राजस्थानचे किल्ले: रणथंभोर

Forts of Rajasthan Ranthambore : रणथंभोरचा किल्ला हा युनेस्कोच्या सूचीत नोंद झालेला एकमेव वनदुर्ग आहे. येथील दाट झाडी या किल्ल्याला अधिक संरक्षण प्रदान करते. हा किल्ला कुणी आणि कधी बांधला यावर इतिहासकारांत एकमत नाही.
Forts of Rajasthan Ranthambore
Forts of Rajasthan RanthamboreDainik Gomantak

डॉ. संगीता साेनक

रणथंभोरचा किल्ला हा युनेस्कोच्या सूचीत नोंद झालेला एकमेव वनदुर्ग आहे. येथील दाट झाडी या किल्ल्याला अधिक संरक्षण प्रदान करते. हा किल्ला कुणी आणि कधी बांधला यावर इतिहासकारांत एकमत नाही.

पहाटे पहाटे साडेपाच वाजता आम्ही रणथंभोरच्या जंगलसफारीला निघालो. रात्रीच्या शेकोटीची ऊब आठवत कडाक्याच्या थंडीत गरम कपडे अंगात चढवून बाहेर पडलो होतो. जंगलसफारीला जायचे असले की आम्ही अगदी पहाटे तयार होतो. म्हणजे शिकारीसाठी पहाडातून खाली आलेले प्राणी आणि पक्षी बघायची संधी मिळते. गरम, ऊबदार कपड्यांतूनही थंडी बरीच जाणवत होती. राजस्थानमध्ये फिरायचा पहिलाच प्रसंग! जंगलसफारींना नुकतीच सुरुवात केलेली. रणथंभोरच्या जंगलाबद्दल ऐकल्यामुळे या जंगलाचे आम्हा तिघांनाही आकर्षण निर्माण झाले होते. अंगाभोवती शाल लपेटून घेत आम्ही थंडीला सामोरे जायचा प्रयत्न करत होतो.

रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांसाठी खुल्या असलेल्या भागाचे नऊ विभाग केले होते. जंगलात शिरायला मात्र एकच मार्ग होता. हा ‘कॉमन रूट’ (सार्वजनिक मार्ग) म्हणूनच संबोधला जायचा. इथून थोडे पुढे रानात गेल्यावर मात्र प्रत्येक जीपला एक ठराविक विभाग आखून दिला जायचा. एखाद्या जीपने उल्लंघन केले तर त्या जीपच्या चालक आणि मार्गदर्शक (गाइड) वर कडक कारवाई केली जायची.

Forts of Rajasthan Ranthambore
पोर्तुगीजांचे धाडसी पलायन

राष्ट्रीय उद्यानाचे फाटक उघडल्याबरोबर आम्ही आत आलो. फाटकातून आत शिरणारी आजची आमची पहिलीच जीप होती. आम्हाला दिलेल्या विभागात या दिवसांत वाघाची हालचाल दिसली होती. आज वाघ दिसायची दाट शक्यता होती.

अजूनपर्यंत आम्ही जंगलात मोकळेपणे फिरणारा वाघ बघितला नव्हता. नुसत्या कल्पनेनेच अंगावर शहारे येत होते. आजूबाजूच्या रानातील गंधाचा आस्वाद घेत आमच्यासाठी नेमलेल्या विभागात शिरल्यानंतर वाघ बघायला आम्ही तिघेही स्वतःला तयार करत होतो. फाटकातून नुकतेच आत शिरलो होतो, एव्हढ्यात आमच्या चालकाने अचानक जीपला ब्रेक लावून ती थांबवली आणि ‘शेर’ असे तो जोराने ओरडला.

आम्ही समोर पाहिले. आमच्या जीपपासून जेमतेम एक फुटाच्या अंतरावर एक सुंदर वाघ दिमाखात उभा होता. आमच्या मार्गदर्शकने आम्हाला सांगितले की हा सुलतान आहे, मछलीचा छावा. एके काळी मछली या जंगलाची राणी होती. कितीतरी माहितीपट तिच्यावर निघाले होते. आज सुलतानला इतक्या जवळ बघून आमची अगदीच त्रेधातिरपीट झाली होती. नेमलेल्या विभागात शिरायच्या आधी ‘कॉमन रूट’वरच एव्हढे राजबिंडे दर्शन घडेल याची कल्पनाही केली नव्हती. माझ्याजवळचा कॅमेरा अजून उघडला नव्हता.

उघडायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर आलेले थंडीचे आवरण अजून गेले नव्हते. आम्हाला बघून बिलकुल विचलित न झालेला सुलतान अजूनही तिथे उभा होता. अजून बाकीच्या जीप यायला सुरुवात झाली नव्हती. क्षणातच त्याने समोरच्या झाडावर नखांचे ओरखडे काढले आणि झाडावर मूत्राचा फवारा सोडत आपले क्षेत्र आखून घेतले.

आमच्याकडे बघत बघत चार पाच मिनिटांतच तो आपल्याच तोऱ्यात तिथून निघून गेला. त्यानंतर त्या दिवशी आम्ही अजून एक वाघ चांगला तासभर बघितला. नंतरच्या अनेक जंगल सफारीतही अजून खूप वाघ बघितले. पण त्या दिवशीचे सुलतानचे दर्शन आम्ही अजूनही विसरू शकलो नाही.

दूरवरून आम्हाला रणथंभोरचा किल्ला दिसत होता. रणथंभोरचा किल्ला हा युनेस्कोच्या सूचीत नोंद झालेला एकमेव वनदुर्ग आहे. येथील दाट झाडी या किल्ल्याला अधिक संरक्षण प्रदान करते. या वनात फिरताना सारखे जाणवत होते की ही जयपूरच्या महाराजांची शिकारीची जागा होती. पदम तलाव, मलिक तलाव आणि राजबाग असे तीन तलाव रणथंभोरच्या या राष्ट्रीय उद्यानात दिसतात. दक्षिणेकडून वाहणारी चंबळ नदी आणि उत्तरेकडून वाहणारी बाणस नदी या प्रदेशातील जलवाहनाचे मुख्य स्त्रोत आहेत. या राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातच विंध्य पठार अरवली पर्वतरांगांना जोडले गेलेय. येथील एक महत्वाचे भूवैज्ञानिक वैशिष्ट्य म्हणजे जेथे विंध्य पठार अरवली पर्वतरांगांना मिळते, तेथे निर्माण झालेली भूवैज्ञानिक भेग.

सवाई माधोपूरपासून जवळजवळ 14 कि.मी. अंतरावर थंभोर टेकडीवर असलेल्या या किल्ल्याला खडकाळ टेकड्या आणि घनदाट जंगल यामुळे नैसर्गिक संरक्षण मिळते. याला जोड म्हणून रणथंभोरच्या शासकांनी तीव्र उतारावर किल्ल्यावर जाण्यासाठी बांधलेला एक अरुंद, लांब, नागमोडी वळणाचा रस्ता आणि किल्ल्यावर जायच्या या रस्त्यावर वाट रोखणारी चार मजबूत प्रवेशद्वारे- नौलखा पोळ, हाथी पोळ, गणेश पोळ, आणि अंधेरी पोळ ही चार प्रवेशद्वारे या एकमेव रस्त्याला तीक्ष्ण कोनात बांधलेली असल्यामुळे एखाद्या मोठ्या सैन्याला किल्ल्यावर चढाई करणे जवळजवळ अशक्यच होते. सत पोळ, सूरज पोळ, आणि दिल्ली पोळ असे अजून तीन दरवाजे किल्ल्याचे रक्षण करतात. हा किल्ला राजपूत संरक्षण शैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

हा किल्ला कुणी आणि कधी बांधला यावर इतिहासकारांत एकमत नाही. अनेक राजपूत आणि मोगल शासकांनी येथे सत्ता गाजवली. पण येथे अस्तित्वात असलेली सगळ्यात जुनी इमारत म्हणजे हम्मीर महाल किंवा हम्मीरदेवांचा (सा.यु. 1282-1301) वाडा. चौहान वंशीय हम्मीर देवांचे १९ वर्षांचे शासन म्हणजे या दुर्गाचा सुवर्णकाल मानला जातो. दुर्गाच्या आत राणी महाल, सुपारी महाल, दुल्हा महाल, बादल महाल अशा अनेक इमारती आणि लक्ष्मीनारायण मंदिर, अन्नपूर्णा मंदिर, शिवमंदिर, पाचव्या शतकात (सा.यु.) बांधलेले गणेश मंदिर, रघुनाथजी मंदिर, दिगंबर जैनमंदिर अशी मंदिरे आहेत. येथे एक मशीद, दर्गा, धान्याची कोठारे आणि बगीचे आहेत. येथील छत्र्या, राजपुतांनी स्मृतीप्रित्यर्थ बांधलेल्या वास्तू, खास वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यापैकी काही छोट्या छत्र्या अकाली कालवश झालेल्या राजपुत्रांच्या स्मृतिस्तव बांधलेल्या आहेत. अठराव्या शतकात (सा.यु.) काछवाह राजपूतांनी बांधलेली लाल वालुकाश्मानी आणि कोरीव कामाने सजवलेली नक्षीदार ‘बत्तीस खांबा छत्री’ हे येथील एक प्रमुख आकर्षण आहे. दुर्गावर जंगली तलाव, सुखसागर, पद्मावती तलाव, राणी तलाव असे अनेक तलाव आहेत. येथे काही कचेऱ्या (कामकाजाची जागा) अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत. यापैकी एक आहे दिल्ली पोळाजवळील हम्मीरदेवांची कचेरी.

पण केवळ किल्ल्यांचे स्थापत्य आणि येथील इमारतींचे वास्तुशास्त्र महत्वपूर्ण नाही. तर हे किल्ले राजपूत संस्कृतींचे प्रतिनिधित्व करतात. किल्ल्यांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर अशा विविध जागांची निवड करण्यापासून ते संरक्षण यंत्रणेचे संपूर्ण नियोजन प्रदर्शित करणारे हे किल्ले राजपूतांच्या विश्वासप्रणाली आणि विचारसरणी प्रतिबिंबित करतात. मानवी इतिहासातील एक महत्वाचा टप्पा म्हणून रणथंभोर किल्ल्याला राजस्थानातील इतर पाच किल्ल्यांसोबत 2013 मध्ये युनेस्कोच्या यादीत सूचीबद्ध केले गेले. युनेस्कोच्या यादीत सूचीबद्ध झालेला रणथंभोर हा एकमेव वनदुर्ग आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com