"होतो मी गुंग ऐकण्यात आपुलाच स्वर": रवींद्रनाथ टागोर

दैनिक गोमन्तक
रविवार, 13 डिसेंबर 2020

जी कल्पनाचित्रे रवींद्रनाथांनी रेखाटली ती निसर्गानुभूतीतून, ग्रामीण जीवनाच्या चित्रांतून, खेड्यात चाललेल्या अनेकविध उद्योगाच्या निरीक्षणातून घेतलेली असत.

वींद्रनाथ टागोर यांच्या "निबंधमाला'' (खंड पहिला)मधील "मानवसत्य'' या निबंधातील विचारांचा येथे थोडक्‍यात परामर्ष घ्यायचा आहे. रवींद्रनाथ हे जसे प्रतिभावंत कवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चित्रकार होते तसेच ते द्रष्टे विचारवंत होते. इतिहास, प्राचीन वाङ्‌मय ते आधुनिक वाङ्‌मय, शिक्षणप्रणाली, धर्म, राष्ट्रनीती, भारतीय समाजरचना आणि प्रादेशिक जीवन या जीवनाच्या विविध पेलूंविषयी त्यांचे सतत चिंतन चालले होते. जीवनाचा समग्रतेने वेध घेण्याचा त्यांचा निदिध्यास अतुलनीय स्वरूपाचा होता. त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या जन्मभूमी तीन. त्या एकमेकीशी संलग्न आहेत. ह्यातली पहिली जन्मभूमी ही पृथ्वी. पृथ्वीवर सर्वत्रच मनुष्याचे वासस्थान आहे. शीतप्रधान तुषाराद्री, उत्तप्त वालुकामय मरुप्रदेश, उत्तुंग दुर्गम गिरिश्रेणी आणि ह्या बंगालसारखी सपाट भूमी, सर्वत्रच मनुष्याचे अस्तित्व आहे. मनुष्याला पृथ्वीचा कोणताही भाग दुर्गम नाही. पृथ्वीने त्याच्यासाठी आपले ह्रदय खुले करून ठेवले आहे.

मनुष्याचे दुसरे वासस्थान म्हणजे स्मृतिलोक. प्राचीन कालापासून पूर्व  पुरुषांच्या कथा-कहाण्यांनी त्याने काळाचे घरटे तयार करून घेतलेले आहे. हे काळाचे घरटे स्मृतिद्वारा रचित आणि ग्रथित केलेले असते. ही कहाणी नुसती एका एका विशिष्ट मनुष्य-जातीची नाही, ती समस्त मनुष्य-जातीची कहाणी असते. स्मृतिलोकात सर्व मनुष्याचे मीलन होत असते.विश्‍वमानवाचे वसतिस्थान एकीकडे पृथ्वी, तर दुसरीकडे सर्व मानवांचा स्मृितलोक-मनुष्य जन्मग्रहण करतो. समस्त पृथ्वीवर आणि निखिल इतिहासात. 
त्याचे तिसरे वसतिस्थान आत्मिकलोक. त्याला  सर्वमानवचित्ताचा महादेश असेही म्हणता येईल. अंतर्यामी सकल मानवांचे एक होण्याचे क्षेत्र म्हणजे हा चित्तलोक. एक व्यापक चित्त असतेच; ते व्यक्तिगत नसते. विश्‍वगत असते. 

आपल्या कौटुंबिक पार्श्‍वभूमीवर रवींद्रनाथांनी आत्मावलोकन केलेले आहे. लहानपणापासून उपनिषदांतले बरेचसे अंश वारंवार म्हणत असल्यामुळे त्यांना ते तोंडपाठ झाले होते. पण पूर्ण मनाने त्या साऱ्यांचे ते काही ग्रहण करू शकले नव्हते. गायत्रीमंत्र त्यांनी तोंडपाठ केलेला होता. विश्‍वभुवनाचे अस्तित्व आणि त्यांचे स्वतःचे अस्तित्व ही एकात्मक आहेत. ह्या विश्‍वब्रह्मंडाचा जो आदि आणि अंत आहे, त्यानेच त्यांच्या मनात चैतन्याची प्रेरणा दिलेली आहे. चैतन्य आणि विश्‍व, बाहेर आणि आत, सृष्टीच्या ह्या दोन धारा परस्परांमध्ये मिसळून गेल्या आहेत असे त्यांना वाटत असे. सारी सृष्टीच सौंदर्याने नटलेली आहे असे त्यांना दिसून आले.
जिला "आध्यात्मिक'' हे नाव देता येईल अशी ही त्यांना पहिल्याने झालेली जाणीव होती. त्या दिवसांत त्यांनी लिहिलेल्या कवितांमध्ये - त्यांच्या "प्रभात-संगीता’त ती उमटलेली आहे असे त्यांनी नमूद केलेले आहे. माणसाच्या दोन बाजू असतात. एक त्या माणसाशी बध्द असतात आणि दुसरीकडे सर्वत्र व्याप्त झालेली असते. अशा वेळी रवींद्रनाथ लिहून गेले.

झालो मी जागा
पाहिले तो तिमिरातच होतो मी बसलेला
बनुनिया पूर्ण अंध;
होतो मी आपणच
आपुल्यामध्ये बध्द ।
होतो मी गुंग ऐकण्यात आपुलाच स्वर 
उमटत होते त्याचे त्याचे प्रतिध्वनी कानावर ।।
ती जशी काही स्वप्नाचीच अवस्था होती. रवींद्रनाथ उद्‌गारतातः
गभीर- गभीर गुहा, गभीर अंधार घोर
गभीर निद्रिस्त प्राण, एकटाच गातो गान,
मिसळले स्वप्नगीत निर्जन मम ह्रदयामधि
अहं ज्यावेळेस जागृत होतो, आत्म्याची उपलब्धी त्याला होते, त्यावेळी त्याला नवीन जीवन प्राप्त होते. कविमनाची भावावस्था एकदा अशी झाली 
अहंच्या क्रीडागृहातच आपण बंदिवान होऊन पडलेलो आहे अशी जाणीव त्यांना झाली. जाणिवे-नेणिवेच्या संघर्षात प्राणांतून गीत उमललेः

आज ह्या प्रभाती, रविच्या किरणांनी
स्पर्शिले कसे रे माझ्या प्राणासी!
गुहेतील अंधारा स्पर्शिले कसे रे 
ह्या प्रभातविहगाच्या गानांनी !
इतुक्‍या काळानंतर
कां ते मज मुळि न कळे 
हे जागृत होत प्राण!
जागृत हे आज प्राण,
उसळतात ह्या लाटा
वासनेस प्राण्यांच्या, आवेगा प्राण्यांच्या
रोधणे अशक्‍य जाण.
सारीकडे अंधकार असताना सृजनशीलतेची पहाट फुटली. त्या दिव्यक्षणाचे हे चित्र आहे. त्या दिवशी बाहेर पडण्यासाठी कारागृहाचे दार उघडले गेले असे रवींद्रनाथ म्हणतात. मानवधर्माच्या महासमुद्राला मिळण्यासाठी आर्त हाक आली. त्यांनी "प्रभात-उत्सव'' ही कविता लिहिली. या कवितेत ते उद्‌गारतात.

ह्रदय आज माझे हे किती खुले झाले 
सलगीने सारे जग त्याकडेस आले ।
शत, शत मानव सारे
ह्या जगांत वसणारे
हांसतात प्राणांतरि घालुनी गळ्यात गळे 
समस्त मानवाच्या ह्रदयवीणेवर उमटलेले हे तरंग. दोन माणसांमध्ये उसळत असलेल्या आनंद रवींद्रनाथांना दिसला. विश्‍वव्यापी प्रकाश त्यांना दिसून आला. त्याचक्षणी परमसौंदर्याचा अनुभव मनाला आला. मानवा-मानवामधील संबंधात जी रसलीला असते, जो आनंद असतो, जी अनिर्वचनीयता असते, तिचे दर्शन त्या घटकेला त्यांना झाले.

गाणे थांबले तरी तो ऐक्‍यसंबंध काही तुटणार नाही या जाणिवेतून ते लिहितातः
संपणार गीत उद्या, म्हणूनि का न गायचे 
आज उदेली प्रभात, - गीत का न गायचे?
कसला मनि कोलाहल,
हा ध्वनि तुमचाचि सकल!
आनंदमाझारी जन सारे डुंबतात,
कधि निमग्न होती त्यात,
पाहतात धरणीते, गाति नव्या आनंदे,
आठवतो दिन अतीत
‘आनंदरूपमृतं यदविभाती' ही उपनिषदांची वाणी पुनःपुन्हा आपल्या मुखातून बाहेर पडत आहे. असा त्यांना प्रत्यय आला. स्थूल आवरणाला मरण आहे, अंतरतमातील आनंदमय जी सत्ता आहे तिला मरण नाही हे आकळले.

जी कल्पनाचित्रे रवींद्रनाथांनी रेखाटली ती निसर्गानुभूतीतून, ग्रामीण जीवनाच्या चित्रांतून, खेड्यात चाललेल्या अनेकविध उद्योगाच्या निरीक्षणातून घेतलेली असत. पद्मेच्या काठावरचे त्यांचे जीवन जनसंमर्दापासून दूर असले तरीही ‘पोस्ट मास्टर' ‘समाप्ती' आणि ‘सुट्टी' इत्यादी कथांतून उमटलेली आहेत. 
यानिबंधाच्या शेवटी रवींद्रनाथांची धारणा अत्यंत पारदर्शी शैलीत व्यक्त झाली आहे ती पुनःपुन्हा मानवी बुध्दीच्या कक्षेत राहूनच विचार करायला लावणारी आहे. 

"... कोणत्यातरी अमानवीय किंवा अतिमानवीय सत्याच्या जवळ जाण्याची गोष्ट कोणी बोलू लागला तर ती समजू शकण्याची शक्ती माझ्यात नाही. कारण माझी बुध्दी ही मानवाची बुध्दी आहे, माझे ह्रदय, मानवाचे ह्रदय आहे, माझी कल्पना, ही मानवाची कल्पना आहे. तिला कितीही घासून-पुसून शुध्द करण्याचा प्रयत्न केला तरी ती मानव चित्ताला सोडून कधीच जाऊ शकणार नाही. आपण ज्याला विज्ञान म्हणतो, तो मानवी बुध्दीने प्रमाणित ठरलेलेच विज्ञान आहे;  आपण ज्याला ब्रह्मानंद म्हणतो, तोही मानव चैतन्यातच प्रकट होणारा आनंद आहे.''

संबंधित बातम्या