Gomantak Editorial: नावात काय नाही?

‘भारत’ या नावामागे प्रचंड मोठी परंपरा आणि इतिहास उभा आहे. या नावाशी भारतीयांची भावनिक नाळ जुळली आहे.
Gomantak Editorial
Gomantak EditorialDainik Gomantak

Gomantak Editorial व्हॉ ट इज इन द नेम? नावात काय आहे?...गुलाबाला दुसऱ्या कुठल्या नावाने ओळखले तर त्याचा सुगंध कमीजास्त होईल का?,’’ असा सवाल विख्यात नाटककार विल्यम शेक्सपीअरने आपल्या ‘रोमिओ अँड ज्युलिएट’ या सदाबहार नाटकात विचारला होता. या प्रश्नाची उत्तरे आजही देशोदेशीचे विचारवंत-प्रतिभावंत आपापल्या परीने शोधत आहेत.

नावाची ही चर्चा गेले दोन-तीन दिवस आपल्याकडे सुरु आहे. याला कारणीभूत ठरले एक मेजवानीचे निमंत्रणपत्र! जी-२० गटाच्या बैठकीसाठी येऊ घातलेल्या परदेशी पाहुण्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वाक्षरीनिशी निमंत्रणे गेली.

त्यात त्यांचे पद ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असे छापले होते. त्यांच्या या नव्या ओळखीमुळे गदारोळ झाला. देशाचे नाव अचानक बदलले की काय, अशी हाकाटी काहींनी केली. सत्ताधाऱ्यांनीही नेहमीप्रमाणे मौन धारण करुन नकळत हा गदारोळ वाढेल, हेच पाहिले.

हा गोंधळ बराचसा संभ्रमामुळे आणि राजकीय कारणांमुळे होतो आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. काही महिन्यांपूर्वी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ‘इंडिया’ नावाची आघाडी तयार केली.

अर्थात ही आघाडीही नवी नव्हतीच. जुन्याच ‘यूपीए’ने नवे नाव धारण केले होते! पण या राजकीय आघाडीला कुरघोडीछापाचे उत्तर देण्यासाठीच सत्ताधारी भाजप सरकारने देशाचेच नाव बदलून टाकण्याची खेळी केली नाही ना? असा संशय निर्माण झाला.

भरीस भर म्हणून सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात पाच दिवसांचे संसदेचे विशेष सत्र बोलावण्यात येत असल्याचे जाहीर झाले. हे सत्र नेमके कशासाठी बोलावले आहे? याची माहिती आजमितीस कुणालाच नाही.

कुणाच्या मते ‘एक देश, एक निवडणूक’ हा पंतप्रधानांचा लाडका मुद्दा तडीस नेण्यासाठी हे सत्र कामी येणार आहे, तर कुणाच्या मते ‘समान नागरी कायद्या’चे विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी हा खटाटोप आहे.

‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ या राष्ट्रपती भवनातील लेटरहेडवरील उल्लेखामुळे आता देशाच्या नव्या नामकरणाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संशयात खरोखर तथ्य असेल तर मामला गंभीर मानायला हवा. कारण सारे काही निवडणुकीच्याच परिप्रेक्ष्यातून बघितले जाऊ लागले की, हेतूंविषयीच शंका येते.

जगभरात ‘इंडिया’ या नावाने ओळखला जाणारा देश अचानक ‘भारत’ झाल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. अर्थात भारत म्हटल्यामुळे तसे बिघडले काहीच नाही. ‘इंडिया’ हे संबोधन मिळण्याआगोदरपासून आपली भूमी जंबुद्वीप किंवा भारत अशा नावाने ओळखली जात होती.

घटनेतदेखील ‘इंडिया, दॅट इज भारत, शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट’ असा उल्लेख आहे. प्राचीनकाळापासूनच हा देश ‘भारत’ किंवा ‘इंडिया’ या दोन्ही नावांनी जगाला माहीत होता. ग्रीक-रोमनांना सिंधुनदीच्या आसपासचा हा विशाल भूभाग हजारो वर्षांपासून परिचयाचा होता.

त्यांची व्यापारी गलबते येथल्या किनाऱ्यांवर ये-जा करत होती. परदेशी मुसाफिर आवर्जून येथे येत होते. त्यांनीही ‘इंडिया’ची वर्णने लिहून ठेवली आहेत. ब्रिटिशांच्या राजवटीत ‘इंडिया’ राष्ट्रकुलाचा भाग ठरला. तेव्हापासून आजतागायत आंतरराष्ट्रीय स्तरांवर हेच नाव रुढ झाले.

नव्या व्यापारयुगात ‘नावात काय आहे? या शेक्सपीरिअन प्रश्नाचे उत्तर ‘नावात बरेच काही आहे’ असेच द्यावे लागते. कारण जगाचा व्यापार नाममाहात्म्यावरच अधिक चालतो. जागतिक व्यापारपेठेत ‘इंडिया’ची ‘ब्रँड व्हॅल्यू’ प्रचंड आहे, हे कोणीही सांगेल.

एवढे परिचयाचे ब्रॅण्डनेम मोडीत काढून दुसरे आणणे अनेकदा धोक्याचे ठरते. शिवाय देशाचे नाव बदलणे हे इतके सोपे नाही. त्यासाठी अनेक सोपस्कार जागतिक पातळीवर करावे लागतात. मध्यंतरी ‘ट्विटर’चे नवे मालक इलॉन मस्क यांनी अचानक आपल्या कंपनीचे नाव बदलून ‘ट्विटर’ऐवजी ‘एक्स’ असे केले.

पण कंपनीचे नवे नामकरण आणि एखाद्या देशाचे नामकरण यात खूप फरक असतो. अनेक देशांनी आपली जुनी सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी नावे बदलली. सिलोनचे श्रीलंका, बर्माचे म्यानमार किंवा हॉलंडचे नेदरलँडस आणि पुन्हा हॉलंड असेही झाले.

ब्रिटिशांनी किंवा अन्य परकी जेत्यांनी पुसलेली पूर्वीची ओळख पुन्हा प्रस्थापित करण्याची ऊर्मी अनेक देशांनी दाखवली आहे. भारतानेही तसा काही प्रयत्न केला, तर त्यात वावगे असे मानण्याचे कारण नाही. तथापि, हे सारे हडेलहप्पी पद्धतीने करण्यामागचे सयुक्तिक कारणही सत्ताधाऱ्यांना देता आले पाहिजे.

देशाच्या घटनेचे सार लक्षात घेतले तर ‘इंडिया’ आणि ‘भारत’ ही दोन्ही एकाच देशाची नावे आहेत. दोन्हींचा वापर करण्यास घटना आडकाठी करत नाही. पण एकच एक नाव वापरण्याचा दुराग्रह मात्र घटनेला धरुन नाही. तसा तो करायचाच असेल तर घटनादुरुस्ती करावी लागेल.

‘इंडिया’ हे आपल्या देशाचे जागतिक व्यवहारातले नाव आहे आणि ‘भारत’ या नावामागे प्रचंड मोठी परंपरा आणि इतिहास उभा आहे. या नावाशी भारतीयांची भावनिक नाळ जुळली आहे. राष्ट्रगीतापासून चित्रपटगीतांपर्यंत सर्वत्र ‘भारत’ ठायी ठायी दिसतो. तथापि, काही गोष्टींचे पावित्र्य जपणे अनिवार्य असते. त्यांना संकुचित राजकारणाचा गंज चढता कामा नये, एवढे भान सर्वांनीच ठेवायला हवे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com