Goa Election 2021: प्रियोळ मतदारसंघात होणार चुरशीची लढत
Goa Election 2021: प्रियोळ मतदारसंघात होणार चुरशीची लढतDainik Gomantak

Goa Election 2022: प्रियोळ मतदारसंघात होणार चुरशीची लढत

‘व्होकल फॉर लोकल’चा घुमतोय नारा मंत्री गोविंद गावडे यांच्यासमोर भाजप, मगो, अपक्षांचेही आव्हान

सावईवेरे: प्रियोळ मतदारसंघात सध्या स्थानिक उमेदवारच हवा, असे म्हणत ‘व्होकल फॉर लोकल’चा नारा देण्यास सुरवात झाली आहे. आमदार तथा मंत्री गोविंद गावडे यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी मोठे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. तर माजी आमदार दीपक ढवळीकर यांचा या मतदारसंघातील तुटलेला संपर्क त्यांना अडथळा ठरणार आहे. संदीप निगळ्ये यांच्या रूपाने एक तगडा स्थानिक उमेदवार रिंगणात असेल, या चर्चेनेही आता जोर पकडला आहे.

फोंडा तालुक्यात फोंडा, मडकई, शिरोडा व प्रियोळ असे चार मतदारसंघ असून या चारही मतदारसंघांत मगो पक्षाचे प्राबल्य आहे. त्यामुळे युतीचा प्रश्‍न पुढे आला तरी या चारही मतदारसंघांवर मगो पक्षाचा दावा राहिल्याशिवाय राहणार नाही. सध्या युतीचा प्रश्‍न जरी धूसर असला तरी पुढील काही दिवसांत काय घडामोडी घडतील ते सांगणे राजकीय निरीक्षकांनाही समजणार नाही.

2017 च्या निवडणुकीत गोविंद गावडे हे अपक्ष उमेदवार निवडून आले. त्यांना भाजपचा पूर्णपणे पाठिंबा असल्याने ते 15 हजारपेक्षा जास्त मतांनी निवडून येऊन प्रियोळात इतिहास घडविला. येत्या निवडणुकीत एखाद्या अपक्ष उमेदवारास पक्षीय पाठिंबा असेल तर 2017 च्या निवडणुकीतील इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकेल, असे अनेकांना वाटत असावे.2007, 2012 2027 च्या निवडणुकांत मतदारसंघाबाहेरचे उमेदवार निवडून आले होते.

Dainik Gomantak

पुनर्रचना : मडकईतील सात पंचायतींपासून प्रियोळ मतदारसंघाची निर्मिती

1186 साली प्रियोळ या नव्या मतदारसंघाची निवडणूक झाली. मतदारसंघाची पुनर्रचना करताना पूर्वीच्या बलाढ्य मडकई मतदारसंघातील वेलिंग प्रियोळ, भोम-अडकोण, तिवरे-वरगाव, बेतकी-खांडोळा, वेरे-वाघुर्मे, वळवई व केरी या सात पंचायतींचा समावेश असलेला प्रियोळ हा नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघात 1989 ते 2017 पर्यंत एकूण सात निवडणुका झाल्या. 1989 ते 1994 मध्ये मगोचे डॉ. काशिनाथ जल्मी, 1999 व 2002 भाजपचे ॲड. विश्‍वास सतरकर, 2007 व 2012 मध्ये मगोचे दीपक ढवळीकर व 2017च्या निवडणुकीत अपक्ष गोविंद गावडे निवडून आले.

स्थानिक उमेदवारांत वाढ

या मतदारसंघात सध्या तरी मंत्री गोविंद गावडे यांना जशी अनुकूल परिस्थिती नाही तशीच दीपक ढवळीकर यांनाही अनुकूलता नाही. कारण गावडे यांना भाजपची उमेदवारी मिळाली तरी भाजपचा मोठा गट त्यांच्या विरोधात काम करण्याची शक्यता आहे. त्यातच प्रथमच मतदारसंघात स्थानिक उमेदवारांची संख्या वाढत आहे.

म्हणून जल्मी झाले पराभूत

प्रियोळ मतदारसंघ हा मगो पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण माजी आमदार स्व. डॉ. काशिनाथ जल्मी यांनी भूतखांब पठारावर होऊ घातलेल्या प्रदूषणकारी प्रकल्पास पाठिंबा दिल्याने 1999 च्या निवडणुकीत भाजपचे ॲड. विश्‍वास सतरकर निवडून आले. 2002 च्या निवडणुकीतही पुन्हा तेच निवडून आले.

...तर प्रियोळमध्ये घडणार इतिहास

संदीप निगळ्ये हे केरीचे सुपुत्र आहेत. त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, तसेच अन्य संस्थांशी चांगला संबंध आहे. सामाजिक कार्यातही ते अग्रेसर आहेत. ढवळीकरांच्या विरोधातील मते निगळ्ये यांना मिळाली तर प्रियोळात इतिहास घडू शकतो. बदलत्या राजकीय समीकरणांचाही येथे मोठा परिणाम दिसून येणार आहे.

नोनू नाईकांचा प्रचार

काँग्रेस पक्षातर्फे ॲड. वरद म्हार्दोळकर आणि रामकृष्ण जल्मी हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. याशिवाय अपक्ष उमेदवार म्हणून नोनू नाईक, दिनेश जल्मी, दिग्विजय वेलिंगकर तसेच पक्षाची उमेदवारी मिळाल्यास ॲड. सुषमा गावडे याही इच्छुक आहेत. नोनू नाईक यांनी ‘व्होकल फॉर लोकल’चा नारा लावत प्रचारकार्यास प्रारंभ केला. त्यानंतर अशीच मागणी जोर धरू लागली आहे. रिव्होल्युशनरी गोवन्सचा उमेदवार घोषित झाला नसला तरी माशेलमध्ये त्यांचे कार्यालय सुरू झाले आहे. एकंदरीत प्रियोळ मतदारसंघात8 ते 10 उमेदवार निवडणुकीत उतरणार असल्याने ही निवडणूक अतिशय रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Goa Election 2021: प्रियोळ मतदारसंघात होणार चुरशीची लढत
Goa Election 2022: दाबोळी मतदारसंघावर माविन यांची मजबूत पकड

भाजपचा कल संदीप निगळ्येंच्या बाजूने

भाजप कार्यकर्त्यांचा कल सध्या संदीप निगळ्ये यांच्या बाजूने आहे. त्यांनी निगळ्ये यांना पाठिंबा दर्शविला आहे. भाजपची उमेदवारी न मिळाल्यास त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून उतरविण्यात येणार आहे. माजी आमदार तथा मंत्री दीपक ढवळीकर यांनी 2017 च्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले. ते मतदारांच्या संपर्कात असते तर कदाचित येत्या निवडणुकीत वेगळे चित्र दिसू शकले असते.

आजवरचे आमदार

१९८९ - डॉ. काशिनाथ जल्मी (मगो)

१९९४ - डॉ. काशिनाथ जल्मी (मगो)

१९९९ - ॲड. विश्‍वास सतरकर (भाजप)

२००२ - ॲड. विश्‍वास सतरकर (भाजप)

२००७ - दीपक ढवळीकर (मगो)

२०१२ - दीपक ढवळीकर (मगो)

२०१७ - गोविंद गावडे (अपक्ष)

- मोहन वेरेकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com