Goa Election 2022: मडगाव मतदारसंघात दिगंबर कामतांचा विजयीरथ भाजप रोखणार?
Goa Election 2022: मडगाव मतदारसंघात दिगंबर कामतांचा विजयीरथ भाजप रोखणार?Dainik Gomantak

Goa Election 2022: मडगाव मतदारसंघात दिगंबर कामतांचा विजयीरथ भाजप रोखणार?

रणनितीकडे लक्ष भाजपकडून यावेळी नवा चेहरा पुढे येण्याची दाट शक्यता

मडगाव: मागील 20 वर्षे मडगावचे आमदार म्हणून अनुभव असलेल्या दिगंबर कामत यांना या मतदारसंघाची नस एवढी माहीत झाली आहे की त्यांच्या स्थानाला हात लावण्याची हिंमत अजून तरी कुणाकडून झालेली नाही. अशा परिस्थितीत यंदा कोणत्याही प्रकारे कामत यांचा पाडाव करणारच यासाठी भाजपची धडपड चालू आहे. कामत यांना टक्कर देण्यासाठी भाजप नवीन चेहरा रिंगणात उतरविण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

मडगाव मतदारसंघाकडे नेहमीच एका विशिष्ट कोनातून पाहिले गेले आहे. त्याचे कारण म्हणजे या मतदारसंघातून वासुदेव सरमळकरपासून दिगंबर कामतपर्यंत सर्व निवडून आलेले आमदार हे सारस्वत समाजातील आहेत. त्यामुळे या मतदारसंघाकडे शिक्षितांचा मतदारसंघ म्हणूनही पाहिले जात असले तरी या मतदारसंघात आमदार कोण हे नेहमीच ठरवत असतात त्या येथील झोपडपट्ट्या ही खरी वस्तुस्थिती आहे. आतापर्यंत झोपडपट्टीतील बहुतांश मतदार प्रत्येक निवडणुकीत कामत यांच्यामागे खंबीरपणे उभा राहिला आहे. त्यामुळे ही झोपडपट्टी कामत यांच्यापासून फोडणे ही यावेळी भाजपची मुख्य रणनीती असण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत मडगावातून सहावेळा जिंकून आलेल्या कामत यांनी या मतदारसंघावर आपली पक्की मांड जमविली आहे याची जाणीव सर्वांनाच आहे. 2012 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपचे रुपेश महात्मे यांच्यावर विजय मिळविल्याने 2017 साली भाजपने पुन्हा एकदा शर्मद रायतुरकर याना रिंगणात उतरविले. मात्र दिगंबर कामत यांच्यासमोर त्यांची डाळ शिजली नव्हती. त्यामुळे जुन्या चेहऱ्यांना बाजूला सारून यावेळी भाजप नवीन चेहरा पुढे आणणार असे सध्या तरी वाटते. भाजपच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत शर्मद आणि रुपेश यांची नावे असली तरी माजी आमदार बाबू नायक यांचे पुत्र भाई नायक, नवीन पै रायकर, घनश्याम शिरोडकर, आर्थूर डिसिल्वा यांचीही नावे चर्चेत आहेत. यावेळी उमेदवारीची माळ शिरोडकर यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता सध्या येथे व्यक्त केली जाते.

Goa Election 2022: मडगाव मतदारसंघात दिगंबर कामतांचा विजयीरथ भाजप रोखणार?
Goa Election 2022: फोंडा मतदारसंघात रवींना रोखण्यासाठी रणनीती

यावेळी तरी एकी दिसेल?

दिगंबर कामत यांनी प्रत्येक निवडणुकीत भाजपचे आव्हान लीलया परतावून लावले, तरी प्रत्येकवेळी त्यांना भाजपातील दुहीचा फायदा मिळाला. मडगाव भाजपात चार वेगवेगळे गट सक्रिय असून त्यापैकी कुणा एकाला उमेदवारी मिळाल्यास इतर तीन गट त्यांच्या विरोधात काम करतात, असा अनुभव आला आहे.

लढत काँग्रेस आणि भाजपमध्येच

सध्या गोव्याच्या राजकारणात आम आदमी पक्षाने आपली हवा तयार केली असली तरी मडगावात ती दिसत नाही. इतर पक्षांनाही मडगावात निवडणूक लढवायची इच्छा आहे आहे असे सध्यातरी दिसत नाही. त्यामुळे यावेळीही मडगावात काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांमध्येच लढत होणार अशी चिन्हे दिसतात. या निवडणुकीसाठी भाजपने आपली तयारी सुरू केली आहे. दिगंबर कामत यांनी मात्र अजून लोकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरवात केली नसली तरी त्यांचे नगरसेवक मतदारांच्या संपर्कात आहेत. एरव्ही प्रत्येक निवडणुकीत भाजप मडगावातील मोती डोंगर आणि तिथली कथित गुंडगिरी हा कामत यांच्या विरोधात निवडणूक मुद्दा म्हणून घेत होती. मात्र यंदा भाजपालाच मोती डोंगर आणि इतर झोपडपट्ट्या आपल्या कबज्यात घ्यायच्या असल्याने हा मुद्दाही यावेळी मागे पडणार आहे. उलट भूमिपुत्र विधेयकावरून सध्या अल्पसंख्याकांमध्ये भाजप विरोधी वातावरण तयार झाले आहे.

Dainik Gomantak

आजवरचे आमदार

1963 - वासुदेव सरमळकर (युगो)

1967 - 1980 अनंत (बाबू) नरसिंह नायक (युगो, युगो, काँग्रेस, काँग्रेस अर्स)

1984 - अनंत नरसिंह नायक (अपक्ष)

1989 - दिगंबर ज. कामत (तीनवेळा भाजप, तीनवेळा काँग्रेस)

सारे काही युतीवर अवलंबून

सध्याच्या स्थितीत दिगंबर कामत यांच्या स्थानाला धोका नाही, असे जरी वाटत असले तरी कामत मागच्या दोन निवडणुकांत चार-साडेचार हजारांच्या मताधिक्‍क्याने ते जिंकून आले आहेत. मडगावात गोवा फॉरवर्डचाही पगडा आहे. गोवा फॉरवर्डच्या उमेदवाराला तीन चार हजार मते पडल्यास काँग्रेसचे गणित हलू शकते. त्यातच ‘आप’चा उमेदवार रिंगणात असल्यास काँग्रेसच्या मतात विभागणी होऊ शकते. जी भाजपाच्या पथ्यावर पडू शकते. अशा परिस्थितीत काँग्रेसने इतर पक्षांशी युती न करता स्वबळावर निवडणूक लढविण्याचे ठरविले तर मात्र मतविभागणीचा फटका कामत यांना बसू शकतो. पालिका निवडणुकीत मडगावात काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डने युती केल्यामुळे ते पालिकेवर सत्ता स्थापन करू शकले होते. मात्र यावेळी युती झाली नाही, तर त्याचा काँग्रेसला फटका बसेल.

धुसफूस शमणार?

चार महिन्यांपूर्वी मडगाव पालिकेसाठी झालेल्या निवडणुकीत दिगंबर कामत प्रणीत मॉडेल मडगाव पॅनलने घवघवीत यश मिळविले होते. मात्र, नंतर नगराध्यक्ष पदावरून या पॅनलमध्ये धुसफूस निर्माण होऊन घनश्याम शिरोडकर आणि दामोदर शिरोडकर हे दोन नगरसेवक दूर गेले होते. अजूनही त्यांच्यातील नाराजी दूर झाली नाही. या दोघांपैकी एक असलेले घनश्याम शिरोडकर यांनी आता भाजप उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दिगंबर कामत यावर कशी मात करतात, त्यावरही बरेच काही अवलंबून आहे. नाराजीनाट्यावर पडदा पडणार का?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com