Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

Goa Police: गोव्‍यातील तपास यंत्रणेचे वस्त्रहरण!

Goa Police: किरकोळ पुड्या पकडल्याने माफियांचे नुकसान होत नाही. जनतेला फसवण्याच्या पोलिसांच्या त्या क्लृप्त्या असतात.

Goa Police: गोवा आणि ड्रग्‍स’ हा नेहमीच चर्चेला येणारा विषय! या संबंधाची वीण ही विसविशीत होण्‍याऐवजी दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत आहे. त्‍याला येथील गृहखाते कारणीभूत ठरतेय. चार वर्षांपूर्वी केंद्रीय ‘रेव्हेन्यू इंटेलिजन्स’चे अधिकारी मुंबईहून गोव्‍यात आले; पिसुर्ले ‘आयडीसी’मध्‍ये एका भाजप नेत्याच्या फॅक्टरीवर छापा मारून त्यांनी तब्‍बल चार कोटी रुपयांचे 100 किलो ‘केटामाईन’ (अमली पदार्थ) जप्त केले.

लोखंडी फॅब्रिकेशन ऐवजी या फॅक्टरीत अमली पदार्थ बनवले जायचे. पोलिस-राजकारण्यांशी साटेलोटे असल्‍याने हे काम अगदी बिनबोभाटपणे सुरू होते. केंद्रीय एजन्सीला गोवा सरकार व पोलिस खात्यातील लोकांविषयी पुरेपूर कल्पना होती. त्यांना आगाऊ माहिती दिली असती तर ‘केटामाईन’चा साठा तेथून गायब होण्याची भीती होती. म्हणूनच गोवा पोलिसांना सुगावा लागू दिला नव्हता.

Goa Police
Goa Politics : गोमंतकीय राजकारणावर पक्षांतराचा कलंक

परिणामी कारवाईनंतर गोवा पोलिसांची नाचक्की झाली. अमली पदार्थासारख्या धंद्यात गुंतलेल्या गुन्हेगारांशी संगनमत करणारे गोवा पोलिस हे आंदोलनकर्त्यांवर मात्र अत्याचार करण्याची मर्दुमकी गाजवतात. मेळावली येथे वर्षानुवर्षे सुरू असलेली ग्रामस्‍थांची शेती ओरबाडून तेथे ‘आयआयटी’ उभारण्‍याच्‍या निर्णयाविरोधात आंदोलक महिलांनी ठिय्या मांडला होता. पोलिसांनी त्यांना पायदळी तुडवले.

खाणीतील गाळ हा सुपीक शेतजमीन उद्ध्‍वस्‍त करतो; तरीही गोवा सरकारकडून खाणचालकांचीच बाजू घेतली जाते म्हणून पिसुर्लेतील शेतकरी निषेध करण्यासाठी जमले. त्यांच्यापैकी एकाला उचलून पोलिस स्थानकात नेऊन बेदम मारहाण करण्याचा पराक्रमही गोवा पोलिसांनी केला. गोव्‍यातील गृहमंत्र्यांना अंधारात ठेवून केंद्राच्या थेट कारवाया आता नित्याच्या झाल्या आहेत.

Goa Police
Novel: कथा एका जिद्दीची - ''ही वाट दूर जाते''

मुंबई येथून आलेल्या केंद्रीय ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांनी दहशतवादी हस्तक अनिस अहमदच्‍या फ्लॅटवर पंधरा दिवसांपूर्वी छापा मारला; तोपर्यंत इतकी घातक व्यक्ती बायणात वास्तव्य करते याबद्दल पोलिस अनभिज्ञ होते. तथापि, अनिसने आधीच तेथून पोबारा केला होता. त्‍याला सुगावा कोठून लागला हे समजण्यास मार्ग नाही; परंतु दहशतवाद्यांचे साटेलोटे हे अमली पदार्थ धंद्यातील माफियांपेक्षाही उच्च पातळीवर असते, याबाबीला त्‍यातून पुष्‍टी मिळते.

त्यानंतर केंद्रीय दहशतवाद विरोधी पथकाने बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध आघाडी उघडली व गोव्यात एकच खळबळ माजली. गोव्यात वास्तव्यास असलेल्या तीन डझन बांगलादेशींना त्यांनी पकडले. अनेक वर्षांपासून ते बेमालूमपणे गोव्यात होते. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघासह डिचोली, वाळपईत त्यांना अभय मिळाले, तेही मतदारकार्ड, पॅनकार्ड, आधारकार्डासहित! राजकारणी, अधिकारी व पोलिस यांच्या मदतीशिवाय हे कसे शक्य आहे?

Goa Police
Kojagari Pournima 2022 : पेडणेची आगळीवेगळी 'पुनाव'

गेली दहा वर्षे गोव्यात, तर आठ वर्षे केंद्रात भाजप सत्तेत आहे. म्‍हणूनच या प्रकरणी संशयाची सुई त्यांच्याही दिशेने जाते. या धक्क्यातून गोमंतकीय सावरण्याआधीच म्हणजे चार दिवसांनी ‘सीबीआय’ने गोवा पोलिसांचे वस्त्रहरण केले. अल्पवयीन मुलींच्‍या लैंगिक शोषण प्रकरणात त्यांनी गोव्यात छापे मारले. गोव्यातील मुलींचे अश्लील व्हिडीओ कोण बनवून विकतात, हे न्यूझीलंड इंटरपोलने कळवल्यावर त्यांनी ही कारवाई केली.

याबाबतही गोवा पोलिस अनभिज्ञ! पोलिस हप्ते खाऊन बारमध्‍ये तर्र!! धुंदी उतरण्याआधीच ‘पीएफआय’विरोधी कारवाई पोलिसांवर लादली गेली. त्यांच्या काही नेत्यांच्या विघातक कृत्यांची लोकांना जाणीव होती व राष्ट्रवादी संघटना गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे करत होत्या. त्यांचा आरोप होता की, भाजप सरकार हे प्रमोद मुतालिक यांच्‍यावर तत्परतेने प्रतिबंधात्मक बंदी घालते; परंतु त्यांच्यापेक्षा भयंकर ‘पीएफआय’ व ओवेसींसारख्यांना रान मोकळे सोडते.

Goa Police
Goa Shipyard: ''गोवा शिपयार्डला 'निवासी दाखला' देऊन मोठी चूक''

गुजरात निवडणुकीत मते मिळवण्यासाठी सरकारने ‘पीएफआय’वर बंदी घातली; परंतु कारवाईत दम दिसत नाही. दहशतवाद्यांशी संबंध व देशाच्या सुरक्षेला धोका आदी कारणांमुळे बंदी घातल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. परंतु, त्‍याचवेळी इतक्या घातक संघटनेची ‘सोशल डेमोक्रॅटिक पक्ष’ ही भुजा निष्पाप, असे अमित शहांना का वाटते?

ज्यांचा संबंध दहशतवाद्यांशी आहे व ज्यांच्यामुळे देशाला धोका आहे, अशा घटकांना प्रसिद्धी द्यायला नको का? ज्यांना अटक केली त्यांचीदेखील नावे जाहीर केली नाहीत. कदाचित सत्ताधाऱ्यांच्या खांद्यास खांदा लावून प्रचार करतानाचे असंख्य फोटो उपलब्ध असतील म्हणून! भोळ्या गोमंतकीयांनी अशा घातक व्यक्तींशी संबंध ठेवले तर ते गोत्यात येऊ शकतात ना? ते होऊ न देणे ही सरकारची जबाबदारी नव्हे का?

Goa Police
Amit Patkar : 'भारत जोडो यात्रे'नंतर भाजपची 'अंतिम यात्रा' सुरु होईल

गुजरातमधील अदानींच्या बंदरात 21,000 कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ वर्षापूर्वी जप्त करण्यात आले. त्‍यानंतर मे महिन्‍यात तेथेच 500 कोटी रुपयांचे कोकेन सापडले. हा सिलसिला सुरूच राहिला. जुलैमध्‍ये पंजाब पोलिसांनी तेथे छापा टाकून आणखी 375 कोटींचे ‘हेरॉईन’ हस्‍तगत केले. मागच्‍या आठवड्यात मुंबई-गोवा विमानात बसण्याच्या तयारीत असलेल्‍या एका बोलिव्हियन महिलेकडून पंधरा कोटींचे ‘ब्लॅक कोकेन’ महाराष्ट्र नॉर्कोटिक्‍स विभागाने पकडले.

याचाच अर्थ विमानाने, रेल्वेने व बंदरातून गोव्यात येणाऱ्या ड्रग्सची पार्सले प्रत्येकी दशकोटींच्या घरात असतात; तर गोव्यात पोलिस पकडतात त्या पुड्या केवळ हजार व लाख रुपयांच्या! येथील एखादा छापा म्‍हणजे हजारो किरकोळ पुड्या व एक पार्सल म्हणजे शेकडो पुड्या होय. बंदर आणि विमानतळावर छापा मारून काही मोठे घबाड हाती लागल्‍याचे कधी ऐकिवात नाही. अहो, किरकोळ पुड्या पकडल्याने माफियांचे नुकसान होत नाही.

Goa Police
Goa Ssc Hsc Exam: दहावी, बारावी परीक्षा तारखा जाहीर

जनतेला फसवण्याच्या पोलिसांच्या त्या क्लृप्त्या असतात. पंजाब पोलिसांनी गुजरातमध्‍ये जाऊन पकडले तसे गोव्याचे पोलिस करतील हे विसरून जावा; परंतु गोव्यातील ड्रग्‍ज तस्करांविरुद्धच्या हैदराबाद पोलिसांच्या कारवाईला असहकार्य का म्हणून? अटक केलेल्‍या ‘पेडलर्स’पैकी तब्बल 96 टक्के ‘निर्दोष मुक्‍त’ का होतात? एकंदरीत हेरगिरीत माहीर असलेली लष्करी तुकडी गृहमंत्रालयात बसवल्याशिवाय गोव्यात काही बदलणार नाही, असेच वाटते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com