Oscar Fernandes: गोव्याने सच्चा मित्र गमावला!

कोकणी चळवळीत Oscar Fernandes यांनी शिलेदारी केली
Oscar Fernandes
Oscar FernandesDainik Gomantak

ऑस्कर फर्नांडिस (Oscar Fernandes) यांच्या निधनाने एक सचोटीचा राजकारणी, एक कार्यक्षम कार्यदर्शी, गोरगरिबांचा उत्थानाबद्दल सच्ची आस्था असलेला नेता आणि एक प्रांजळ मित्र गमावल्याचे दुःख मला होते आहे. ते केवळ माझे मित्रच नव्हते तर आम्हा दोघांच्या परिवारांचे अत्यंत निकटचे असे संबंध होते. माझ्या घरी ते अनेकदा यायचे, आमच्यात मिसळायचे. काँग्रेसचे (Congress) ते वरिष्ठ नेते असले तरी आपल्या ज्येष्ठत्वाचा गंध मैत्रीला लागणार नाही, याची काळजी हा ऋजू स्वभावाचा माणूस घ्यायचा. त्यांच्या निधनाने आपला जवळचा आप्त हिरावला गेल्याचे शल्य मनाला जाचते आहे.

ऑस्कर यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने केवळ एक ज्येष्ठ चारित्र्यवान नेताच नव्हे तर पक्षाच्या मूळ धोरणांशी शेवटपर्यंत निष्ठा राखून असलेला विश्वासू कार्यकर्ता गमावला आहे आणि हे नुकसान पक्षाला प्रदीर्घ काळ जाणवत राहील. माझे आणि त्यांचे नाते पक्षनिष्ठेची पातळी ओलांडून वैयक्तिक स्तरावर कसे आणि कधी विकसित झाले ते मलाच कळले नाही. प्रांजळ मैत्री करण्याजोगा माणूस होता तो. आम्हा दोघांत काही तारखांचे योगायोग होते. 26 ऑगस्ट हा माझा जन्मदिवस आणि माझ्या लग्नाचाही वाढदिवस. तोच ऑस्कर यांचा जन्मदिवस होता. अनेकदा हा दिवस आम्ही एकामेकांच्या सहवासात साजरा केला आहे. त्यांच्या उपस्थितीत आमच्या आनंदाला उधाण यायचे. ते चांगले गायक होते, दर्जेदार संगीताचा कान आणि गळा त्यांना होता. माउथ ऑर्गन ते छान वाजवायचे. त्यांच्या सहवासात आमच्या उत्साहाला वेगळेच परिमाण लाभायचे.

Oscar Fernandes
Goa Politics: सावंत सरकारला ‘आप’च्या घोषणांची धास्ती

ऑस्कर योगाचे भोक्ते होते. निरोगी आचारविचारांकडे कल असलेला हा माणूस बराच काळ व्यायामशाळेत व्यतीत करायचा. मुख्य म्हणजे आपल्या भोवतीचे वलय झुगारून माझ्या परिवारात मित्रमंडळीत सहजपणे मिसळायचे. त्यांनी आपल्या पदाची मिरास मिरवलेली मी तरी कधी पाहिली नाही. सर्वसामान्यांशी त्यांची नाळ पटकन जुळायची. मला भेटायला येणाऱ्यांशीही ते जुना परिचय असल्याच्या थाटात संवाद साधायचे. त्या अविर्भावात सच्चेपण असायचे, जमिनीला कान लावून तिची हाक ऐकण्याची उत्कटता असायची. ते वरवरचे नेतृत्व नव्हते तर त्याला सतत मातीचा गंध हवा असायचा.

ऑस्कर मंगळुरचे होते. कोकणी ही त्यांचीही मातृभाषा. या भाषेच्या उत्थानासाठी त्यांनी असोशीने यत्न केले. कोकणी चळवळीत त्यांनी आपल्या परीने शिलेदारी केली. त्यासाठीही कोकणी जनता कायम त्यांचा ऋणात असेल.

माझा त्यांचा वैयक्तिक स्तरावर परिचय झाला तो मी गोव्याचा मुख्यमंत्री या नात्याने काँग्रेसच्या कार्यकारी समितीचा सदस्य असताना. तेही या समितीचे सदस्य होते. पक्ष नेतृत्वाचा त्यांच्या क्षमतेवर असलेला प्रगाढ विश्वास मी तेव्हा अनुभवला. पक्षाने माझ्याकडे ईशान्येकडील राज्यांची जबाबदारी दिली, तिच्यासाठीची पूर्वतयारी त्यांनी केली होती. माझ्याआधी ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली होती आणि त्या भागातील विसंवादी घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्या मुत्सद्देगिरीचा सुयोग्य वापर केला होता. ईशान्येकडील अनेक राज्यातल्या अशांततेवर तोडगा काढण्यासाठी ते पडद्यामागून अहर्निश वावरले. विशेषतः नागालॅंडमधील समस्येचे निराकारण करण्यासाठी पक्षाने गठित केलेल्या राजकीय समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Oscar Fernandes
Goa Curfew: केरळमधून गोव्यात येणाऱ्यांना विलगीकरण सक्तीचे

काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस म्हणूनही ऑस्कर यांनी बराच काळ काम केले. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा लाभ गोव्याला झाला. पक्षकार्यासाठी त्यांची नेहमीच तयारी असायची, कोणतीही जबाबदारी त्यांनी क्षुल्लक मानली नाही आणि तिला न्याय देण्यापासून ते मागे हटले नाहीत. पक्ष नेतृत्वाचा त्यांच्यावर विश्वास असण्यामागचे कारणही निरपेक्ष सेवाच होती याबद्दल माझ्या मनात संशय नाही. राजकारणात येण्याआधी वैयक्तिक जीवनात ते यशस्वी असे कृषीकर्मी होते. त्यांना शेतीची आवड होती आणि त्यांनी विचारपूर्वक स्वतःला शेतीत गुंतवून घेतले होते. पण दिवंगत इंदिरा गांधींनी त्यांना राजकारणात सक्रिय होण्याचा आग्रह केला आणि त्यांनी तो मानला. निवडणुकीच्या राजमार्गाने ते राष्ट्रीय राजकारणात आले. संयम, चारित्र्य, कार्यक्षमता या त्रिसूत्रीच्या आधारावर त्यांनी पक्ष नेतृत्वाचा विश्वास संपादन केला. एक यशस्वी सांसद म्हणून त्यांची कीर्ती पक्षाच्या सीमा ओलांडणारी ठरली.

मंत्री म्हणून वावरताना त्यांच्याकडे श्रम आणि रोजगार, रस्ता परिवहन आणि महामार्ग अशी महत्त्वाची खाती होती. या खात्यांचा लाभ जनतेला कसा होईल याची चिंता ते नेहमीच करताना दिसायचे. मला आठवते, गोव्याशी संबंधित अनेक समस्या मी त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा घेऊन गेलो तेव्हा त्या समस्यांचे निराकारण जनमान्य पद्धतीने होईल, याची काळजी त्यांनी वाहिली. ऑस्कर यांच्या निधनाने गोव्याने आपला सच्चा मित्र गमावला आहे. गोवा, कोकणी नेहमीच त्यांच्या हृदयाच्या निकट राहिले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मी त्यांच्या अर्धांगिनी ब्लॉसम यांच्याशी, तसेच त्यांचे पुत्र ओशन व कन्या ओशियानी यांच्याशी संपर्क साधून सहवेदना व्यक्त केल्या. त्यांचा विरह सहन करण्याचे बळ ईश्वराने त्यांच्या परिवारास द्यावे, अशीच माझी प्रार्थना आहे.

- लुईझिन फालेरो (माजी मुख्यमंत्री)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com