Gomantak Editorial: ...पण बोलणार नाही!

पत्रकारितेने सदैव प्रस्थापितांच्या विरोधात उभे राहून जनतेचा जागल्या म्हणून कार्य केले पाहिजे, ही धारणा आता कालबाह्य झाली आहे.
Press conference
Press conferenceDainik Gomantak

Gomantak Editorial संवादाचे पूल तुटायला लागले की मने दुभंगू लागतात आणि समाजातील दऱ्या-भेगा अधिकाधिक रुंदावू लागतात. लोकशाहीचा तर संवाद हाच आत्मा. अगदी वितंडवाद झाला तरी चालेल; पण एकाने दुसऱ्याशी बोलले पाहिजे ही सामाजिक अभिसरणाची प्राथमिक अट असते.

गेल्या काही वर्षांत हीच प्रक्रिया खुंटत चालली आहे. समाजमाध्यमांवरचा मतामतांचा गल्बला, प्रच्छन्न टीकाटिपण्या आणि आक्षेपार्ह शेरेबाजी हे सारे आताशा अंगवळणी पडू लागले आहे. काहीएक पातळी ठेवून विचारांचे आदानप्रदान करावे, अशी अपेक्षाच समाजमाध्यमांकडून ठेवता येण्यासारखी परिस्थिती नाही.

‘कोणीही यावे, टिचकी मारुनी जावे’ हाच या शब्दजालाचा नियम! पण दुर्दैवाने या प्रच्छन्नतेचे प्रतिबिंब अन्य माध्यमांमध्येही पडू लागले. हल्ली तर, एरवी सुसंस्कृतपणे बोलणाऱ्या नेत्यांच्या जिभांवर, टीव्ही कॅमेरे दिसताच वेगळेच पाणी चढू लागते.

टीव्ही वाहिन्यांचे काही पत्रकारही आपले ब्रीद विसरून प्रसंगी या शेरेबाजीत उतरतात. हरेक गोष्टीचे राजकारण करण्याच्या आजच्या काळात माध्यमे कशी सुटतील? किंबहुना काही माध्यमांचा तर जन्मच या अमंगळ भेदाभेदाच्या कामासाठी झाल्याची उदाहरणेही देता येतील.

पत्रकारितेची तत्त्वे बाजूला ठेवून काही महाभाग थेट प्रचारी थाटात बोलू लागले, तिथे सारा खेळखंडोबा झाला. काही टीव्ही वाहिन्यांच्या सूत्रधारांच्या कार्यक्रमात सामील न होण्याचा निर्णय विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने घेतला आहे, त्यामागील नाराजीची भावना हीच आहे.

मुद्दा आहे तो, विरोधी पक्षांना अशा प्रकारचे बहिष्काराचे अस्त्र उपसणे शोभते का हा! एखाद्या व्यक्तीची विचारसरणी पटली नाही, म्हणून त्याच्याशी अबोला धरणे वैयक्तिक पातळीवर खपून जाईलही; पण लोकशाही व्यवस्थेत राजकीय पक्षांनीच असा पवित्रा घेणे कितपत सयुक्तिक आहे?

‘काही टीव्ही वाहिन्यांवरचे निवेदक दररोज सायंकाळी पाच वाजता द्वेषाचा बाजार भरवतात; त्यात सहभागी होण्याची आमची इच्छा नाही’, असे स्पष्टीकरण देत ‘इंडिया’ आघाडीच्या प्रवक्त्यांनी चौदा निवेदकांच्या नावांची यादीच जाहीर करून त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचे जाहीर केले आहे.

या निवेदकांबद्दल आमच्या मनात कटू भावना नाही, पण आमच्या मनात देशप्रेम अधिक प्रखर असल्याने हे पाऊल उचलावे लागत असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते म्हणाले खरे; पण ते काही तितकेसे खरे नाही. हल्लीच्या काळात काही टीव्ही वाहिन्या सत्ताधाऱ्यांच्या भजनी लागलेल्या असतात, हे काही लपून राहिलेले नाही.

काही टीव्ही वाहिन्यांनी तर आपली सत्तानुकूल विचारधारा दडवून ठेवण्याची तसदीही घेतलेली नाही. पत्रकारितेने सदैव प्रस्थापितांच्या विरोधात उभे राहून जनतेचा जागल्या म्हणून कार्य केले पाहिजे, ही धारणा आता कालबाह्य झाली आहे. पत्रकारिता हा व्यवसाय झाल्यानंतर असली आदर्श तत्त्वे गुंडाळली जाणार, हे उघड होते.

सत्ताधाऱ्यांची री ओढणाऱ्या, आणि त्यांच्याच प्रचाराचे काम करणाऱ्या वाहिन्यांवर प्रतिनिधी न पाठवण्याचा ‘इंडिया’ आघाडीचा निर्णय द्वेषाचा बाजार उघडणाऱ्यांचा विरोध करण्यासाठी किंवा विशुद्ध देशप्रेमापोटी घेतलेला आहे, असे समजणे भाबडेपणाचे ठरेल.

पुढील वर्षात येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घेतलेला हा पवित्रा आहे, हे वेगळे सांगायला नकोच. गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही की, मनमोकळा वार्तालाप केला नाही. विरोधकांच्या आक्षेपाच्या मुद्द्यांना उत्तरे देण्याची औपचारिकताही त्यांनी कधी पार पाडली नाही.

निवडणुका आल्या की काही निवडक वाहिन्यांच्या प्रतिनिधींना मोजक्या मुलाखती देऊन काम साधून घेतले. विरोधी पक्षांनी वेळोवेळी पंतप्रधानांच्या या वर्तनावर कठोर टीका केली. एवढेच कशाला, संसदेत पंतप्रधानांना बोलण्यास भाग पाडण्यासाठी विरोधकांना अविश्वास ठरावाचे हत्यार उपसावे लागले, इथवर हा विसंवाद येऊन ठेपला.

पंतप्रधानपदी विराजमान होण्यापूर्वी हेच मोदी तत्कालीन पंतप्रधानांना ‘मौनी’ म्हणून चिडवत होते आणि पत्रकारांच्या अडचणीच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी माइक्रोफोन काढून चर्चेतून निघून जात होते! पत्रकारांच्या तिरकस प्रश्नांना उत्तरे देताना नेत्यांचा कस लागतो हे खरेच; पण अशा प्रसंगांना तोंड देण्यासाठी काळीज खंबीर लागते.

विरोधी पक्षातील नेत्यांनीही तसा खंबीरपणा दाखवायला हवा होता. बहिष्कार हे त्याचे उत्तर असू शकत नाही. पंतप्रधानांनी अघोषितरीत्या जे केले, तेच आता विरोधक घोषणेद्वारे करत आहेत.

मोदींच्या कारभारशैलीवर झोड उठवता-उठवता आपणही त्यांच्याच ‘ट्रॅप’मध्ये अडकत आहोत, हे विरोधकांमधील या बहिष्कारवाद्यांच्या लक्षात आलेले दिसत नाही.

Press conference
Goa's Oldest Women Died: पहिल्या विश्व महायुद्धापूर्वी जन्मलेल्या गोव्यातील सर्वात वृद्ध महिला 'मॅटी' यांचे निधन

जर तुम्हीही त्यांच्यासारखेच वागणार असाल तर तुमच्यात आणि त्यांच्यात वेगळेपणा तो काय राहिला?‘इंडिया’ आघाडीच्या या नव्या पवित्र्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या हातात जणू आयते कोलीत मिळाले.

पत्रकारांची गळचेपी करण्याची काँग्रेसजनांची आणीबाणीतील खोड अजून गेलेली नाही, अशी जळजळीत टीका आता भाजपच्या गोटातून होत आहे. तशी ती होणे स्वाभाविकच आहे. आपसातील टोकाचे मतभेद बाजूला ठेवून ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्ष एकदिलाने उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

राजकीय पक्षांना विरोधी विचारांच्या पत्रकारांशी जमवून घेणे त्यांना फार अवघड गेले नसते. पण तसे न करता नवी भिंत मात्र निर्माण केली जात आहे, ही बाब चिंताजनक वाटते. ‘काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही’ हा पवित्रा राजकारणात परवडणारा नाही, विरोधी पक्षांना तर मुळीच नाही.

Press conference
Karvi Strobilanthes Callosa Blossom In Goa: सात वर्षानंतर बहरली जांभळी निळी ‘कारवी’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com