Panchayat Election : मगोपचे अस्तित्वच दावणीला!

सध्या राज्यात पंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यात कॉंग्रेस, भाजपसह आरजी, आपसारखे पक्षसुध्दा उतरलेले दिसताहेत. मात्र, मगो पक्षाचे कुठेच नामोनिशान दिसत नाही.
Goa Panchayat Election
Goa Panchayat ElectionDainik Gomantak

मिलिंद म्हाडगुत

सध्या राज्यात पंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यात कॉंग्रेस, भाजपसह आरजी, आपसारखे पक्षसुध्दा उतरलेले दिसताहेत. मात्र, मगो पक्षाचे कुठेच नामोनिशान दिसत नाही. वास्तविक फोंडा तालुक्यासारख्या बालेकिल्ल्यात या पंचायत निवडणुकीत मगो पक्षाची हवा असायला हवी होती.

पण त्या गोटात एकदम सामसूम दिसत आहे. याला कारण आहे ते म्हणजे सरकारात असलेली मगो-भाजपची युती. ही युती नसती तर आज मगो पक्ष सरकारविरोधात गर्जना ठोकताना दिसला असता.

फोंडासारख्या मतदारसंघात आज अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. पण मगो पक्ष याविरुद्ध आवाज उठविताना दिसत नाही. काही महिन्यांपूर्वी ही स्थिती असती तर फोंड्याचे मगोचे नेते डॉ. केतन भाटीकर यांनी पत्रकार परिषद वा इतर माध्यमांद्वारे जबरदस्त आवाज उठविला असता.

पण आज परिस्थिती तशी राहिलेली नाही. ‘आपलेच दात, आपलेच ओठ’ म्हणण्याची वेळ सध्या पक्षावर आली आहे. आता पंचायत निवडणुकीत त्याचेच पडसाद उमटताना दिसत आहेत.

Goa Panchayat Election
Goa Tourism : बेकायदा पर्यटनाची मगरमिठी

एकमेव मडकई सोडल्यास इतर तीन मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मगो आवाज उठवू शकत नाही. वास्तविक फोंडा, शिरोडा व प्रियोळ हे मगोपचे गड समजले जातात. मागच्या वेळी फोंड्यात मगोपला केवळ 77 मतांनी हार पत्करावी लागली होती. प्रियोळातही मगो पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांचा केवळ 213 मतांनी पराभव झाला होता. यातून या मतदारसंघात मगो पक्षाची शक्ती असल्याचे दिसून येते.

काही पंचायतींत तर मगो पक्ष आजसुध्दा प्रभावी आहे. प्रियोळ मतदारसंघात सात पंचायती येतात. पण या पंचायत निवडणुकीत दीपक ढवळीकरांचा सहभाग असल्याचे अजून तरी दिसून आलेले नाही. फोंड्यात कुर्टी-खांडेपार ही एकमेव पंचायत असली तरी ती तालुक्यातील एक महत्त्वाची स्थानिक स्वराज संस्था समजली जाते. तिथेही असेच राजकारण सुरू आहे. यातून मगो पक्ष दोन पावले मागे गेल्यासारखा वाटू लागले आहे.

निवडणुकीपूर्वी मगो पक्ष कमीत कमी पाच जागा जिंकेल, असे वाटत होते. पण फोंडा, प्रियोळ व डिचोली या तीन जागा अवघ्याच मतांनी हुकल्यामुळे पक्ष दोन जागांवर येऊन ठेपला. निवडणुकीचा निकाल होण्यापूर्वी मगो कॉंग्रेसशी युती करून सरकार स्थापन करणार, असेही बोलले जात होते. मगोच्या पाच व कॉंग्रेसच्या 15-16 अशा दोघांच्या 21-22 जागा होतील आणि मगो ‘किंगमेकर’च्या भूमिकेत दिसेल, असा होरा व्यक्त होत होता.

पण हा होरा चुकीचा ठरला. कॉंग्रेसची गाडी 11 जागापर्यंत येऊन थांबली, तर मगो दोन जागांवरच अडकला. यामुळे ज्या पक्षावर निवडणुकीपूर्वी मगो आग ओकत होता, त्याच पक्षाच्या छावणीत जाणे त्यांना भाग पडले आणि यामुळेच आता मगोच्या गोटात शांतता दिसू लागली आहे. साहजिकच पुढे काय, हा प्रश्‍न मगो पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना सतावू लागला आहे.

‘आरजी’ने मडकईसारख्या सुदिन ढवळीकरांच्या बालेकिल्ल्यात सुध्दा तब्बल साडेतीन हजार मते घेतली होती, हे विसरता कामा नये. त्याचबरोबर शिरोड्यात ‘आरजी’ने पाच हजारांच्या वर मते घेऊन मगोला मात दिली होती. आज आरजी एक नवी शक्ती म्हणून उदयाला येऊ लागली आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीत आरजी मगोला मात देऊ शकते.

या पंचायत निवडणुकीतही याचा प्रत्यय यायला लागला आहे. प्रियोळसारख्या मतदारसंघातील पंचायतीत सध्या भाजपबरोबर आरजीची लढत होते की काय, अशी शक्यता दिसू लागली आहे. त्यामुळे मगोचे अस्तित्वच दावणीला बांधल्यासारखे झाले आहे. ही युती कायम राहिल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत फोंडा तालुक्यातील चार मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांत भाजप तर एका मतदारसंघात मगोप अशी स्थिती होऊ शकेल.

यातून मगोचीच कोंडी होण्याची शक्यता अधिक आहे. आता या कोंडीतून मगोप व खासकरून या पक्षाचे सर्वेसर्वा तथा सध्या सरकारात असलेले वीजमंत्री सुदिन ढवळीकर हे कसा मार्ग काढतात, कोणाला ‘चेकमेट’ करतात याचे उत्तर काळाच्या उदरातच दडले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com