GMC Infant kidnapping case: भ्रुणहत्येच्या किडक्या मानसिकतेचा विनाश कधी होणार?
GMC Infant kidnapping case

GMC Infant kidnapping case: भ्रुणहत्येच्या किडक्या मानसिकतेचा विनाश कधी होणार?

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून झालेल्या चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांना मुलाला पळवणारी महिला कोणत्या भागात गेली असावी, याचा अंदाज आला आणि त्यानंतर सदर महिलेला सत्तरी तालुक्याच्या दिशेने जाताना पाहिलेल्या व्यक्तीनी पोलिस यंत्रणेला उपयुक्त माहिती दिली. 

निवडक माहितीचे जनअवलोकनार्थ प्रसारण करताना पोलिसांनी दाखवलेले तारतम्यही कौतुकास्पद होते. त्यामुळे गुन्ह्याचा तपास योग्य दिशेने झाला, बिनबुडाच्या माहितीच्या आधारे पोलिसांना दाहीदिशांनी फिरावे लागले नाही. आता माता आणि मुलाचे मिलन झालेले असले, तरी हे अपहरण प्रकरण न्यायालयात उभे राहील तेव्हा त्यांचे रक्ताचे नाते सिद्ध करावे लागेल आणि त्यासाठी ‘डीएनए’ चाचणी अपरिहार्य आहे. हे कायदेशीर सोपस्कार पार पाडल्यानंतर पोलिसांकडून पुढील कार्यवाही होईल. राज्यात खळबळ माजवणारा गुन्हेगारीचा एक अध्याय संपुष्टात आला असला, तरी अनेक प्रश्न मात्र त्या अनुषंगाने उभे राहिलेले आहे आणि त्यांचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. 

गेल्या सप्ताहात कायदामंत्री नीलेश काब्राल यांनी पुढे आणलेल्या विवाहपूर्व समुपदेशनाच्या प्रस्तावावरून उठलेले पेल्यातले वादळ आता शमलेय. वास्तविक विवाहोपरान्त विसंवादाची व्याप्ती कमी करण्यासाठी समुपदेशाचा मार्ग योग्यच आहे. किंबहुना स्वत:ला प्रगत समजणाऱ्या गोमंतकीय समाजाचे सर्वांगिण समुपदेशन होणे अगत्याचे आहे, हे शुक्रवारच्या अपहरण प्रकरणाने दाखवून दिले आहे. प्रगत म्हणवून घेणाऱ्या या समाजात अजूनही मध्ययुगीन प्रवृत्तींचा मोकाट वावर आहे. ‘पुत्रप्राप्तीचा हव्यास’ ही त्यातलीच एक प्रवृत्ती. घटस्फोटांचे वाढते प्रमाण हा जर आधुनिकतेच्या चुकीच्या कल्पनांचा परिपाक असेल, तर मुलगाच हवा हा ध्यास मोडीत निघू पाहणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीला चिकटण्याच्या वेडाची फलश्रुती आहे. सत्तरी तालुक्यातल्या सालेली गावातील विश्रांती गावस ही या प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करते. आता पाणी गळ्याशी आल्यावर तिच्या सासरची मंडळी एकंदर प्रकाराबद्दलची अनभिज्ञता दर्शवत असली आणि आपल्याला यातले काहीच माहित नसल्याचे सांगून अंग काढून घेत असली, तरी सत्य याहून वेगळे असू शकते. खरे तर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना महिला आयोगाचीही मदत घ्यायला हवी. मुलगा हवा हा केवळ विश्रांतीचाच ध्यास होता आणि त्यातून ती गुन्हेगारी कृत्य करण्यास प्रवृत्त झाली की, पदरी चार मुली असल्यामुळे तिच्या वाट्याला अवहेलना, उपेक्षा यायची व त्यातूनच तिला हा वाममार्ग सुचला याची उकल व्हायला हवी. काही प्रकरणात गुन्हेगाराइतकाच दोष त्याला गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांच्या वाट्याला येतो आणि हे प्रकरण त्यातले नव्हे ना, याचा तपास पोलिसांनी पूर्वग्रहांविना करायला हवा.

‘मुलगाच हवा’ हा ध्यास केवळ ग्रामिण भागापुरताच मर्यादित नाही, हेही येथे सांगणे जरुरीचे आहे. गरोदरपणाची चाहुल लागताक्षणी महिलेला तपासणीसाठी घेऊन येतानाच सासरची मंडळी ‘ताकास येऊन तांब्या लपवण्या’चा उद्योग करत असली, तरी जेव्हा ‘कितीही पैसे खर्च होवोत, सगळं व्यवस्थित व्हायला हवे..!’ अशा लाडीक, इशारेयुक्त सूचना डॉक्टरला केल्या जातात, तेव्हा त्यांच्या मनात वंशाच्या दिव्याचा ध्यास असतो हे कळण्यास वेळ लागत नाही. मागणी तसा पुरवठा करणारी दुकानदारी आरोग्यक्षेत्रातही असल्यामुळे अनेकदा अशा परिवारांचे इप्सित साध्य होते आणि मातेच्या उदरातला गर्भ मुलीचा असला, तर तो पाडलाही जातो. अर्थात, अशा फंदात न पडता येणाऱ्यांचे समुपदेशन करून मुलगा आणि मुलगी समान असल्याचे त्यांच्या मनावर बिंबवणारी चिकित्सालयेही बहुसंख्येने आहेत आणि त्यामुळे आपल्या समाजाची एकांगी घसरण झालेली नाही, हेही तितकेच खरे. विश्रांती गावस हिला कदाचित अशा प्रकारच्या हुकमी पुत्ररत्न मिळवून देणाऱ्या वैद्यकीय सेवेची खबरबात मिळाली नसावी किंवा आपण बाळंतवेणांविना एकहाती मुलगा मिळवू शकते, असा फाजिल विश्वास तिला असावा. त्यामुळे तिने अघोरी मार्ग पत्करला. काहीही असले तरी मुलगाच व्हायला हवा, ही सनातन धारणा तिला या कार्यासाठी प्रवृत्त करत होती, हे नाकारून चालणार नाही. या धारणेचा समूळ नि:पात करण्यासाठी अगदी शालेय पातळीवरून समुपदेशन होणे गरजेचे आहे. मंत्री नीलेश काब्राल यांनी त्यासाठी पुढाकार घेतला, तर ते समयोचित पाऊल ठरेल.

विश्रांतीच्‍या कार्यपद्धतीचा विचार करता अनेक शंका उपस्थित होतात. आपण गरोदर असल्याचे नाटक एखादी महिला सतत नऊ महिने करू शकेल का? गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती विभागात गरोदर नसलेल्या महिलेला प्रवेश कसा मिळू शकतो? तिथली सुरक्षा व्यवस्था, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांना ती कशी चकवू शकते? नंतरच्या काळातही महिनाभर माहेर व सासरच्या मंडळींना कशी झुलवत ठेवू शकते? अपहरणाचे कृत्य तिने एकटीनेच केल्याचे सध्याचा तपास दर्शवतो. पण, इतका काळ संपर्कातल्या स्त्रियांना तरी ती टाळू शकत नव्हती. प्रसुत झाल्याचे नाटक करणे जितके सोपे आहे, तितकेच अर्भकाला सांभाळण्याचे नाटक महाकठीण. विश्रांतीने एकहाती हे नाटक पेलले असल्यास तिच्या नियोजनाला, ‘मग ते गुन्ह्याच्या सफळतेसाठी का केलेले असेना, दाद द्यावी लागेल’. दुर्दैव हेच की इतकी हुशार असूनही ही महिला आणि तिच्यासारख्या असंख्य ज्ञात, अज्ञात स्त्रिया- पुत्रप्राप्तीसाठी झुरत असतात आणि प्रसंगी भ्रुणहत्येच्याही थराला जात असतात. या किडक्या मानसिकतेचे उच्चाटन कधी होणार?

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com