House Wife: एक पूर्णवेळ 'गृहिणी' ही मॅनेजमेंट गुरूच!

'ती' च्यामुळेच घराला घरपण येतं!
House Wife: एक पूर्णवेळ 'गृहिणी' ही मॅनेजमेंट गुरूच!
House WifeDainik Gomantak

"अगर आप वर्किंग वुमन नहीं है तो हाउस वाइफ कहकर अपना परिचय न दें। याद रखें, आपकी शादी घर के साथ नहीं हुई है, आप घर की रानी है। तो अपना परिचय क्वीन ऑफ हाऊस कहकर दें।" तरुणाईच्या गळ्यातले ताईत, प्रसिद्ध लेखक चेतन भगत ह्यांनी स्त्रीवर्गाला खास करून पूर्णवेळ गृहिणींना उद्देशून लिहिलेलं हे वाक्य किती अर्थपूर्ण आहे ना?

बऱ्याच वेळा अनेक पूर्णवेळ गहिणींना आपण 'हाऊस वाईफ' असल्याबद्दल एक 'इन्फीरियोरिटी कॉम्प्लेक्स' निर्माण झालेला असल्याचं आढळतं. एखादा फॉर्म भरताना 'पूर्णवेळ गृहिणी' असं लिहिते वेळी न्यूनगंडाची भावना नकळत व्यक्त होताना आढळते. शिकून सवरून फक्त 'रांधा वाढा, उष्टी काढा' एवढंच आपल्या वाट्याला... अशी अनेकींची कुरकूर असते. नोकरीवाल्या, उद्योग-धंदा करणाऱ्या महिला घर- नोकरी सांभाळताना तारेवरची कसरत करत असतात, आपल्या परीने संसाराला हातभार लावत असतात हे कौतुकास्पदच. पण असं जरी असलं तरी पूर्णवेळ गृहिणींनी स्वतःला कमी लेखणं हेच मुळात चुकीचं आहे.

एक पूर्णवेळ गृहिणी (women) ही मॅनेजमेंट गुरूच! कळत - नकळत व्यवस्थापनाच्या अनेक शाखा ती सफाईदारपणे हाताळत असते. घरातील कर्ती मंडळी संपूर्ण घराची जबाबदारी तिच्यावर सोडून बाहेर पडत असतात आणि ती घराचं व्यवस्थापन चोखपणे बजावत असते. गमतीचा भाग म्हणजे तिच्या सदैव अस्तित्वामुळे घरच्या मंडळींना मुख्य दरवाजाच्या डुप्लिकेट चाव्या सांभाळण्याची झंझटच नसते. तिच्यामुळेच घराचं दार येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी सदैव उघडंच असतं, ते सुद्धा 'अपॉइंटमेंट'शिवाय! मुलांच संगोपन करताना, त्यांना पावलोपावली घडवताना ती चाइल्ड केअर मॅनेजमेंट उत्तमरित्या पार पाडत असते. पाखरांना पाळणाघर नशिबी येत नसतं. मुलांची जडण-घडण पाहाण्याचं भाग्य तिला लाभलेलं असतं. कमावत्या बाईला आर्थिक स्वातंत्र्य असतं.

पण ही दिलेल्या पैशातून घर, बाजार, देणं- घेणं, खर्चाचा ताळमेळ सांभाळत ‘फायनान्स मॅनेजमेंट’मधलें आपले कौशल्य सिद्ध करत असते. दुपारचं गरमा-गरम जेवण अन संध्याकाळचे झक्कास, स्नॅक्स घरच्या मंडळीना तिच्यामुळेच प्राप्त होत असतात. दमून- भागून नोकरी करून आलेल्या गृहिणीला गरमा-गरम शिरा अन् कुरकुरीत कांदा भज्यांची फर्माईश करणं सोपं असतं का? तिच्या कपाळावरल्या आठ्या पाहून पोटातील इच्छा ओठांवर येणेच कठीण. कामवाल्या बाईंना पूर्णवेळ गृहिणींची घरं आवडत नसतात. कारण त्याना हिच्या घरांत पळवाटा काढायची संधी मिळत नसते. तिच्या कामाचं योग्य सुपरव्हिजन करून 'सुपरवायजरी मॅनेजर'चं कामही पार पाडत असते ती एक पूर्णवेळ गृहिणीच. आरोग्य व्यवस्थापन सांभाळताना कुटुंबाच्या रोगी जीवनासाठी कुठेही कमी न पडू देणारी! एवढीं कर्तव्ये बजावताना 'ती' स्वतःला कमी का लेखत असते ? स्वतःची बलस्थाने ओळखण्यात ती कुठं कमी पडते?

House Wife
लोहिया मैदानावर गोवा मुक्तिगाथा उद्घोषित

नोकरी (Job) करणाऱ्या महिलाच जागरूक असतात, त्यांचं सामान्यज्ञान उत्तम असतं, सामाजिक, राजकीय घडामोडीची माहिती असल्याने त्या चारचौघांत आत्मविश्वासाने बोलू शकतात... हा गैरसमज तिनं पुसून टाकायला हवा. असं असतं तर एखादी सामान्य गृहिणी 'कौन बनेगा करोडपती' सारख्या शो मधून करोडपती महिला बनलीच नसती. घर-संसार सांभाळून छोटा- मोठा उद्योग करून एखादी सामान्य गृहिणी उद्योगी महिला हे नाव कमावू शकलीच नसती. इच्छा तिथे मार्ग, असं म्हणतात. मग हा मार्ग शोधणं तिच्याच हाती असतं, हेही तेवढंच खरं. एक मात्र खरं कि नोकरीवाल्या महिलांना कामाचा मोबदला मिळत असतो. त्यांच्या कामाची पोचपावती पैशांतून, प्रमोशनमधून मिळत असते. पण गृहिणींना मात्र मोबदला सोडाच, दोन अक्षरी 'थँक यू' मिळणं सुद्धा बऱ्याचदा कठीण असतं. ती भुकेलेली असते कौतुकाच्या चार शब्दांसाठी. तिला तिच्या अस्तित्वाची, कार्याची जाणीव करून दिली तरी बस्स ! प्रत्येकवेळी गृहिणीला 'गृहित' धरली नाही तरी तिचा न्यूनगंड घटवण्यात नक्कीच मदत होईल, हे नक्की.

असो, स्त्री-मग ती गृहिणी असो अथवा उद्योगी महिला- ती मुळातच सामर्थ्यवान. म्हणूनच तर परमेश्वरानं अनेक खाती तिच्याकडेच दिली. शिक्षणखाते सरस्वतीकडे, अर्थखाते लक्ष्मीकडे, अन्नखाते अन्नपूर्णादेवीने तर संरक्षण खाते दुर्गादेवीने सांभाळले. स्त्री ही कुटुंबरूपी किल्ल्याचा बुरूज. स्त्री आहे तर श्री आहे असं म्हटलं जातं, ते खोटं नव्हे. संसाररथाचं चाक बनून तिचा एक प्रवास कुटुंबासाठी सतत धावणारा, झिजणारा, समईतल्या वातीप्रमाणे तेवत राहाणारा असतो. जेव्हां एखादी स्त्री आजारी पडते तेव्हा तिचं पहिलं टेन्शन आजारपण नसून कुटुंबाचं जेवण असतं. तिच्यामुळेच घराला घरपण येतं. तर, सखींनो यापुढे आपली ओळख देताना ‘रानी हूँ आपन घर की... अशीच करून द्यायची बरं!

नीमा आमोणकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.