Ganesh Chaturthi 2021: प्राणप्रतिष्ठा दुपारपूर्वी करावी
Ganesh Chaturthi 2021: प्राणप्रतिष्ठा दुपारपूर्वी करावीDainik Gomantak

Ganesh Chaturthi 2021: प्राणप्रतिष्ठा दुपारपूर्वी करावी

वर्षांतील उत्साहाचा, उत्सवाचा असलेला सण म्हणजेच श्री गणेश चतुर्थी. सर्वत्र दीड, पाच, सात किंवा दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो.

घरात, चौकाचौकांतील गणपती मंडळांत गणेशोत्सव साजरा होत असला, तरी प्राणप्रतिष्ठापना झाल्याखेरीज गणेशोत्सवाला प्रारंभ होऊच शकत नाही. गणेशोत्सवातील सर्वांत महत्त्वाचा, अनिवार्य भाग म्हणजेच श्रींची स्थापना - प्राणप्रतिष्ठापना. प्राणप्रतिष्ठापना दुपारी जेवणापूर्वी करणे चांगले. श्री गणेश चतुर्थीच्या सकाळी सूर्योदयापासून दुपारी सूर्य मस्तकावर येईपर्यंत श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना होईल, याची सर्वांनी काळजी घ्यावी. दुपारचे जेवण करून सुस्तपणे संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत आपल्या लहरीप्रमाणे प्राणप्रतिष्ठा करणे, (घरी अथवा सार्वजनिक ठिकाणी) म्हणजे घरी आलेल्या प्रतिष्ठित पाहुण्याला उपाशी ठेवून आपण जेवून घेण्यासारखे आहे.

प्राणप्रतिष्ठा याचा अर्थ आपण बाजारातून, दुकानातून आणलेल्या मातीच्या, शाडूच्या मूर्तीत जीव ओतणे, आपल्या पूजनासाठी ती मूर्ती सजीव बनविणे. मातीच्या गोळ्यालाच (पृथ्वीपासून) मातीपासून घडवल्यामुळे ‘पार्थिव’ म्हणतात, म्हणूनच या व्रताचे नाव ‘पार्थिव गणपती पूजन’ असे आहे.

ज्यांना पूजा सांगण्यासाठी गुरुजी मिळू शकत नाहीत, त्यांनी शुचिर्भूत म्हणजेच स्वच्छ (शक्‍य झाले तर पितांबर, धोतर) कपडे घालून खांद्यावर शाल, उपरणे, टॉवेल यांसारखे उपवस्त्र घेऊन ‘श्रीं’च्या मूर्तीसमोर (श्रींची मूर्ती चौरंगावर स्वच्छ रुमाल/कापडावर नीट ठेवावी.) पूर्व अगर पश्‍चिमेला तोंड करून पाटावर/आसनावर बसावे. सर्वप्रथम स्वतःच्या मस्तकावर गंधाचा, कुंकवाचा, शेंदूर, अष्टगंधाचा टिळा लावावा. घरच्या देवांना (शक्‍यतो दोन पाने, सुपारी, पाच किंवा एक रुपयाचे नाणे, असा विडा व नारळ ठेवून) नमस्कार करावा. घरातील वडीलधारी व्यक्तींना (सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये समाजातील ज्येष्ठ व्यक्तींना) नमस्कार करावा. ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतल्यानंतरच पूजेला बसावे. वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घेतल्याशिवाय पूजेसारखे महत्त्वाचे काम सुरू करू नये. या संस्कारांचा चांगला परिणाम आपल्या पुढच्या पिढीवर होतो.

स्वच्छ पळी-भांड्यातील पाण्याने आचमन करून (तीन वेळा पोटात पाणी घ्यावे व चौथ्या वेळी हातावर पाणी सोडून उष्टा हात स्वच्छ करावा.) प्राणायाम, गायत्री जपासह चौरंगावर आपल्या उजव्या बाजूला दर्शनी कोपऱ्यात मांडलेल्या नारळाच्या/सुपारीच्या गणपतीवर अक्षता व फुले वाहावी. त्यानंतर,

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभः ।

निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा ।।

अशी प्रार्थना करावी. मी आज गणेश चतुर्थी व्रतासाठी पार्थिव गणेशमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा विधी करीत आहे, असा संकल्प करावा.

शुभंकरोती कल्याणं आरोग्यं धनसंपदाम्‌।

शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते।।

या मंत्राने समईच्या पायावर फळे, गंध, अक्षता वाहून ‘शत्रुबुद्धी’चा नाश व्हावा, अशी परमात्म्याजवळ प्रार्थना करावी. घंटेला गंध, फुले, अक्षता वाहावी. गणेशोत्सवात सज्जन लोक यावेत, राक्षसी वृत्तीचे, दुष्ट, गुंड पळून दूर जावेत यासाठी घंटा जोरात वाजवत प्रार्थना म्हणावी,

आगमार्थं तु देवानां गमनार्थ तु राक्षसाम्‌।

कुर्वे घंटारवं तत्र देवताव्हान लक्षणम्‌।।

यानंतरचा सर्वांत महत्त्वाचा भाग प्राणप्रतिष्ठा. ज्यांना मंत्रपाठ शक्‍य नसेल, माहित नसेल त्यांनी किमान

ॐ गं । गणपतये नमः ।

हा मंत्र म्हणत पूजेसाठी चौरंगावर स्थापन केलेल्या श्रींच्या मूर्तीच्या दोन्ही डोळ्यांना (दूर्वांची जुडी उजव्या हातातील बोटांनी धरून आणि तुपात किंचित बुडवून) दुर्वांकुरांनी अगदी थोडे तूप लावावे.

मूर्तीच्या हृदयावर (छातीच्या मध्यभागी) उजव्या हाताच्या बोटांच्या टोकांनी स्पर्श करून या गणेशमूर्तीमध्ये प्राण ओतले जावेत, अशी प्रार्थना करावी. निदान १५ वेळा ‘ॐ’काराचा जप करावा (यालाच ‘प्रणव’ म्हणतात.) श्री मंगलमूर्तीची सर्व कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये जीवंत व्हावीत, त्यांची वाणी, मन, त्वचा, नेत्र सचेतन क्रियाशील व्हावीत, अशी प्रार्थना करावी. (देवस्य प्राणः। इह स्थितः। ) ‘श्रीं’च्या मूर्तीवर गंध, अक्षता, फुले पुन्हा वाहून गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून विडा, नारळ यांवर पाणी सोडावे. असे केल्याने प्राणप्रतिष्ठेसारखा सर्वांत महत्त्वाचा विधी पूर्ण होईल.

पंचामृत स्नान

दूध, दही, गाईचे शुद्ध तूप, मध, साखर या पंचामृताचे स्नान मूर्तीला (दूर्वांनी अगदी हळूवार शिंपडून) घालावे. परत स्वच्छ पाण्याचे स्नान (दूर्वांनीच) घालावे. पंचामृत स्नानाची सांगता सहाव्या गंधोदकाने (गंधाचे सुवासिक पाणी) करावी. नवीन वस्त्र आणि जानवे घालून झाल्यानंतर फुलांनी सुवासिक अत्तर मूर्तीला लावावे. गुलाबपाणी शिंपडावे. सुवासिक चाफा, गुलाब, सोनटक्का, जाई-जुई, केवडा यांसारखी फुले उगाळलेल्या गंधात बुडवून आणि दूर्वांची जुडी अष्टगंध, शेंदूर यांत बुडवून ही फुले, दूर्वा मूर्तीला वाहाव्यात. फुले, दूर्वा यांच्या माध्यमांतूनच हळद, कुंकू इत्यादी परिमल (सुगंधी) द्रव्ये अर्पण करावी.

पूजेचे साहित्य

(पूजा साहित्य उत्तम प्रकारचे असण्याची प्रत्येकाने दखल घ्यावी.)

श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी श्रींच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बाजारातून खाली नमूद केलेल्या गोष्टी आणाव्यात. हे पूजेचे साहित्य निवडून, स्वच्छ करून पूजेच्या थाळीत, तबकांत, टोपल्यात नीट लावून ठेवावे.

Ganesh Chaturthi 2021: प्राणप्रतिष्ठा दुपारपूर्वी करावी
Ganesh Chaturthi 2021: दर्शनमात्रे मन-कामना पुर्ती

स्वच्छ हळकुंडे दळून केलेली हळद पूड (मोठी वाटीभर), उत्तम सुवासिक (महाराष्ट्रात पंढरपुरी) कुंकू ( लहान-मोठी वाटी), अष्टगंध डबी, शेंदूर डबी, बुक्का, गुलाल, रांगोळी, वासाची फुले (गुलाब, चाफा, जाई-जुई, शेवंती, कमळ, केवडा, सोनटक्का इत्यादी), निवडलेल्या दूर्वांची २१-२१ ची बांधलेली जुडी, पत्री पूजेसाठी वृक्षवल्लींची पाने, जानवी जोड, वीस ते पंचवीस विड्याची पाने, सुपारी नग -१०, बदाम - खारीक प्रत्येकी पाच, रुपयाची नाणी, खोबरे वाटी, गूळ, खोबरे बारीक किसून खसखस, खडीसाखर, खजूर-बेदाण्यासह पंचखाद्य (वाटी किंवा अधिक प्रसाद वाटण्यासाठी), उकडलेले/तळलेले अगर खव्याचे (पेढे) मोदक - २१, निरनिराळी फळे , अत्तर, गुलाब, गणपतीसाठी लाल/भगव्या रंगाचे नवीन वस्त्र, उद्‌बत्ती, तूप-वातीची दोन निरांजने, तेल-वात, समई, स्वच्छ निवडलेले तांदूळ - सव्वा किलो, नारळ (सोललेले) - पाच, कापूर डबी, चांदीचे/तांब्याचे/पितळेचे पळी-भांडे, ताम्हण, तबक, उगाळलेले चंदन - एक वाटी, शंख, घंटा, वस्त्राने झाकलेली केळी, कर्दळीच्या खांबांनी सजवलेला चौरंग, श्रींची मूर्ती, पूजा सांगण्यासाठी गुरुजी मिळाले असतील तर यथाशक्ती संभावना (दक्षिणा), गुरुजी मिळाले नाहीत आणि ध्वनिवर्धक लावून पूजा केली तर गुरुजींच्या नावे हा सन्मान गुरुगृही किंवा मंदिरांत पोहोचवावा.

चौरंग/टेबल ज्या खोलीत मांडलेले असेल त्या खोलीत (किंवा पूजा मंडपात) भरपूर निखाऱ्यावर धूप, ऊद, गुग्गुळ ही सुगंधी द्रव्ये टाकून वातावरण सुवासिक, प्रसन्न करावे. उद्‌बत्ती, निरांजने ओवाळून झाल्यावर ‘श्रीं’साठी खव्यांचे मोदक, पेढे, मिठाई, लाडू यांपैकी जे गोड अन्नपदार्थ तयार केलेले (किंवा आणलेले) असतील त्यांचा (भोजन तयार असेल तर संपूर्ण भोजनथाळीसह) भगवंताला नैवेद्य दाखवावा. मनोमन परमेश्‍वराला प्रार्थना करावी. गंध/अत्तर लावलेले फूल पायावर अर्पण करून चौरंगावर मांडून ठेवलेल्या दक्षिणेसह विडा, फळे, नारळ यांवर पळीने पाणी सोडून श्री गजाननाला अर्पण करावे आणि दोन तूपवातींच्या निरांजनांनी (तबक/ताम्हणात ठेवून) मंगलारती करावी. कापुरारतीने आरतीचा शेवट व्हावा. ‘सुखकर्ता, दुःखहर्ता...’ ही गणपतीची आणि ‘दुर्गे दुर्गट भारी...’ ही देवीची आरती म्हणावी. समर्थ रामदासांनी रचना केलेली ‘सुखकर्ता, दुःखहर्ता...’ आणि नरहरी विरचित ‘दुर्गे दुर्गट भारी...’ या आरती गेली तीनशे वर्षे सर्व कुटुंबांतून मोठ्या तन्मयतेने म्हटल्या जात आहेत.

मंत्रपुष्प (यज्ञेन यज्ञमयजंत...) म्हणावे आणि फुले, अक्षता वाहून प्रदक्षिणा, साष्टांग नमस्कार (घालीन लोटांगण...) घालून प्रार्थना म्हणावी. इतर अनेक प्रार्थना म्हटल्या गेल्या तरी पुढील प्रार्थना म्हटल्या जातील, असे पाहावे.

रूपं देही जयं देही । (बाप्पा मला रूप दे, जय दे)

यशो देहि द्विषो जहि । (यश दे, द्वेष करणाऱ्यांना पिटाळून लाव)

पुत्रान्‌ देहि धनं देहि । (मुलांची प्राप्ती होऊ दे, त्यांना भरपूर धन दे)

सर्वान्‌ कामॉंश्‍च देहि मे । ( माझ्या सर्व सदिच्छा पूर्ण कर)

अन्यथा शरणं नास्ति । त्वमेव शरणं मम ।। (तुझ्याविना अन्य आश्रय नाही)

तस्मात्‌ कारूण्य भावेन । रक्ष रक्ष परमेश्‍वर ।। (दयाळूपणे माझे रक्षण कर)

सर्वेत्र सुखिनः सन्तु । सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्‍यन्तु । मा कश्‍चिद्‌दुःखमाप्नुयात ।।

(सर्वजण सुखी व्हावेत, सर्व निरोगी असावेत, सर्वांना कल्याणकारक जीवन पाहायला मिळावे, कोणाच्याही वाट्याला दुःख येऊ नये.)

Ganesh Chaturthi 2021: प्राणप्रतिष्ठा दुपारपूर्वी करावी
Goa Ganesh Festival: वैशिष्ट्यपूर्ण गोमंतकीय 'चवथ'

श्री गणेश पूजेच्या उपचारांपैकीच आज सर्वत्र दुर्लक्षित (अज्ञानामुळे उपेक्षित!) असा महत्त्वाचा भाग म्हणजे राजोपचार. जे उपचार राजे करू शकतात (त्यांना करायला आवडतात), त्या उपचारांना राजोपचार म्हणतात. आपण मात्र घरी आलेल्या देवराज गणेशाला नृत्य, गीत, वाद्य, छत्र, चामरादी राजोपचारांचे (नाचणे, गाणे, वाद्य यांसारख्या राजोपचारांसाठी), अक्षतान्‌ समर्पयामि, म्हणून तांदळाचे चार दाणे अर्पण करून हा राजोपचार बोळवतो.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com