Goa Congress Dispute: 21 व्या शतकात सत्ताकारण बिनभरवशाचे, गोव्यात आठजण भाजपवासी

Goa Politics: आठचा आकडा भरल्यानंतर तिघांना मागे ठेवून आठजण भाजपमध्ये गेलेसुद्धा! शपथ देणाराही गेला आणि घेणारेही गेले. आत्ता प्रश्‍न कोण, कोणाला विचारणार?
Goa Congress Dispute
Goa Congress DisputeDainik Gomantak

Goa Congress Dispute: बोलल्याप्रमाणे न वागणे, वा दिलेले वचन मोडणे. बाजू पलटणे, फिरणे, बदलणे असे अर्थ शब्दकोशात आहेत. पण गोव्यातील राजकारण्यांचा वचननामा वेगळाच आहे. त्यांचे दाखले इतिहासात शोधण्यापेक्षा वर्तमानात अधिक सापडतात. 21व्या शतकात तर सत्ताकारण हे बिनभरवशाचे आहे. त्यामुळे कोण, कोणत्या गटात, पक्षात आहे. हे कळत नाही, कारण निवडणूक एका पक्षातर्फे लढविणे आणि विजयी झाल्यानंतर सत्तेसाठी दुसऱ्या पक्षात जाणे, हे नित्याचेच झाले आहे. कालचा पंच, सरपंचही सत्तेसाठी दुसऱ्यादिवशी गट बदलतो, हे गोव्यातच पाहायला मिळते. त्याला आमदारही अपवाद नाहीत. पूर्वी दहाजण गेले होते, आत्ता पुन्हा आठजण भाजपवासी झाले.

गोव्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी उमेदवारांनी मंदिर, मशीद, चर्च-''फुलाचा कुरीस’कडे शपथ घेऊन जनतेला वचन दिले. पण हे सर्व पाळणार कोण? त्यांना वचन, शपथ म्हणजे काय माहीत आहे का? हाच प्रश्‍न मतदारांना पडलेला आहे. कारण शपथ म्हणजे आपल्या विधानाच्या, निवेदनाच्या किंवा वचनाच्या सत्यतेची ग्वाही देण्याची एक सार्वत्रिक पद्धत. शपथेच्या रूपाने एक प्रकारची नैतिक जबाबदारी स्वीकारण्यात येते. शपथ खोटी ठरल्यास प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे काही प्रायश्चित्त वा शिक्षा आपणास भोगावी लागेल, अशी जाणीव शपथ घेणाऱ्या व्यक्तीच्या मनात असते. पण फक्त सत्तेसाठी हपापलेल्या नेत्यांना त्यांचे काहीच सोयरसुतक नाही. ते फक्त सत्तेसाठी उड्या मारतात. हरियाणातील आयाराम, गयारामांनाही गोमंतकीय आमदारांनी मागे टाकले आहे.

Goa Congress Dispute
Goa Cabinet Expansion : गोवा राज्य मंत्रिमंडळात लवकरच खांदेपालट

प्राचीन काळापासून शपथ घेण्याची पद्धत बहुतेक सर्व समाजांत आणि संस्कृतीत आढळून येते. काही अभ्यासकांच्या मते शपथ घेण्यामागे - वस्तुविनियमासारखा आकृतिबंध असावा. वस्तुविनिमयात एकाच वेळी देणारा देताही होतो व घेताही होतो. त्यामुळे उभयपक्षी काही हक्कांची व कर्तव्यांची जाणीव जोपासली जाते आणि ती नीतीने पाळली जाते. शपथ घालण्याचाही एक प्रकार असतो. काही गोष्टीना प्रतिबंध करण्यासाठी वा काही गोष्टी करून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला दुसरी एक व्यक्ती शपथ घालते. काँग्रेसने आपले आमदार फुटू नयेत, म्हणून त्यांना शपथ दिली, वचननामा घेतला. पण त्याला ते बांधिल राहिले नाहीत. त्यांनी आज, उद्या करीत, पितृपक्षातच आपले घर सोडले आणि भाजपशी घरोबा केला, त्यांच्या घरात पोचले. वचन, नीती, संस्कृतीच्या गप्पा करणाऱ्यांनी पळवाटा शोधली आणि आठचा आकडा भरल्यानंतर तिघांना मागे ठेवून आठजण भाजपमध्ये गेलेसुद्धा! शपथ देणाराही गेला आणि घेणारेही गेले. आत्ता प्रश्‍न कोण, कोणाला विचारणार?

१) परमेश्वराला किंवा इतर इष्टदेवतेला किंवा वस्तूला स्मरून व साक्षीदार म्हणून आवाहन करून शपथ घेणे. २) केवळ स्वतःच्या नैतिक सत्त्वाचा हवाला देऊन शपथ घेणे. ३) आपली शपथ खोटी ठरल्यास अमुक एका स्वरूपाची आपत्ती आपणावर कोसळो, असे शिक्षावचन उच्चारून शपथ घेणे. ४) शपथ घेताना आपल्याला प्रिय असलेली वस्तू वा व्यक्ती ओलीस ठेवल्याप्रमाणे भाषा वापरली जाते. गोव्यातसुद्धा पूर्वी देवालयात जाऊन आपण निरपराध असल्याची शपथ घेतली जात होती, देवासमोर साक्ष देणे म्हणजे खरेपणा, सत्यता होती. त्यामुळे खोटारडेपणाला सर्वचजण घाबरत होते. नैतिकता, धार्मिकता, संस्काराचे बंधन होते. आज या सर्वांनाच हरताळ फासलेला असून दांभिकतेच्या वारसदारांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही.

Goa Congress Dispute
Goa Congress Rebel: त्या आठही आमदारांना गोमंतविभूषण पुरस्कार द्यावा!!

आज फुटलेल्या काँग्रेसच्या आठ जणांनीही थेट देव, दैवतांसमोर शपथ घेतली होती, जनतेला वचन दिले होते आणि ते निवडणूनही आले. त्यानंतर मात्र ते शपथ विसरले. फक्त सत्तेसाठी केव्हा उडी मारायची याचाच विचार करू लागले आणि अखेर त्यांनी भाजपात उडी घेतलीच. त्यामुळे सर्वसमान्य मतदार संतापले असून राजकारण्यांच्या शपथेवरील विश्‍वास उडाला आहे. मतदार भविष्यात कोणाचाही वचननामा, कोणाच्याही शपथेवर कधीही विश्‍वास ठेवणार नाही. कारण सत्तेसाठी घडलेले नाट्य महाभयंकर असून लज्जास्पद आहे. कारण देवानेच कौल दिला, असे म्हणणाऱ्यांबद्दल दांभिकांबद्दल काय बोलावे? नेहमीच खोटारडेपणा करणाऱ्यांचा, वागणाऱ्यांचा हा धंदाच झाला आहे. हा खोटारटेपणाचा कळस झाला!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com