Goa Crime Cases: बेअब्रू झाली; तरीही...शहाणपण आले नाही

Goa Crime Cases: गोव्‍यात ‘इफ्‍फी’च्‍या निमित्ताने जगभरातील चित्रपट प्रदर्शित होतात, त्‍याच गोव्‍याची 'ड्रग्‍ज हब'अशी काळी बाजू देश-विदेशांत पोहोचत आहे.
Goa Crime Cases
Goa Crime CasesDainik Gomantak

Goa Crime Cases: ‘इफ्‍फी’च्‍या निमित्ताने गोव्‍यात जगभरातील चित्रपट प्रदर्शित होतात. त्‍याच गोव्‍याची ‘ड्रग्‍ज हब’ अशी काळी बाजू वर्षानुवर्षे असंख्‍य चित्रपटांतून देश-विदेशांत पोहोचत आली आहे. ‘ड्रग्‍ज व्‍यवसायाची पाळेमुळे खोदणार’ हा मुख्‍यमंत्र्यांचा परवलीचा ‘मोनोलॉग’ही आता घासून घासून गुळगुळीत झाला आहे.

अमलीपदार्थांचा ओव्‍हरडोस झाल्‍याने काल हणजूण येथे एक पर्यटक महिला अत्‍यवस्‍थ झाली आणि उपरोक्‍त विषयाला पुन्‍हा वाचा फुटली. वास्‍तविक, भाजप नेत्‍या सोनाली फोगट यांच्‍या मृत्‍युमागील सत्‍य उजेडात आल्‍यानंतर सरकारची जी बेअब्रू झाली, त्‍यानंतर तरी शहाणपण यायला हवे होते! दुर्दैवाने तसे घडले नाही. गोव्‍याला अमलीपदार्थांचा विळखा पडला आहे आणि तो सोडविण्‍याची आमच्‍यात इच्‍छाशक्‍ती, धमक नाही, हे सरकारने आता जाहीरपणे कबूल करावे.

ड्रग्‍जच्‍या आहारी जाऊन एखाद्याचा मृत्यू किंवा अत्‍यवस्‍थ झाल्‍याची बातमी होणे हे केवळ हिमनगाचे टोक आहे. त्‍यामागे मोठे रॅकेट असून, कोट्यवधींची उलाढाल करणारा तो धंदा आहे. त्‍यात राजकारण्‍यांपासून अनेक घटकांचे हात बरबटत आले आहेत. ड्रग्‍ज उपद्रवाच्‍या घटना घडत नसतात अथवा उघड होत नसतात तेव्‍हाही तो धंदा तेजीत सुरूच असतो, हे विसरता कामा नये.

दोन महिन्‍यांत तीनवेळा परदेशांतून गोव्‍यात येणारा मोठा ड्रग्‍जसाठा मुंबईत जप्‍त करण्‍यात आला आहे, हे त्‍याचेच द्योतक होय. हणजूण येथे दाखल झालेल्‍या दिल्‍लीतील महिलेला ड्रग्‍ज कोणी पुरविले, याचा तपास करताना एखादा पेडलर सापडेलही. पण, छोट्या फांद्या छाटण्‍याऐवजी मुळावर कधी घाव घालणार?

Goa Crime Cases
Blog: मुकाबला द्वेषमूलक वक्तव्यांचा

2008 साली हणजूण किनाऱ्यावर ब्रिटिश युवती स्‍कार्लेटचा संशयास्‍पद मृत्‍यू झाला, तेव्‍हा कोकेन-मॉर्फिनचा ओव्‍हरडोस झाल्‍याचा अहवाल समोर आला होता. ‘सनर्बन’सारख्‍या ‘इडीएम’ महोत्‍सवात ड्रग्‍जमुळे एक, दोन बळी हमखास जातात. उत्तर गोव्‍यात यंदा ड्रग्‍ज ओव्‍हरडोसमुळे मृत्‍यू झालेल्‍या चार केसेस आढळल्‍या.

अकरा महिन्‍यांत 70 हून अधिक ड्रग्‍ज व्‍यवहार उघडकीस आले. शंभर किलोंपेक्षा जास्‍त अमलीपदार्थ जप्‍त आणि 67 जणांना अटक करण्‍यात आली. त्‍यात 16 स्‍थानिक आहेत, तर 13 विदेशी नागरिक. वास्‍तवात कारवाईचे हे चित्र फसवे, दिशाभूल करणारे आहे. प्रत्‍यक्षात फार मोठी उलाढाल, माणसे यात गुंतलेली आहेत.

पोलिस टिकेचे धनी होतातच; पण सत्ताधाऱ्यांच्‍या कृपा आशीर्वादाशिवाय ड्रग्‍ज पेडलर्सना मोकळे रान मिळणे शक्‍य नाही. ‘कर्लिस’कडे जिवंत उदाहरण म्‍हणून पाहता येईल. त्‍याचा चालक एडवीन नुनीस हा गोव्‍यात तसेच गोव्‍याबाहेर ड्रग्‍जचा मोठा पुरवठादार असल्‍याचे हैदराबाद पोलिसांच्‍या तपासातूनच समोर आले आहे.

गोवा पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्‍याने हैदराबाद पोलिसांनी नुनीसला ताब्‍यात घेण्‍यासाठी प्रयत्‍नांची शिकस्‍त केली होती. अखेर जे स्‍थानिक पोलिसांना जमले नाही ते हैदराबाद पोलिसांनी करून दाखविले. त्‍यांनी हणजूण येथील प्रीतेश बोरकरसह गोव्‍यातील 174 ड्रग्‍ज दलालांवर गुन्‍हे दाखल केले.

ड्रग्‍जचा अंमल आता ग्रामीण भागाकडेही वळला आहे. लहान-लहान मुलं, महिला आहारी जाऊ लागल्‍या आहेत. व्‍यसनमुक्‍ती केंद्र, मानसोपचार तज्‍ज्ञांकडे अशा केसेस वाढत आहेत. गोव्यात सहज उपलब्ध होणारे ड्रग्ज, त्‍याचे सेवन करणाऱ्या तरुणाईचा वाढता टक्का ही मोठी चिंतेची बाब आहे. भविष्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.

कधीकाळी ड्रग्‍ज प्रकरणात पर्यटक अधिक प्रमाणात आढळत असत. परंतु आता गोमंतकीय तरुणही मोठ्या प्रमाणात व्‍यसनाच्‍या आहारी जात आहेत. अल्‍पावधीत मोठी मिळकत होते म्‍हणून स्‍थानिक तरुण पेडलर्स होत आहेत. अशा व्‍यसनांतून अनेक कुटुंबे देशोधडीला लागत आहेत. ही साखळी समाजस्‍वास्थ्य पोखरते आहे. सरकार याचा विचार कधी करणार?

ड्रग्‍ज व्‍यवहार बेकायदेशीर, समाजद्रोही असला तरी त्यात करोडो रुपयांचा फायदा आहे. म्हणूनच कडक कायदे वाकवूनही तो फोफावतोय. कोणत्याही धंद्यात विक्रेता आणि गिऱ्हाईक असे दोनच घटक नसतात. उत्पादक, वाहतूकदार, स्‍टॉकिस्‍ट, रिटेल विक्रेते, फिरते विक्रेते या घटकांचा सहभाग असतो.

Goa Crime Cases
Blog: डॉक्टर-रुग्ण संबंध

ड्रग्ज हा केवळ गोव्याचा प्रश्‍‍न नाही. जे पर्यटक गोव्यात येतात, त्यांच्या कुटुंबांचा, त्यांच्या प्रांतांचा, देशाचा आहे. गांधारीच्‍या भूमिकेतील सरकारने आतातरी समाजभान बाळगावे. ड्रग्‍ज व्‍यवसायाचा बीमोड करताना सांस्कृतिक मूल्ये रुजविण्यापासून डिॲडिक्‍शन उपचार आणि कठोर कायद्यापासून कडक शिक्षेपर्यंत उपाय हवेत.

यातील सांस्कृतिक मूल्यांचे एक उदाहरण म्हणजे, पारंपरिक भारतीय समाजात महिलांनी मद्यपान करणे चुकीचे ठरवले गेल्यामुळे जुन्या पिढ्यांमध्‍ये दारू पिणाऱ्या महिला नगण्य होत्या. अर्थात संस्कृती ही तुकड्यांत बघता येणार नाही. ड्रग्ज, कॅसिनो, वेश्‍‍याव्‍यवसाय या सगळ्या गोष्टींकडे एकत्रित पाहिले पाहिजे. त्‍या विरोधात दीर्घकालीन लढा द्यावा लागेल.

ज्यात चोख नियोजन करून चिवटपणे अंमलबजावणी करावी लागेल. ते दायित्‍व राज्‍य सरकारचे आहे. केवळ ड्रग्‍जमुक्‍तीच्‍या घोषणा देत तोंडाच्‍या वाफा घालवून काहीही साध्‍य होणार नाही. जनतेने, शिक्षक आणि इतर बुद्धिजीवींचेही ड्रग्‍जमुक्‍त गोव्‍यासाठी योगदान क्रमप्राप्‍त आहे. हा लढा अब्जावधी रुपयांची उलाढाल असलेल्या, संघटित स्वरूपाच्या गुन्हेगारीविरोधात आहे हे विसरून चालणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com