Ganesh Festival 2021: गोमंतकीय लोकसंस्कृती भावस्पर्शी

निसर्गाशी नातं सांगणारा हा सण पर्यायाने पर्यावरणाचा रक्षण करा हा संदेश देऊनच जातो.
कोरगाव चौपाटीचा गणेश
कोरगाव चौपाटीचा गणेशDainik Gomantak

गोमंतकाच्या लोकसंस्कृतीचा ठेवा म्हणजेच श्री गणेश चतुर्थी हा सण. भक्तीभावाचा एकात्मतेचा संदेश देणारा हा सण गोमंतकाच्या लोक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. निसर्गाशी नातं सांगणारा हा सण पर्यायाने पर्यावरणाचा रक्षण करा हा संदेश देऊनच जातो. कोणतेही शुभ कार्य श्री गणेश पुजन शिवाय पूर्ण आणि सफल होत नाही. श्री गणेशाचे नमन केल्याशिवाय कोणते कार्यही निर्विघ्नपणे पार पडत नाही, आणि ही वैचारिक पृष्टी अनादी काळापासून आपल्या परंपरेच्या गाथेत गुंतलेली आहे. म्हणून श्री गणरायाचे अढळस्थान मानवाच्या जीवनशैलीत अग्रस्थानी आहे. व ते अढळ आहे.

गोमंतकीय लोकसंस्कृती भावस्पर्शी आहे. भक्ती वेडी आहे. हळवासा गोमंतकीय आपल्या लोक जीवनाची गाथा नेहमीच लोक परंपरेने आजपर्यंत सांभाळीत आला आहे. श्री गणेश चतुर्थी ही तेवढ्याच भक्तिमय रसात ती प्रत्येकाच्या सहजीवनात रुजली आहे व तेवढ्याच भक्तिभावाने ती जोपासलीही जात आहे. याच गोमंतकात अगदी महाराष्ट्राच्या कडेला वसलेला असा पेडणे हा तालुका. संत सोहिरोबानाथ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हे भूमी. नयनरम्य असे इथले समुद्रकिनारे, हिरवीगार वनराई, काजू बागायती आणि तेवढाच कष्टाळू माणूस, स्वाभिमानी लोकजीवन संभाळीत मार्गक्रमण करत आहे.

याच तालुक्यात साधरण पेडणे शहरापासून दहा-बारा किलोमीटरवर असलेलं गाव म्हणजे कोरगाव. पूर्वीचे एक प्रमुख बाजार केंद्र म्हणून प्रसिध्द आहे. आजही या गावाचा एक वाडा पेठेचावाडा म्हणूनच प्रसिद्ध आहे. इतिहासाचे वेध घेतले तर या इथल्या बाजारपेठेची माहिती मिळते. कुलदैवत श्री देव साळेश्वर यांच्या सानिध्यात असलेला हा पेठेचावाडा. येथील काही प्रमुख कुटुंबापैकी एक कुटुंब म्हणजे इच्छेट घराणे "चौपटकार" म्हणून प्रसिद्ध. या कुटुंबाचा एक भाग या नात्याने मनी मनी मनोमनी सुखावत ते घरची पुण्याईचे वरदान. ही चौपट म्हणजे राजांगण असलेलं आमचं पूर्वीच घर. आज ते पूर्वीच रजांगण असलेलं घर राहिलं नाही कारण कुटुंबाचा आवाका वाढल्याने तो एक संपुर्ण वाडाच बनला आहे. आमचं हे कुटुंब नावारूपास आले ते एकत्र साजरा करणाऱ्या गणेशोत्सवा निम्मित. आणि हा एकोपा आजचा नाही आहे, अनेक पिढ्यांपासून चालत आलेला ठेवा आहे. एकंदर १२ कुटुंबाचा आमचा हा महागणपती, पूर्वीपासून बारा गोळ्याचा गणपती म्हणूनही प्रसिद्ध आहे. हे बारा गोळे म्हणजेच पूर्वीची बारा कुटुंबे आणि हा महागणपती या कुटुंबाचा प्रमुख. जणू आमचा पूर्वजच. आज ही १२ कुटुंबे राहिली नाही तर आमची चौपट वाढली आहे. वाड्यात, गावात, तालुक्यात, तर राज्यात इतकच काय तर परराज्यात सुद्धा विखुरली आहे. पण या सर्वांचा एकत्र मिलाप पहावयास मिळतो तो चतुर्थीला. आणि हीच खरी आम्हा पूर्वजांची पूर्वपुण्याई असं आम्ही सगळेच मानतो.

कोरगाव चौपाटीचा गणेश
Ganesh Festival: एक समृद्ध वारसा अडगळीत जाताना

श्री गणरायाच्या कृपेने हा एकसंघपणा आजही टिकून आहे हे वैशिष्ट्य. देवकार्यात कुटुंबाला विशेष स्थान आहे. प्रत्येक सण व्रतवैकल्ये इथे साजरी केली जातात. साधारण नागपंचमीपासून गणेश उत्सवाची तयारी सुरू होते. व मूर्ती घडविण्यास सुरुवात केली जाते. गोकुळाष्टमी पर्यंत मूर्तिकार मूर्ती तयार करतो. मूर्ती चिकट मातीची बनवली जाते. जी निसर्ग प्रिय असते. विसर्जनाच्या वेळी सहज पाण्यात विरघळून जाते. माती आणून तयार करून दिली जाते व हस्त करागिरीने ती तयार केली जाते. पूर्वी जवळचे एक प्रसिध्द मूर्तिकार कै. शशिकांत कोरगावकर हे मूर्ती घडवत. त्याच्या अगोदर त्यांचे वडील हे मूर्ती तयार करत असत. आज मांद्रे गावचे प्रसिद्ध मूर्तिकार श्री उत्तम साळगावकर ही प्रचंड मूर्ती मोठ्या भक्तिभावाने साकारतात. आज त्यांची मुलेही आता ते हळूहळू पुढची जबाबदारी उचलायला समर्थ झालेली आहे. गणेशाची मूर्ती साधारण 8 ते 10 फूट एवढी उंच असते. संपूर्ण मूर्ती ही मूर्तिकार हातानेच घडवतो. आणि सर्वात वैशिष्ट्य म्हणजे मूर्तिकार आमच्या घरी येऊन ही मूर्ती साकारतो. ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. एका बाजूने मूर्तिकार मूर्ती आकारास घेतो तर दुसर्‍या बाजूला आमच्या कुटुंबातले लहान थोर आता कागदी पताकाची सजावट करण्यात मग्न असतात. जवळ-जवळ एक महिन्याच्या अथक प्रयत्नाने सुंदर पताकाची सजावट तयार केली जाते. आकर्षक अशा कागदी पताका हल्लीच्या काळात सजावटीचा एक प्रमुख केंद्र बनली आहे. हे आणखी एक वैशिष्ट्य भर पडले आहे. साधारण चतुर्थीपर्यंत पूर्ण श्री ची मूर्ती तयार होते.

आदल्या दिवशी पर्यंत संपूर्ण मूर्ती रंग गोटी ते इतर बारकावे हेरून पूर्ण करून ठेवली जाते. पण मूर्तीची नजर मात्र उघडली जात नाही. यासाठी चतुर्थीचा दिवस उजाडावा लागतो. पूर्वापार पासून चतुर्थी दिवशी अगदी 12 च्या ठोक्याला श्रीची नजर रेखाटली जाते. व नंतर जसं नववधूचे एका भरलेल्या कुटुंबात आगमन होताना सर्व कुटुंब जसं आतुरतेनं तिचे स्वागत करतात जणू त्याच भावनेने या आमच्या गणरायाला हाताने जमिनीवर गंध लावत मकरात नेवून बसवतात. पूर्वी शेण साऊळच्या जमिनी होत्या. त्यामुळे पांढऱ्या मातीची शेड हाताच्या बोटाने ओढत असत. आता पूर्वीची मातीची जमीन राहिली नाही त्यामुळे गंध किंवा पांढऱ्या शेडचा वापर करून हे कार्य निभावून नेले जाते. हीच ती वेळ जिथे आपणास संपूर्ण कुटुंब एकत्र पहावयास मिळते. "गणपती बाप्पा मोरया" च्या जयघोषात श्री ना पालखी स्वरूपात पुर्वापार असलेल्या जागेवर स्थानपन्न केलं जाते. आजच्या धकाधकीच्या व सोयी प्रस्थापित युगात इतरांचाही विचार करावा ही जुने विचार सरणी आजही आमच्या नव्या तरुण पिढीने जोपासली आहे. म्हणूनच 5 दिवस या आमच्या घरात श्री गणेशाची मनोभावे सेवा सर्वांच्या सहकार्याने पार पाडली जाते. पूर्वी फक्त दीड दिवसाचा आमचा श्री गणेश पूजला जायचा. आता एकंदर कुटुंबाचा विस्तार पाहता असलेले पाचही दिवस अपुरे पडतात. बरोबर 12 वाजता तिची नजर रेखाटली कि श्री चे पूजन होते. दोन मोठ्या झाडाच्या बुंध्यावर ( लोळग्यावर ) दोन्ही बाजूनी पकडून "गणपती बाप्पा मोरया " म्हणत च्या श्रीची पालखी उचलली जाते व मखरात नेऊन बसवले जाते. पूर्वीपासून शेजारी असलेले पित्रे घराणे आमच्या या महगणपतीची पूजा-अर्चा करतात. पूजन झाल्यानंतर प्रथम ब्राम्हणा करवी व नंतर आमच्या एखाद्या ज्येष्ठ कुटुंब सदस्य करवी देवाला सांगणे केले जाते. व तद्नंतर आरती व प्रसाद वाटला जातो. इथे आणखी एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो तो औसा भरणे. किंवा नविन सूनबाईला हौसवणे. कुटुंबात येणाऱ्या नवीन सुनबाईला इथे खूप महत्त्व आहे.

कोरगाव चौपाटीचा गणेश
Ganesh Chaturthi 2021: गणपती विसर्जन स्थळी जाणाऱ्या पायवाटेची साफसफाई

हळदीच्या पानावर कोंब काढलेले कुळीत, तवशाचे काप,भाजलेले वडे अशी मांडवळ करून देवा समोर ठेवली जाते. व त्याचे पूजन होते. इथे नवीन सुनबाईला सासरकडून व माहेर कडून भेटवस्तू दिली जाते. तसेच माहेरकडून आलेल्या भावाचा विशेष सन्मानही केला जातो. हा कार्यक्रम चालू असेपर्यंत देवाचं मकर सजलं जातं. एके वर्षी राजेशाही मुकुट तर एके वर्षी स्वाभिमानचा प्रतीक असणारा सन्मानाचा फेटा डोक्यावर परिधान केलेला आमचा गणराया तोपर्यंत मकरात स्थिर झालेला असतो. सोंडावर ब्रम्हांड व्यापणारा ओम, निसर्गाचे नाते सांभाळणारे राष्ट्रीय फूल कमळ व तिथून हिरवेगार आडवी तेवढी विखुरलेली वेल आपुलकीचा स्नेह दर्शवते., कोरलेल्या राजमुद्रा, अंगावर गंधाचा लेप, आशीर्वाद देणारा उजवा हात, वर्षानुवर्षे पाय दुमडून बसलेली ही मूर्ती पाहता जणू घरचा जुनाजाणता आमचा पूर्वज बसून आम्हाला मार्गदर्शन करत आहे, आशीर्वाद देत आहे असा भास तयार होतो. हे दृश्य मन कासाविस करणारे ठरते. इथूनच पाच दिवसाचा अभुतपुर्व सोहळा सुरू होतो. दररोज 12 ही कुटुंबातून आणलेला नैवेद्य व समोर मांडलेली 12 पाने, जवळच उंदीर मामा साठी एक वेगळ तयार केलेले पान, प्रत्येक घरातून तयार करून आणलेला रुचकर, तेवढाच चविष्ट पदार्थ, सारं काही अवस्मरणीय. प्रत्येक पानावर वाढताना घरातील स्त्रीयांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहण्याजोगा असतो. अंतर्मनातील आत्मीयतेची वेदना, भाव भक्तीची आरस आणि या रसातला परमोच्च आनंद प्रत्येकाच्या तना-मनात ओथंबून वाहताना आपणास पहावयास मिळतो.

दर दिवशी प्रत्येक कुटुंबातून मिळून साधारण पन्नास ते सात जण सकाळी देवास अभिषेक घालतात. काही मनोरथ पूर्ण झाल्याचा प्रसाद वाटतात. तर काही नवीन संकल्पना देवाकडे आशीर्वाद रुपी मागतात. चारही दिवस अभिषेक सोहळा चालतो. सकाळी अभिषेक, दुपारी आरती, नैवेद्य, संध्या भजन, रात्री फुगडी व काही मनोरंजनात्मक असे कार्यक्रम, आणि यात लहान ते थोर सर्व सहभागी होऊन, वर्षानुवर्षे या सोहळ्याचा आनंद लुटताना इथला प्रत्येक सदस्य आपल्या नजरेत येतो. हल्लीच्या काळात विशेष करून तिसऱ्या दिवशी गोमंतकीय प्रसिद्ध गायक बोलवून त्याच्या गायनाचा कार्यक्रम हल्ली प्रसिध्द झाला आहे. वाड्यातील आणि गावातील ही अनेक जण हजेरी लावून त्या कार्यक्रमाचा आनंद लुटतात. तल्लीन होतात.

अशा या प्रफुल्लित वातावरणात पाच दिवस कसे निघून जातात काहीच समजत नाही. आणि नकळत तो पाचवा दिवस उजाडला जातो. पहिले चार दिवस आपापल्या घरातून आणून पुन्हा आपल्या घरी नेऊन ग्रहण करणारे भोजन, 5 व्या दिवशी मात्र सर्व एकत्र महाभोजनाचा आस्वाद घेतात. आणि तो ही श्री गणरायाच्या समोर. हे महाभोजन एकत्र बनवले जाते. ज्याला आम्ही म्हामणे असे म्हणतो. या दिवशी संपूर्ण कुटुंब एकत्र जेवण बनवतात व गणपतीसमोर बसूनच त्याचा प्रसाद म्हणून ते ग्रहण करतात. सर्व कार्य, कामे आटपून संध्याकाळी श्रीच्या विसर्जनाची तयारी केली जाते. यात विशेष म्हणजे श्रीच्या समोर श्री फळ ठेवून, सांगणे केले जाते आणि आणि हे श्री फळ आशीर्वाद रुपी घरी ठेवण्याची प्रथा आता प्रचलित झाली आहे. कुटुंबातील प्रत्येक जण आपण राहतो त्या तिकडे हे श्री फळ आशीर्वाद रूपे घेऊन जातात. काही जण मागणे मागतात. आणि आज त्याची प्रचिती एवढी वाढली आहे की नातेवाईक, शेजारी तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आमच्या गणरायाचं हे श्रीफळ आशीर्वाद रुपी घेऊन जातात. नवस बोलतात व पुढच्या वर्षी नवस पूर्ण झाल्याची बातमी घेऊनच ते पुन्हा दर्शनाला येतात. हे सत्यस्थिती आहे.

आज आधुनिक युगात कदाचित या गोष्टी कोणीही मानणार नाही पण ही शक्ती आहे आमच्या पुर्व पुण्याईची. आणि भक्ती आहे आमच्या या महागणपतीची. अपरंपार अशी ख्याती अनुभवलेली अनेक जुनी जाणती मंडळी याची महती सांगताना आपणास आढळते. श्रीच्या फळाचा कार्यक्रम चालू असतानाच पुरुष मंडळी भजन करतात. तर भजन आटोपल्यावर बायकांचा फुगडीचा कार्यक्रम होतो. साधारण संध्या 7 ते 7: 30 दरम्यान अभिषेकी पित्रे यांचे आगमन होते. देवाची उत्तर पूजा केली जाते. व त्यांच्या हस्ते सेवा मान्य करून घेणारे सांगणे केले जाते. व मग गणेश विसर्जनासाठी आमच्या गणरायाची पालखी उचलली जाते. दोन झाडाचे पूर्वीपासून वापरात येणारे जाडजूड बुंदे (लोळगे) व ते पकडायला पुढे व मागे पालखीचे भोई म्हणजे आम्ही सगळे, पालखी खांद्यावर उचलून गणपती बाप्पा मोरया म्हणत टाळ-मृदुंग दिंडी सहित विसर्जनास निघतो. या दिंडीत सहभागी होणारे घरचेच व मिसळणारे इतर आजूबाजूचे त्यामुळे त्याला भव्य दिव्य असे स्वरूप प्राप्त होते. या कुटुंबावर निष्ठा ठेवणारी अनेक मंडळी आमच्या या उत्सवात सहभागी होतात. मिरवणूक रात्री 12 वाजेपर्यंत चालते. त्यामुळे वाड्यावरचे, गावातले इतर अनेक जण आपापले गणपती विसर्जन करून आमच्या आनंदात सहभागी होऊन आमच्या अतुट नात्याचं दर्शन घडवतात. भव्य अशी मिरवणूक होते. ही मिरवणूक थांबते ती जागा म्हणजे " कोणीर" . साधरण 15 मिनिटांचे अंतर असलेली जागा पण मिरवणुकीत तब्बल 5 तास लागतात. अद्वितीय असा आनंद, न थकवा देणारा उत्साह, नेत्रात साठवलेल अमाप प्रेम, गालावर ओथंबून वाहताना पहावयास मिळते. पूर्वजांच्या पुण्याई थोरपण इथं आम्हास घडलं जात. पूर्वी आमचे ही मिरवणूक पायी व्हायची आता बदलत्या सोयीनुसार "श्री" ला वाहनात बसवून भक्त पायी चालतात.

आज अनेक पिढ्या आल्या गेल्या तसेच येतीलही आणि जातीलही, पण आमच्या श्रीचा आघात महिमा असाच निरंतर राहील हे सुवर्ण अक्षराने लिहावं असच आहे. ईश्वर शक्तीच्या बळावर ते चिरंतन राहील यात दुमत नाही. संपूर्ण गोव्यात नाही म्हटलं तरी असा हा उत्सव मला वाटतं अभूतपूर्व आहे. आणि हे इथं दर्शनाला येणारा प्रत्येकजणाच्या मुखातून ते आम्हांस कळत. दरवर्षीप्रमाणे पेठेचावाडा येथे असलेल्या या "कोणीर" या जागेवर आरती आणि सामूहिक गाऱ्हाणे घालून आमच्या या श्रीचे विसर्जन केले जाते. पंच खाद्य वाटले जाते. ज्यात बारा कुटुंबातून मिसळलेले प्रेम असते. म्हणून त्याची चव निराळीच असते. विसर्जनाचे दृश्य पाहून पाहणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनामनातून एकच आतर्तता आवाज देत असते ती म्हणजे " देवा पुढच्या वर्षी लवकर या"

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com