Goa Success Story : पिंटो आणि गोमीस; गोमंतकीय अभिमानाचे दोन मानबिंदू

पिंटो यांना अपघाती वीरमरण आले नसते तर ते भारतीय हवाई दलाचे चौथे प्रमुख निश्चितच झाले असते. लंडनमधून एरोस्पेस मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवणारे पहिले भारतीय म्हणजे एअर व्हाईस मार्शल गोमीस.
Goa Success Story
Goa Success StoryDainik Gomantak

Goa Success Story : सुकूर पर्वरी येथील एअर व्हाइस मार्शल एरलिक पिंटो, पीव्हीएसम (मरणोत्तर), एम-इन-डी (सेवेत असताना निधन पावले), हे तिसरे नसले तरी, भारतीय हवाई दलाचे चौथे प्रमुख निश्चितच झाले असते पण, दुर्दैवाने घाला घातला. त्यांचा जन्म बेळगाव येथे झाला आणि त्याच शहरातील सेंट पॉल हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यांचे वडील डॉ. जुझे लुईस पिंटो डो रोझारियो हे भारतातील तत्कालीन प्रमुख लस निर्माता, सरकारी लस संस्था, बेळगावचे संचालक होते.

रॉयल इंडियन एअर फोर्सच्या फ्लाइंग ब्रँचसाठी निवड होण्यापूर्वी ते किंग जॉर्ज मिलिटरी स्कूलमध्ये होते. 1940 साली त्यांची नियुक्ती झाली. ते पहिल्या महायुद्धानंतरच्या काळातील आद्य भारतीय लढाऊ वैमानिकांपैकी एक होते. ते पहिले भारतीय एअर चीफ मार्शल सुब्रतो मुखर्जी यांच्यापेक्षा 42 सेवा क्रमांक कनिष्ठ आणि पाचवे एअर चीफ मार्शल, ओमप्रकाश मेहरा यांच्यापेक्षा 46 क्रमांक वरिष्ठ होते.

हुशार अधिकारी, उत्कृष्ट उड्डाणपटू आणि एक महान लष्करी नेता म्हणून त्यांची ओळख होती. पीव्हीएसएममधील त्यांच्याविषयीचे उद्धरण (1964) वाचनात आले आहे. आपल्या अधिकाऱ्यांचे मनोबल आणि आत्मविश्वास उंचावण्यासाठी त्यांनी आपल्या वैयक्तिक सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून अनेक कठीण एअरलिफ्ट मोहिमांचे नेतृत्व केले. जगातील सर्वात उंच ’एअरस्ट्रिप’ असलेल्या फॉरवर्ड आउटपोस्टवर प्रथम लँडिंगसाठी नदीच्या पात्राचा वापर करणे आवश्यक होते. धोके असूनही, एअर व्हाईस मार्शल पिंटो यांनी तेथील परिस्थिती तपासण्यासाठी स्वतः या फ्लाइटवर जाण्याचा निर्णय घेतला.

एअर व्हाईस मार्शल म्हणून, ते संपूर्ण भारतातील हवाई ऑपरेशन्सच्या संचालनासाठी जबाबदार असलेल्या आयएएफच्या तत्कालीन युनिफाइड ऑपरेशनल कमांडचे एओसी-इन-सी होते. 1961 साली गोवा, दमण आणि दीव येथे ‘ऑपरेशन विजय’अंतर्गत केलेल्या हवाई हमल्याचे ते इनचार्ज होते. युनिफाइड कमांडचे विकेंद्रीकरण झाले तेव्हा ते 1 जून 1963 पासून वेस्टर्न एअर कमांडचे एओसी-इन-सी होते आणि प्रमुखपदासाठी एक प्रमुख नाव होते. वय आणि गुणवत्तेचे मापदंड त्यांना अनुकूल ठरले. भारताच्या संरक्षण सेवेच्या कोणत्याही शाखेचे नेतृत्व करणारे ते पहिले गोवा ठरले असते, परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

दि. 22 नोव्हेंबर 1963 रोजी जम्मू काश्मीरमधील पुंछ नदीवर कोसळलेल्या आयएएफच्या 107 एचयू स्क्वॉड्रनच्या चेतक हेलिकॉप्टरमध्ये त्यांना वीरमरण आले. हेलिकॉप्टरमधील सर्व सहा जणांनी हौतात्म्य पत्करले. यात लेफ्टनंट जनरल दौलत सिंग जीओसी-इन-सी वेस्टर्न कमांड, लेफ्टनंट जनरल बिक्रम सिंग जीओसी एक्सव्ही कॉर्प्स, मेजर जनरल एनकेडी नानावटी जीओसी 25 डिव्हिजन, ब्रिगेडियर आरएम ओबेरॉय कमांडर 93 ब्रिगेड आणि हेलिकॉप्टर पायलट फ्लाइट लेफ्टनंट एसएस सोधी.

अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. परंतु, कोर्ट ऑफ इन्क्वायरीने ही शक्यता नाकारली. एक 300 फूट उंचीवर असलेल्या कड्यावर आणि १०० फूट उंचीवर नदीच्या विरुद्ध काठावर असलेल्या दोन खांबांमध्ये अडकवलेल्या समांतर केबलला हेलिकॉप्टरने सुमारे 200 फूट उंचीवर चुकून धडक दिली आणि हेलिकॉप्टर धडकले आणि सुमारे 350 मीटर दूर नदीच्या पात्रात कोसळले, असा निष्कर्ष नोंदवला. गोव्यातील दाबोळी विमानतळ ते चिखली जंक्शनपर्यंतच्या रस्त्याला आणि नवी दिल्लीतील आयएएफ पार्कला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

Goa Success Story
Portuguese Order in Goa : गोव्यात लग्नसमारंभांवर प्रतिबंध आणणारा 1736 चा आदेश माहित आहे का?

एअर व्हाईस मार्शल गिल्स गोमीस, व्हीएसएम (निवृत्त) यांचे घराणे उकसई येथील असून त्यांचे वडील संरक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकारी होते. त्यांनी सेंट कोलंबस, नवी दिल्ली येथून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे येथून पदवी प्राप्त केली. त्यांना 1977 साली प्रारंभी आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये नियुक्त करण्यात आले आणि जम्मू आणि काश्मीरमधील उच्च उंचीच्या भागात पश्चिम सेक्टरमध्ये एलओसीवर पाठवण्यात आले. पाच वर्षांच्या कारकिर्दीनंतर, त्यांना आयएएफमध्ये पाठवण्यात आले. त्यांनी एरोस्पेस मेडिसिनमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केले.

1988 साली आयएएफच्या ‘सर्वोत्कृष्ट स्क्वाड्रन वैद्यकीय अधिकारी’ चषकाचे ते मानकरी ठरले. 1989 साली यूकेमधील फार्नबरो येथे रॉयल एअर फोर्समध्ये पुढील अभ्यासासाठी त्यांची खास निवड झाली. लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधून एरोस्पेस मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले! 18 ब्रिटीश राष्ट्रकुल देशांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये प्रथम स्थान मिळवल्याबद्दल त्यांना इंग्लंडचा ‘बार्बरा हॅरिसन’ पुरस्कार मिळाला.

2003 आणि पुन्हा 2011 साली त्यांनी अमेरिकेतील ह्यूस्टन येथील नासा जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये स्पेस मेडिसिनचे प्रशिक्षण घेतले. विशेष सेवेसाठी 2011 साली त्यांना व्हीएसएम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सुमारे चार दशकांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी, एअर व्हाईस मार्शल गोमीस यांनी मोठ्या फॉरवर्ड फायटर हवाई तळांवर, दोन कमांड मुख्यालयात आणि हवाई मुख्यालयात सेवा दिली. हिंडन हवाई तळावरील क्रमांक 1 एरोमेडिकल ट्रेनिंग सेंटरचे त्यांनी नेतृत्व केले. नवी दिल्लीतील मुख्यालय वेस्टर्न एअर कमांडमध्ये ते प्रमुख वैद्यकीय अधिकारी होते. भारतातील नागरी विमान वाहतूक सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. ते आयएएफच्या इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन, बंगळुरूचे कमांडंट होते.

त्यांनी आयएएफ लढाऊ वैमानिकांसाठी फिजिकल कंडिशनिंग कोर्सची संरचना केली व या कोर्सचा पाया रचला. हेलिकॉप्टर वैमानिकांसाठी ‘क्रू कंडिशनिंग’ आणि एअरक्रूसाठी ‘नाईट व्हिजन गॉगल्स: अ रेडी रेकनर’ या जगात एकमेव अशा प्रकारच्या दोन ऑपरेशनल पुस्तकांचे श्रेय त्यांना जाते. अवकाशात वैमानिकांना भेडसावणाऱ्या भ्रमिष्टावस्थेवर उपाय शोधण्यात त्यांचा मोठा वाटा आहे आणि त्यासाठी त्यांना सन्मानितही करण्यात आले आहे.

बंगळुरूच्या राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत ते प्राध्यापक झाले. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नल्समध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन प्रकल्प आणि शंभरहून अधिक वैज्ञानिक प्रकाशने त्यांच्या नावे आहेत. अनेक पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रबंध कार्यात ते मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. इंडियन सोसायटी ऑफ एरोस्पेस मेडिसिनचे ते फेलो आहेत.

एअर व्हाईस मार्शल गोमीस सप्टेंबर 2014 मध्ये सेवानिवृत्त झाले. आयएएफमध्ये डॉक्टर म्हणून सेवानिवृत्त झालेल्या ग्रुप कॅप्टन विनिता गोमीस या आपल्या पत्नीसोबत ते सध्या गोव्यात राहतात. नात्याने ते, मेजर अलेक्झांडर गोमीस, ब्रिगेडियर अ‍ॅशले गोमीस यांचे पुतणे, सर्जन कमांडर फ्रेड नाझरेथ यांचे भाचे, सर्जन लेफ्टनंट कमांडर आनेत फर्नांडिस यांचे बंधू आणि लेफ्टनंट कमांडर व्हॅलेरियन (वोली) फ्रान्सिस मेंडान्हा यांचे जावई लागतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com