गणपती सगळ्यांचे लाडके दैवत

पोर्तुगिजांनी मंदिरे उद्ध्वस्त करून टाकण्याआधी काही लोकांनी गणपतीची मूर्ती लपवून छपवून खांडोळा गावात आणून ठेवली व तिची प्रतिष्ठापना केली.
गणपती सगळ्यांचे लाडके दैवत
गणपती सगळ्यांचे लाडके दैवतDainik Gomantak

भाद्रपद शुक्ल चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंतचा काळ गणेशोत्सवाचा (Ganesh Festival) असतो. या कालावधीत अनेक वैविध्यपूर्ण अशा परंपरांचे दर्शन घडते. गणपती (गणपती Bappa) हे सगळ्यांचं लाडकं दैवत आहे. खांडोळा येथे महागणपतीचे संस्थान आहे ते कित्येक घराण्यांचे कुलदैवत आहे. पोर्तुगिजांनी सोळाव्या शतकात गोव्यात (Goa) आपली सत्ता प्रस्थापित केली तेव्हा त्यांनी हिंदूंच्या धार्मिक स्थळांची (Religious place) तोडफोड करायला सुरुवात केली. त्यावेळी सध्या खांडोळा येथे स्थित असलेला गणपती दिवाडी या बेटावर होता. पोर्तुगिजांनी मंदिरे (Temples) उद्ध्वस्त करून टाकण्याआधी काही लोकांनी गणपतीची मूर्ती लपवून छपवून खांडोळा गावात आणून ठेवली व तिची प्रतिष्ठापना केली. खांडोळा अंत्रुज महालात असल्याने तेथे सौंदेकरांचे राज्य होते. तिथे हा महागणपती सुरक्षित राहिला.

Dainik Gomantak

तरीसुद्धा गणेश चतुर्थीच्या दिवशी पोर्तुगीज शिपाई येऊन घरोघरी पुजलेल्या मातीच्या मूर्ती फोडून टाकत. म्हणून लोकांनी एका कागदावर गणपतीचे चित्र रेखाटून ट्रंकेत किंवा कपाटात पूजा करायला सुरुवात केली. विध्वंसाचा भर ओसरल्यावर लोकांनी मूर्तिपूजा करायला पुन्‍हा सुरुवात केली. श्रावण शुक्ल चतुर्थीला खांडोळ्याच्या देवळात गणेशजयंती साजरी केली जाते. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला लोक घराघरात गणपतीची पूजा करून गणेशोत्सव साजरा करतात. गोव्यात कोणी दीड, कोणी पाच, तर कोणी सात, नऊ, अकरा, चौदा दिवस गणपती ठेवतात व ‘चवथ’ साजरी करतात. खांडेपार गावात वास्तव्य करून असलेल्या शेणवी खांडेपारकर कुटुंबीयांना तर गणपती तर नित्य वंदनीय. पण त्यांच्या कुटुंबात गणेश चतुर्थी दीडच दिवस साजरी करायची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. आणि ती सुद्धा टाकाऊ कागदाच्या लगद्यापासून केलेल्या मूर्तीची. ही मूर्ती त्रिमिती आणि सुबक व आकर्षक असते. दिसायला तर ती अगदी मातीच्या मूर्तीसारखीच दिसते. अगदी जवळून पाहिल्यावरच फरक कळतो. आदल्या दिवशी गौरीची पूजा करतात ती मात्र कागदावर रेखाटलेली गौरीची छबी असते.

गणपती सगळ्यांचे लाडके दैवत
Ganesh Chaturthiच्या या दहा दिवसांत या 4 गोष्टी करू नका

खांडेपारकरांचा गणेशोत्सव जरी दीड दिवसाचा असला, तरी उत्साह मात्र खूप असतो. कारण गणपती या कुटुंबीयांचा कुलदेव आहे. उसगावहून गणपती घरी आणतात आणि दारात ठेवून त्याला ओवाळतात. हा गणपती वजनाने हलका असल्याने लहान मूलसुद्धा उचलू शकते. रानातली फळे, मोगें, बॉबर, कांगलां, कवंडळां, घागऱ्यो, केळीचा घड, पपनस, घोसाळे, भेंडी, चीबड आंब्याच्या पानासहित बांधून चांगल्या प्रकारे माटोळी तयार केली जाते. बाकी पूजा वगैरे पारंपरिक पद्धतीने केली जाते. पंचमीच्या दिवशी संध्याकाळी उत्तरपूजा केल्यानंतर गणपतीला एका सुंदर अशा तबकात अथवा ताटात ठेवतात व "गणपतीबाप्पा मोरया"च्या गजरात घरचे सगळे सदस्य लाह्या घालतात. झांज व घंटानादाने सगळा आसमंत दुमदुमून जातो. नंतर वाजत गाजत ही मूर्ती विहीर किंवा जलाशयात विसर्जित न करता अंगणात किंवा तुळशी वृंदावनासमोर आणून ठेवतात. उदबत्ती, कापूर लावून नारळ फोडला की विसर्जन झाले असे समजावे. काही वेळाने ती मूर्ती परत घरात आणून मखरात ठेवतात. ती वर्षभर तशीच राहते.

जुन्या मूर्ती कोणाला पाहिजे असेल त्यांना देण्यात येतात. मातीच्या मूर्ती नदीत किंवा पाण्यात विसर्जित केल्याने जलप्रदूषण होते तसे इथे होत नाही, ही एक प्रशंसनीय व अनुकरणीय गोष्ट आहे. मातीची मूर्ती नदीत सोडल्यानंतर अदृश्य होते, तेव्हा गणपतीबाप्पाला पुन्हा पाहायला एक वर्ष वाट पाहावी लागेल, हा विचार येऊन क्षणभर उदास वाटतं तसं इथे वाटत नाही. तसं वाटू नये म्हणून कदाचित खांडेपारकर कुटुंबीयांनी कागदाचा गणपती पुजण्याची परंपरा जोपासली आहे.

स्मिता खांडेपारकर

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com