला तरी गोव्याच्या मातीतल्या खुणा तो काळजाशी घट्ट धरून ठेवतो. जागा असो वा नसो तरी त्याच्या गॅलरीतल्या कुंडीमध्ये कळ्याचेंडवाचं, अबोलीचं रोपट जीव धरून असतं. स्वयंपाकघरात सोमवार गुरुवार सोडून तिवळ, बारीक सुंगटाचे हुमण, तळलेले इसवण चा वास घमघमत असतो. कोंकणी, कोळी, भंडारी, सारस्वत, ख्रिश्चन अशा अनेक पदार्थांना गोव्यानं अंगाखांद्यावर खेळवलं आणि पोसलं आहे.

गोयंकारांनी ही खाद्यसंस्कृती जीवापाड जपली ती गोव्याच्या अन् पोटावरच्या आत्यंतिक प्रेमामुळेच. ‘आजचो दिस आपलो’ म्हणत पिशवीभर मासे घेऊन यायचे, दुपारपर्यंत विळीला खसाखस धार मारत ते साफ करायचे अन् निऱ्या भातासोबत त्याचे दहा प्रकार करून खायचे. उष्ट्या ताटवाट्या घासायला कोली ला रात्र होते. पोर्तुगीजांनी गोव्याच्या पदार्थांमध्ये केक, पाव अन् काजूच्या फेणीला आणले असले तरीही गोयंकारांनी या तिन्ही पदार्थांवर शेकडो प्रयोग करून पाहिले आहे. मडगावच्या एसटी स्टॅन्डपासून, पणजीतल्या कॅफे ‘तातो’, ‘सेंट्रल कॅफे’ अन् मिरामारच्या ‘अगत्य’ पर्यंतचे अनेक पॉइंटस् हे असंख्य प्रकारचे स्टफ पाव अन् तितक्या लजीच केकसाठी आजही गोव्यात फेमस आहेत.

तेलातुपातल्या कॅलरीच्या काळजीने गोयंकर कधीच आपलं मन मारत नाही. कारण त्यांच्या जेवणात तेलाचा अन् दुधाचा वापर कमीच असतो. तेलाचा विशेश आग्रह गोवेकार करत नाही. मासे साफ करून गंध केलेल्या लाल वाटणामध्ये चांगले घोळवून घेतले आणि मीठ तिरफळ घालून सणसणीत उकळी काढली की कडी तयार..काळ्या पाठीचं पापलेट, हलवा, कर्लीसारख्या रुबाबदार माशांना वरून चमचाभर तेलामध्ये छोटा कांदा बारीक कापून फोडणी मिळते तेव्हा इथल्या पदार्थांना सुक्या खोबऱ्याचं, काळ्या मसाल्याच्या वाटाघाटाचं कौतुक नाही.

खेकडे चुलीत आणि मासे खापरांवर भाजून खाल्ले तरीही त्याची चव तितकीच भन्नाट लागते असे गोयंकार सांगतात. माशात तेल असतं, या सिद्धांताला गोयंकर खाद्य रसिक पुरेपूर जागतो. मटणाचा तसा फारसा रस गोव्याच्या खाण्यात नाही, पण ते बनवलंच तर सढळ हाताने आंबाट, ओट सोल घालून केलेली कडी आणि वाफाळता भात असला की चपात्या वगैरेची गरज गोयंकारांना पडत नाही. शाकाहारी पदार्थांमधल्या विविधतेचं दर्शन गोयंकारांच्या घरात गावातल्या गडावरची, कुलदैवतेच्या यात्रेच्या वारी नाहीतर चवथीला होतं.

श्रावणात गोयंकार शाकाहारी जेवण जेवतात

गोव्यात जावून तूम्ही मासळी नाही खाल्ली तर काय खाल्लं असे लोकं तूम्हाला म्हणतील पण गोमंतकिय शाकाहारी जेवणही खूप स्वादिष्ट आहे. गोव्यामध्ये फक्त मांसाहारी नव्हेच तर शाकाहारी जेवण देखील खुप छान आणि स्वादिष्ट मिळते.

एकदम चविष्ट आणि रुचकर भाजी करायची असेल तर ढोबळी मिरची, फणसाच्या आठळ्या, शेवग्याच्या शेंगा, भोपळा, कांदा, बारीक कापून मंद आचेवर लाल तिखट, कढीपत्ता घालून शिजवलं की अस्सल स्वादिष्ट भाजी तयार.

श्रावणात उपलब्ध असतील तितक्या भाज्या वापरून ओल्या नारळाचा चव भरून केलेल्या करंज्या, नाहीतर फणस, शेवग्याच्या शेंगांचे आंबाट पदार्थ त्यांच्यासाठी केव्हाही उत्तमच असतात. इलाज नसताना खाव्या लागणाऱ्या शाकाहारी भाजीचे ग्रेव्ही असलेले पदार्थ, तांदुळाचा रवा लावून तळलेले काप, कोवळ्या बांबूच्या कोंबांची भाजी, ओल्या काजूची, अळंबीची भाजीही ओल्या खोबऱ्यात तितकीच आवडीने बनवली जाते. स्वयंपाकघरातला गोयंकारांचा वावर हा लग्नघरातल्या घाईगर्दी सारखा असतो

त्यापैकीच एका पदार्थाची पाककृती

कोळंबी भरलेले पापलेट

साहित्य - मध्यम आकाराच्या कोळंबीचा वाटीभर खिमा, स्वच्छ करून पोटाकडून चीर दिलेले पापलेट.

मसाल्याचे साहित्य - कांदा-लाल मिरची, लसूण, खाटी (आंबट मिश्रण म्हणून वापरली जाणारी) पुदिना, कोथिंबीर, धणे, खसखस आणि बडिशेपाची चमचाभर पूड, मीठ चवीनुसार.

कोळंबी ग्रेव्हीसाठी - बारीक वाटलेली कांदा, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, अगदी माफक गरम मसाला पावडर. कांदा कोथिंबीर, आलं-लसूण पेस्टची ग्रेव्ही तेलामध्ये कोळंबीच्या खिम्यासह फ्राय करून घ्यावी. पापलेटला आंबट खाटी, मीठ, हळद, पुदिना पेस्ट, खसखस- बडिशेपची चमचाभर पूड लावून मॅरिनेट करून ठेवावे. पोटाकडे चीर दिलेल्या भागातून कोळंबीचा खिमा भरावा, तांदळाचा रवा लावून तेलावर हे पापलेट फ्राय करावे.

गोव्यामध्ये समोसा, मिसळ पाव, फिश करी, शावर्मा, गडबड इसक्रिम हे तर मिळतेच पण यासोबत शाकाहारी जेवणही मिळते. आता ते कुठे आणि कसे हे खालिलप्रमाणे

गोव्यातील काही प्रसिध्द ठिकाणे आणि तेथील वैशिष्ट्य आज आपण जाणून घेऊ.

काही शाकाहारी हॉटेल

  • उडुपी प्योर वेज
  • कृष्णा सागर 
  • तिरुमलाई प्योर वेज

स्वादिष्ट बर्गर

  • द ब्लैक मार्केट : पणजी
  • द बर्गर फैक्टरी : अंजुना
  • फ्रेंड्स विथ बन्स : पणजी

मच्छी थाळीसाठी प्रसिद्ध

  • द गोअन रूम : डोना पौला
  • विनायक रेस्टोरेंट : असागओ
  • स्टारलाइट रेस्टोरेंट, बार : अर्पोरा
  • विनंती फॅमिली रेस्टोरेंट : पणजी
  • कोकणी कैंटीन : पणजी
  • पीप किचन : पणजी
  • स्पाइस गोवा : मापुसा
  • रिट्ज क्लासिक : पणजी

काही प्रसिद्ध आणि पारंपरिक बेकरी

  • जिला बेकरी : अम्बोरा
  • मिस्टर बेकर : पणजी
  • कैफे सेंट्रल : पणजी
  • गीता बेकरी : पणजी
  • सिमोनिया स्टोर्स : मापुसा
  • परफेक्ट बेकरी & कैफे : पणजी
  •  

रेस्टोरेंट आणि तेथील वैशिष्ट्य

  • कालमारी : कालमारी, पिज़्ज़ा, सी फूड, मॉकटेल, प्रॉन करी, कॉकटेल
  • मम्स किचन : सी फूड, पॉम्फ्रेट करी, सोलकढी, पेरी पेरी प्रॉन, प्रॉन करी, फिश करी.

चला तर मग विचार कसला करताय, गोवा तुमची वाट बघत आहे.

-गायत्री कूलकर्णी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com