कधी पाहायला मिळेल हा सोनचाफा?

चाफा प्रथम भेटला गाण्यातच!
कधी पाहायला मिळेल हा सोनचाफा?
FrangipaniDainik Gomantak

चाफा प्रथम भेटला गाण्यातच! ‘चाफा बोलेना, चाफा चालेना...’ हेच ते सुप्रसिद्ध गीत! लहान असताना या गाण्यात प्रतिमारूपानं आलेला चाफा फारसा समजायचा नाही. कळण्याचं ते वयही नव्हतं. गाण्याची चाल आणि चाफा यातच मन गुंतलेलं. पुढे समज आल्यावर डॉ. द. भि. कुलकर्णी यांचा ‘ताटी उघडा चापेश्वरा’ आणि डॉ. श्यामला मुजुमदार यांच्या लावण्ययोगमधील ‘चाफा’ हे लेख वाचले. त्यामुळं कवी बी यांच्या कवितेतला प्रतिमारूपानं आलेला चाफा समजावून घेता आला. शाळेत असताना बालकवींची ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ ही कविता खूप आवडायची आणि आजही तितकीच प्रिय आहे. या कवितेतील ‘सुवर्णचंपक फुलला विपिनी...’ या ओळीपाशी मन रेंगाळायचं. सुवर्णचंपक म्हणजे सोनचाफा असा अर्थ कवितेखाली दिलेला होता.

Frangipani
FrangipaniDainik Gomantak

ऐकलेल्या, पाठ असलेल्या कवितेतील चाफ्याबद्दल खूपच कुतूहल वाटायचं. कारण, पूर्वी मराठवाड्यातल्या माझ्या माहेरच्या भागात सुवर्णचंपक म्हणजे सोनचाफा मी कधी पाहिलाच नव्हता. होता तो पांढऱ्या फुलांचा खूरचाफा/देवचाफा! मध्यभागी पिवळसर रंग असलेली ही पांढऱ्या रंगाची सुगंधी फुलं! देवचाफा दिसला की आठवते ती पद्मा गोळेंची ‘चाफ्याच्या झाडा’ ही कविता! कवितेतल्या नायिकेनं किती आपलेपणानं स्त्रीमन मोकळं केलंय चाफ्याकडे? हा चाफा देवचाफाच! कारण, कवयित्रीनं कवितेत ‘फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा रंग...’ असा स्पष्ट उल्लेख केला आहे.

Frangipani
FrangipaniDainik Gomantak

शाळेत असताना बालकवींची ‘श्रावणमास’ ही कविता जेव्हा जेव्हा म्हणत असे तेव्हा हा सुवर्णचंपक आठवायचा. सुवर्णचंपक फुलला विपिनी... ही ओळ आली की वाटायचं, कधी पाहायला मिळेल हा सोनचाफा? सहावीत असताना मी प्रथमच सोनचाफ्याची फुलं पाहिली; पण बाटलीबंद अवस्थेतली! माझी वैजयंतीमामी मूळची अलिबागची. तिला सोनचाफा अतिशय प्रिय! चाफ्याविषयी, त्या सुगंधाविषयी ती भरभरून सांगायची. एकदा तिनं माहेरहून येताना बाटलीबंद सोनचाफ्याची फुलं आणली. शोकेसमध्ये ठेवण्यासाठी! ती फुलं पाहून जीव किती हरखून गेला होता! बाटलीबंद असली तरी किती सुंदर दिसत होती ती फुलं! पण, या फुलांना ना कधी हातात घेता यायचं, ना कधी सुगंध घेता यायचा.

Frangipani
FrangipaniDainik Gomantak

मर्यादित नेत्रसुख तेवढं मिळायचं. पण, माणसाचं मन स्पर्श आणि गंध संवेदनेसाठी अधीर असतं ना! एकदा आमच्या शाळेची सहल गेली होती गोव्याला. सोनचाफा मी प्रथम हातात घेऊन पाहिला तो तिथं! ओंजळीत फुलं घेऊन भरभरून सुगंध घेतला तेव्हा मिळालेलं सुख विलक्षणच! व्वा! कितीतरी दिवसांची ती भूक भागली. आजही मन भूतकाळात जाऊन ते सुख अनुभवतं. भूतकाळात मन अडकू नये, असं म्हणतात; पण झाडं, पानं, फुलं... अशा गोष्टी आठवल्या की मन भूतकाळात जाऊन अधिकच प्रसन्न होतं.

सोनचाफा मोठ्या प्रमाणात मी पाहिला तो पश्चिम महाराष्ट्रात! आता तर वृक्षारोपण मोहिमेत तो हमखास असतो. आंब्याच्या अंबेश्वर देवराईत केवढा उंच, भव्य, राजबिंडा सोनचाफा आहे! त्याचं भारदस्त, देखणं रूप बघता क्षणीच मन प्रसन्न होऊन जातं. अस्सल भारतीय असलेल्या सदाहरित सोनचाफ्याचं खोड सरळसोट वाढणारं! आणि वाढतो देखील उभाच्या उभा! फांद्यांचा दाट संभार ऊर्ध्वगामीच! थोडी हिरवट, राखाडी, तपकिरी अशा रंगाची याची खडबडीत साल! पानं साधीच.

Frangipani
FrangipaniDainik Gomantak

एकांतरित आणि लांबट भालाकृती! पानांच्या कडा छोट्या छोट्या लाटांसारख्या! पानांची देठाकडची बाजू थोडी पन्हाळीसारखी. कोवळ्या पानांवर असतो एक हिरवट उपपर्णांचा टोप. ही उपपर्णे थोड्याच दिवसांत गळतात. पावसाळा सुरू होतो आणि चाफा बहरू लागतो. मादक गंधाची, सोनपिवळी ही फुलं आकारानं साधारण पाच-सहा सें.मी.लांबीची. चाफ्याचे पुंकेसर असतात चपटे, तर स्त्रीकेसर असतात अगदी छोटे छोटे. फुलाच्या आतील पुष्पदंडावर रचलेले. खरं तर, परिदलातल्या पुंकेसर, स्त्रीकेसराची ही वैशिष्ट्यपूर्ण ठेवण जरूर पाहावी. पण होतं काय, चाफ्याच्या मादक गंधानं मन धुंद धुंद होतं. त्यामुळं कसली रचना आणि कसलं काय! हो नं? रंगही किती सुंदर असतो! प्रसन्न, तेजस्वी सुवर्णकांत!

Frangipani
FrangipaniDainik Gomantak

साधारणपणे माणसाचं मन सुगंधाकडं ओढ घेतं. पण एखाद्या विरक्ताला रंग भावतो. ज्ञानदेवांना भावला तो सुवर्णकांत! त्यामुळं त्यांनी रूपक योजलं ते सोनचाफ्याचं! ज्ञानेश्वरीतील सहाव्या अध्यायात शब्दचित्र रेखाटलेल्या काही ओव्या आहेत. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर योग्यांच्या अंगावर अलौकिक स्वर्गीय कांती, तेज पसरते. हे शब्दचित्र रेखाटताना ज्ञानदेवांना कनकचंपा म्हणजे सोनचाफाच आठवतो. ते म्हणतात, ‘तो कनकचंपकाचा कळा| की अमृताचा पुतळा| नाना सासिंनला मळा| कोंवळिकेचा||’ (६.२५७) श्री. अ. दा. आठवले यांनी त्याचा ओवीबद्ध अनुवाद अतिशय सुंदर केला आहे, तो असा... ‘सोनचाफ्याची कळी सुंदर| वा अमृताचा पुतळा थोर| वा त्याच्या रूपे आला बहर| कोमलतेच्या मळ्याशी||’ (६.२८६)

फुलांचा बहर ओसरला की एक-दीड सें.मी. आकाराचे, गोलसर फळांचे घड लहडतात. पक्व फळांतून तपकिरी, तांबूस रंगाच्या बिया बाहेर पडतात. चाफ्याची पंचांगं अत्यंत औषधी, बहुपयोगी. फुलांचं अत्तरही प्रसिद्धच आहे. त्याचं लाकूड हलकं असल्यानं साध्या कामासाठी ते वापरलं जातं.

Frangipani
FrangipaniDainik Gomantak

सोनचाफा आठवला की मला कवी भूषण आठवतोच.

घडलं असं, भर दरबारात औरंगजेबानं कवी भूषणाला काव्य ऐकवण्याचं फर्मान सोडलं. अर्थातच स्तुतिकाव्य! कवी भूषणाची छत्रपती शिवाजीराजांवर अपार श्रद्धा! पण समोर तर बादशाह औरंगजेब! आता? कवी भूषणाची बुद्धी अतिशय तल्लख! त्यांनी चटकन शीघ्रकाव्य रचलं.. ते काव्य म्हणजे ‘शिव बावनी!’ त्यात त्यांनी औरंगजेबाला भ्रमराची उपमा दिली आणि राजेमंडळी चमेली, बेलाप्रमाणे असून सरदार अमीर कुंद फुलांप्रमाणे आहेत आणि शिवराय हे चाफा आहेत. भ्रमररूपी औरंगजेब फुलांवर अधिराज्य गाजवत आहे. यात एक खूप मोठी मेख दडलेली आहे. चाफ्याच्या फुलावर कधीच भ्रमर बसत नाही. कवी भूषणानं औरंगजेबाला न दुखावता छत्रपती शिवरायांचा यथोचित सन्मान राखला. त्या ओळी अशा, ‘भूषन भनत सिवराज वीर तैंही देस देसन में राखी सब दच्छ़िन की लाज है, त्यागे सदा षट-पद पद अनुमानि यह, अलि नवरंगजेब तो चंपा सिवराज है’ असा हा चाफा काव्यात, साहित्यात आणि मनात दरवळत राहणारा.

- चित्कला कुलकर्णी

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com