दिप हा सांभाळुनी रे आणिला..!

‘गोमंत साहित्य सेवक मंडळ’ ही गोव्यातील जुनी जाणती वाङमयीन संस्था
दिप हा सांभाळुनी रे आणिला..!
Goa Literature Cultural life of GoaDainik Gomantak

Goa Literature : मराठी भाषेच्या प्रांतात काम करणारी ‘गोमंत साहित्य सेवक मंडळ’ ही गोव्यातील जुनी जाणती वाङमयीन संस्था. या संस्थेतर्फे भरवण्यात येणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाने गोव्याच्या सांस्कृतिक जीवनात भरगच्च योगदान दिलेले आहे. पोर्तुगीज राजवटीत 1935 साली वि. स. खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिले साहित्य संमेलन मडगाव येथे भरवण्यात आले होते पण नंतर पोर्तुगीजांच्या जाचामुळे नऊ संमेलने महाराष्ट्रात निर्वासित होऊन भरवावी लागली.

Goa Literature Cultural life of Goa
गोव्यात नियमित वर्गांचे मृगजळ सरेना!

मुक्त गोव्यातले अकरावे साहित्य संमेलन पणजी येथे 29 व 30 डिसेंबरला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यंदाचे 28 वे साहित्य संमेलन 27 व 28 नोव्हेंबरला वळपे, पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.

साहित्य संमेलन म्हटले की संसर्गजन्य असा हुरूप आणि उत्साह कार्यकर्त्यांमध्ये संचारतो आणि मग रुसवे-फुगवे, टीका प्रति-टीका, वाद-विवाद, आव्हाने प्रति-आव्हाने हे ओघाने आलेच. पडेल ते काम करणारे आणि प्रसंग आला तर स्वतःच्याही खिशात हात घालून पदरमोड करू शकणारे हरहुन्नरी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्यांच्या मनात असलेले भाषा प्रेम ही या संमेलनाची जमेची बाजू आहे. व्हॉट्सॲप ग्रुपवर संमेलनाविषयी आनंद व्यक्त करणारी नवी-नवी चारोळी, कवनं कवी-कवयित्री लिहू लागल्या आहेत.

वाढत्या महागाईमुळे संमेलनाच्या खर्चाच्या अंदाज पत्रिकेतील मूळ तरतूद सध्यातरी बाजूला पडल्यात जमा आहे. ‘आता खर्चाचं तोंड बघत बसूया नको. संमेलन थाटात आणि दिमाखात होऊ दे. आपल्या महालातील हे संमेलन हे संस्मरणीय व्हायला हवे’. असा विचार करून अबोल आणि हरहुन्नरी कार्यकर्ते आणि पदाधिकारी संमेलनाच्या पूर्वतयारीला लागले आहेत.

Goa Literature Cultural life of Goa
आदिवासींचा निष्ठावंत नेता हरपला

‘दीप हा सांभाळुनी रे आणिला

तेवत ज्योती, राहो उज्ज्वला’ असा पूर्वसुरींनी घालून दिलेल्या संमेलनविषयक विचारांचे आणि परंपरांचे जतन आणि संवर्धन निष्ठेने करण्याचा संपर्क संकल्प आयोजकांनी केला आहे. ‘गोमंतक मराठी साहित्य सेवक मंडळा’ने यंदाचे सुवर्णपदक जाहीर करून पूर्वसुरींनी मामा वरेरकर यांना दिलेला शब्द पाळला आहे. ‘पूनव’ ही संग्राह्य स्वरूपाची स्मरणिका उद्घाटन सोहळ्यात प्रकाशित केली जाणार आहे. उद्घाटन सोहळ्यात भाषेसाठी झटणाऱ्या आणि इतर कला क्षेत्रात क्षेत्रात स्वतःची नादमुद्रा उमटवणाऱ्या ज्येष्ठांचा गौरवही या संमेलनात होणार आहे.

आयोजकांनी विजय कापडी या ज्येष्ठ गोमंतकीय साहित्यिकाची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड करून नवीन पायंडा पाडला आहे आणि समीक्षकांकडून विनाकारण दुर्लक्षिल्या गेलेल्या विनोदी साहित्यालाही नकळतपणे मान्यता मिळवून दिली आहे. संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे हे संमेलनाचे सन्माननीय अतिथी असतील. त्यांची प्रकट मुलाखत हे या संमेलनाचे वैशिष्ट्य राहील.

‘2020 नंतरचे गोमंतकीय मराठी साहित्य’, ‘गोमंतकीय साहित्यात महिलांचे योगदान’, ‘गोव्याची नव्या परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे का?’, ‘मराठी भाषा आणि समाज माध्यमे’ या विषयावरील परिसंवादांमध्ये राजकारण, समाजकारण, शिक्षण, साहित्य व पत्रकारिता या क्षेत्रातील मान्यवर मंडळी सहभागी होणार आहेत. गोमंतकातील निवडक कवी कवयित्रींचे कविसंमेलन तसेच मराठी भावभक्ती, नाट्य संगीत आणि संगीत वारसा जपलेल्या पाच संगीत नाटकातील निवडक प्रसंगांचे सवेष सादरीकरण या संमेलनात होणार आहे.

1990 साली मराठी साहित्य संमेलन पेडणे येथे घेण्यात आले होते. दुसऱ्यांदा हा मान महालाला मिळाला आहे. या संमेलनातून प्रादेशिक वाङमय चळवळीला व्यापक अधिष्ठान व दिशा मिळेल अशी आशा आहेच...

- नारायण महाले

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com