केतुडीचा पायगुण म्हणून बचावलो

गौरी नाडकर्णी
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

देवाच्या मनात तरी काय होतं, कोण जाणे! केतकी घरी येताच महिन्याभरात संकेतचा अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून बचावला. स्मिताच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. केतकीला परत ताईकडे पाठवायचा विचारही तिच्या मनाला शिवून गेला. परंतू इथेही संकेतने बाजी मारली. “माझ्या केतुडीचा पायगुण म्हणून बचावलो” असं म्हणत त्याने केतकीचा गालगुच्चा घेतला आणि छोटी केतकी गोड हसली. 

स्मिता आज सकाळपासून जरा निवांत होती. तिच्या वागण्या- बोलण्यातही सूक्ष्म प्रसन्नतेची झालर दिसत होती. एरवी सकाळी तिला वेळच नसायचा. नाश्ता, संकेतचा डबा, त्याची तयारी, केतकीच्या कॉलेजची तयारी… स्मिताचं मॉर्निंग शेड्यूल अगदी टाईट… सगळे घरातून निघताच ती पेपर वाचायला बसली.

स्मिताच्या लग्नाला दहा वर्षे झाली तरी तिला मूल बाळ नव्हते. ही एक गोष्ट सोडल्यास तिच्या आयुष्यात दुःख म्हणून तिने पाहिले नव्हते. संकेत खूप समंजस आणि प्रेमळ होता. त्याचा व्यवसायही भर वेगात दौडत होता आणि स्मिता स्वतः एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये कामाला होती.

केतकी स्मिताच्या मोठ्या बहिणीची तिसरी मुलगी. तिचा जन्म झाला आणि ताईचा नवरा गेला. पांढऱ्या पायाची पोर म्हणून ताई तिच्याकडे बघेनाशी झाली. तान्ही केतकी दिवसभर पाळण्यात रडत असायची. केतकीची थोरली बहीण नोकरी करायची आणि दुसरी कॉलेज… त्यामुळे केतकीकडे बघायला ताईशिवाय घरी कुणीच नसायचं. केवळ मुलगा होईल या आशेवर केतकीचा जन्म…

तान्ह्या केतकीचे हाल स्मिताला बघवत नव्हते, पण उपायही सुचत नव्हता. ताईला समजवायचा तिने खूप प्रयत्न केला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. तिच्या मनात एक विचार होता पण तो कितपत बरोबर, हे तिला समजत नव्हते. शेवटी संकेतनेच हा विषय काढला. आणि केतकीला दत्तक घ्यायचे दोघांनी ठरविले. 

ताईकडे ती या विषयी बोलताच, ताई तिच्यावर डाफरली, “गुरूजींनी सांगितलंय, पांढऱ्या पायाची आहे ती, वाट्टोळं करील घराचं! कशाला विषाची परीक्षा घेतेस?” 

स्मिता श्रद्धाळू होती, त्यामुळे काही प्रमाणात या गोष्टींवर तिचा विश्वास होता. “पण काही झालं तरी केतकी आता माझी जबाबदारी” असं म्हणत संकेतने ‘केतकी संकेत वाडकर’ असं तिचं नाव नोंदवलं आणि केतकी स्मिता-संकेतची मुलगी झाली. केतकीला पूर्ण वेळ देता यावा म्हणून स्मिताने नोकरीही सोडली.
देवाच्या मनात तरी काय होतं, कोण जाणे! केतकी घरी येताच महिन्याभरात संकेतचा अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून बचावला. स्मिताच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. केतकीला परत ताईकडे पाठवायचा विचारही तिच्या मनाला शिवून गेला. परंतू इथेही संकेतने बाजी मारली. “माझ्या केतुडीचा पायगुण म्हणून बचावलो” असं म्हणत त्याने केतकीचा गालगुच्चा घेतला आणि छोटी केतकी गोड हसली. 

वर्षे सरत होती. एक ताई सोडल्यास या घटना कुणाच्याच लक्षात नव्हत्या. केतकी लिटरेचरमधून ग्रॅज्युएट झाली. तिच्या एकविसाव्या वाढदिवसाचं निमित्त साधून संकेतने जंगी पार्टी दिली. ती पार्टी बघून ताईचे डोळे दिपून गेले तरी तिच्या मनात अढी होतीच.

इतक्या वर्षात स्मिता ताईकडे जायचं टाळायची, ती केतकीला टोचून बोलेल, टोमणे मारील, याची तिला सतत भिती असायची. पण आज ती ताईकडे जाणार होती. लगेच तयार होऊन तिने पेपर पर्समध्ये ठेवला. गाडीतही तिचा स्मृतीपट चालूच होता, आज ती फक्त आठवणींमध्ये जगत होती. सगळ्या घटना जुळवत होती, समाधान मानत होती. 

ताईच्या घरी येताच, तिने ताईसमोर तो पेपर धरला, आणि ताईच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. पहिल्या पानावरची ती बातमी “केतकी वाडकरच्या ‘पायगुण’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर!”

संबंधित बातम्या