मैत्रत्वाची ऊर्जा पेढी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

खाद्या मनुष्याच्या जीवनात जर जिव्हाळ्याची नाती नसतील, तर त्या व्यक्तीच्या जीवनाला काहीच अर्थ उरत नाही. संकटसमई नातीच आपल्याला उपयोगी पडतात. अशा अनेक महान नात्यांपैकी एक नाते आहे ते म्हणजे मैत्रीचे नाते.

खाद्या मनुष्याच्या जीवनात जर जिव्हाळ्याची नाती नसतील, तर त्या व्यक्तीच्या जीवनाला काहीच अर्थ उरत नाही. संकटसमई नातीच आपल्याला उपयोगी पडतात. अशा अनेक महान नात्यांपैकी एक नाते आहे ते म्हणजे मैत्रीचे नाते. हे नाते रक्ताचे जरी नसले तरी त्याचे महत्त्व कमी होत नाही. आज या नात्याविषयीची कल्पना सुस्पष्ट करण्याची इच्छा झाल्याने हा लेखनप्रपंच. 

असं म्हणतात की कोणतेही रक्तसंबंध नसताना जे नाते जुळते, ते मैत्रीचे नाते असते. मैत्री ही मुद्दाम करावी लागत नाही. ती आपोआप होते. समोरच्या व्यक्तीमधील विशेषता जाणवली, की त्या व्यक्तीशी ओळख होते आणि हळूहळू त्या ओळखीचं रूपांतर निरपेक्ष, निखळ मैत्रीत होतं. मैत्री ही केवळ दोन पुरुष किंवा दोन स्त्रियांपुरती मर्यादित नसून ती एक पुरुष व स्त्री यांमध्येसुद्धा असू शकते. अशा मैत्रीचं एक वेगळंच महत्त्व असतं.

आपल्या भारतीय इतिहासामध्ये आदर्श मैत्रीची अनेक उदाहरणं आहेत. जसे की राम-सुग्रीव, कृष्ण-सुदामा, कर्ण-दुर्योधन, कृष्ण-अर्जुन. श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांचीदेखील फार चांगली  मैत्री होती. यावरून स्पष्ट होतं की एका चांगल्या मैत्रीत लिंग, व्यक्तीची पत, याला काहीही महत्त्व नसतं. खरा मित्र तोच जो आपल्याला संकटसमयी उपयोगी पडतो, आपले अवगुण लपवून सद्गुण समोर आणतो. काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांमध्ये एक वाक्य वाचनात आलं, ''आयुष्य नावाची स्क्रीन जेव्हा low battery दाखवते आणि नातेवाईक नावाचा charger मिळत नाही, तेव्हा powerbank म्हणून जे तुम्हाला वाचवतात, ते मित्र असतात.''  यापेक्षा मैत्रीचं मार्मिक विश्लेषण असूच शकत नाही. 

आजकाल एक मुलगा व एक मुलगी यांच्यात मैत्री असण्यावर विविध प्रकारची मते मांडली जात आहेत. त्यामुळे २१व्या शतकातला एक युवक म्हणून याविषयी काही विचार मी मांडत आहे. मी स्वतः असा अनुभव घेतला आहे की एक मुलगा जर एखाद्या मुलीसोबत असेल व मनमोकळेपणाने बोलत, वागत असेल तर त्याकडे एका विशिष्ट नजरेने पाहिलं जातं, जे माझ्यामते योग्य नाही. वरील मैत्री ही एक वेगळ्या भावना असलेली आहे म्हणून ती विशेष आहे. जर दोघांचं मन शुद्ध असेल, तर अशी मैत्री असण्यात काय गैर आहे? का समाज  अजून ही गोष्ट स्वीकारत नाही? हे कुठेतरी बदललं पाहिजे. कारण मैत्री हे एक अनन्यसाधारण असं नातं आहे. त्यात कोणतंही बंधन असता कामा नये. 
वरील सर्व विचार जे मी मांडले ते एक युवा पिढीचा प्रतिनिधि म्हणून मांडले आहेत. माझं माझ्या समवयस्क मित्र-मैत्रिणींना आवाहन आहे की अशा विविध विषयांवर त्यांनी व्यक्त व्हावं, जेणेकरून आपल्या सर्वांच्या कल्पना सुस्पष्ट होतील व बऱ्याचदा आपला आपल्या मोठ्यांशी जो विसंवाद होतो, ते टळेल. 
 

संबंधित बातम्या