Windopain Oyster

Windopain Oyster

Dainik gomantak

चिखलीतील 'ही' कालवे, त्यामुळे विंडोपेन ऑयस्टर म्हणून नावारूपाला आली

पोर्तुगीजांनी अशाप्रकारची तावदाने बसवण्याची परंपरा लॅटिन अमेरिकेतही नेली आणि त्यामुळे गोव्यातल्या या कालवांची ब्राझिलमध्ये निर्यात होऊ लागली. आज गोव्याच्या...

पश्चिम किनारपट्टीवरची गोव्याची भूमी सागर संपत्तीची श्रीमंती अनुभवत असून, जेथे अरबी सागराचा मांडवी- जुवारी नद्यांशी संगम होतो, तेथे जैविक संपदेच्या वैविध्यपूर्ण अशा वारश्याचे दर्शन घडते. नानाविध खनिजे, प्रवाळ, मत्स्यसंपदेचे घटक यांची श्रीमंती सागर आणि सरितेच्या संगम परिसरात अनुभवायला मिळते. कर्नाटकातल्या नेत्रावळी अभयारण्याच्या माथ्यावरच्या दिघी घाटातून उगम पावणारी जुवारी नदी मुरगाव बंदराच्या परिसरात अरबी सागराशी एकरूप होते. एकेकाळी सां जासिंतो बेट आणि परिसरात त्यामुळे अन्य वैविध्यपूर्ण मत्स्यसंपदेप्रमाणेच शंखधारी मासेही मुबलक प्रमाणात आढळतात.

आज मार्मागोवा नावाने देशविदेशात प्रसिद्धीस पावलेले बंदर जेथे वसलेले आहे, तो मुरगाव शहर आणि परिसर नागरीकरण, औद्योगिकीकरण आणि विविध मानवकेंद्रित विकास प्रकल्पांनी गजबजलेला असताना इथे जैविक संपदेचे वैविध्य अनुभवायला मिळते. त्यात मृदुकाय संघाच्या शिंपाधारी वर्गातील माशांचा समावेश होतो. या वर्गांतल्या खिडकीच्या तावदानासाठी उपयोग केल्या जाणाऱ्या कालवांची विपुल प्रमाणात एकेकाळी मुरगाव तालुक्यातल्या चिखलीच्या उपसागरात पैदास व्हायची. गोव्यातल्या बहुतांश लोकांच्या अन्नाचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या कालवांचे वैविध्य शेकडो वर्षांपासून अनुभवायला मिळत होते.

<div class="paragraphs"><p>Windopain Oyster</p></div>
Goa: वेरेग बेट आणि जैवसमृद्धी

कालवे हे जलीय प्राणी आतून, मृदुकाय संघाच्या शिंपाधारी वर्गात त्यांचा समावेश होतो. भारतात कन्याकुमारी ते किलाकराई- तुतिकोरिन समुद्रात, मानारचे आखात, पालक सामुद्रधुनी व पश्चिम किनारपट्टीवरील कच्छ आखातात कालवे आढळतात. भारतात सागर किनाऱ्यापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावरच्या साध्या त्याचप्रमाणे प्रवाळ खडकावर पाण्याने वेढलेल्या ठिकाणी कालवे पहायला मिळतात. जगात इडनच्या आखातात, फिलीपाईन आणि अन्य राष्ट्रातल्या समुद्र किनाऱ्यावरच्या खडकांत कालवे दृष्टीस पडतात.

गोव्याची भूमी मत्स्यसंपदेचा वैविध्यपूर्ण नैसर्गिक वारसा मिरवत असून, पौष्टिक आणि रुचकर अन्नाचा स्रोत म्हणून कालवांचा पूर्वापार वापर इथल्या भूमिपुत्रांना ज्ञात होता, मसालेदार कालवांचा आस्वाद मत्स्याहारी गोमंतकीय समाज आवडीने घेत असून, त्यांची मोहिनी देश विदेशातून इथे येणाऱ्या पर्यटकांनाही पडलेली आहे. साध्या खडकावर तसेच प्रवाळ खडकावर कालवांची पैदासी होत असून गोमंतकीय समाजास त्यांचा खाद्यान्नाचा घटक म्हणून वापर करण्याबरोबर हस्तकला कौशल्यासाठी करण्याची परंपरा रूढ आहे. पोर्तुगीज (Portuguese) अमदानीतल्या बऱ्याच घरांच्या खिडक्यांसाठी जी तावदाने वापरली जायची, त्यांना काचेऐवजी ही कालवे प्रामुख्याने लावली जायची आणि त्यामुळे विंडोपेन ऑयस्टर म्हणून ती नावारूपाला आली.

गोव्यातल्या किनारपट्टीवरच्या गावांत दमट हवामान असल्याने, इथला उन्हाळा असह्यकारक आहे. ग्रीष्मात तर तप्त उन्हाच्या झळा सजीवमात्राना त्रस्त करतात आणि त्यासाठी इथल्या भूमीपुत्रांनी हवामानाला पूरक आणि पर्यावरणस्नेही घरांच्या बांधकामाकडे लक्ष केंद्रित केले. परिसरात उपलब्ध माती आणि जांभा दगड याचा अत्यंत नियोजनबद्ध वापर करून त्यांनी घराचे बांधकाम अशा रितीने केले की त्यात वास्तव्यास असणाऱ्या व्यक्तीला पावसाळी आणि हिवाळी मौसमात ऊबदारपणा लाभेल आणि उन्हाळ्यात आल्हाद प्राप्त होईल.

प्रारंभी खिडक्यांच्या तावदानासाठी आजच्यासारखी सहजपणे काच उपलब्ध होत नसे. त्यावर त्यांनी कालवांच्या पांढऱ्या रंगाच्या आवरणाचा कल्पकतेने उपयोग केला होता. या आवरणातून अगदी अल्प प्रमाणात सूर्यकिरणांची दाहकता जाणवत असल्याने ग्लासाऐवजी त्याचाच पर्याय मान्य केला. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात पोर्तुगीजांनी आपली सत्ता जेव्हा जुन्या काबिजादीतील तिसवाडी, सासष्टी आणि बार्देश या महालांवर प्रस्थापित केली तेव्हा त्यांनी इथल्या हवामानाला साजेल अशा घरांच्या बांधकामांना प्राधान्य दिले. इथे कोसळणाऱ्या मान्सूनच्या पर्जन्यवृष्टीला झेलण्यासाठी उतरते छप्पर आणि हवा, प्रकाश आत यावा म्हणून पोषक अशी दारे आणि खिडक्यांचे नियोजन केले. अशा घरात रहाणाऱ्या व्यक्तीला त्यामुळे इधल्या असह्य उकाड्याला सामोरे जाणे शक्य झाले होते.

कालांतराने आपल्या घराच्या खिडक्यांना तावदाने बसवताना काच सहजपणे उपलब्ध झाल्यावर त्यांनी या कालवांच्या वापरास प्राधान्य दिले होते. त्यामुळे विंडोपेन ऑयस्टर खिडक्यांच्या तावदानाना वापरणे म्हणजे घराच्या सौंदर्यांत वृद्धी करण्याची धारणा निर्माण झाली. आज ही कालवे इंग्रजीत विंडो पेन ऑयस्टर म्हणून परिचित असून, दक्षिण गोव्यातल्या स्थानिक जनतेत त्यांना मँडियो ही संज्ञा रूढ झालेली आहे. 1750 पासून मँडियो कालवे विंडो पेन ऑयस्टर म्हणून विशेष नावारूपास आली. आपल्या रहात्या घराच्या खिडक्यांना या कालवाची तावदाने बसवणे ही परंपरा वाढीस लागली. खिडक्यांना आयताकृतीतले आवरण तावदान म्हणून बसवण्यासाठी आवश्यक हस्तकला कौशल्याची प्रतिभा असणारे मेस्त, च्यारीही प्रसिद्धीस पावले.

<div class="paragraphs"><p>Windopain Oyster</p></div>
विली गोएसांचा 'माय हजबंड्‍स मिस्टरिअस मिस्ट्रेस' इंग्रजी कथांचा संग्रह

गोव्यातल्या समुद्र किनाऱ्यावरच्या खडकांवर कालवांची पैदासी होत असल्याने, खिडक्यांच्या तावदानांत त्यांचा उपयोग होत असून, पोर्तुगीजांनी अशाप्रकारची तावदाने बसवण्याची परंपरा लॅटिन अमेरिकेतही नेली आणि त्यामुळे गोव्यातल्या या कालवांची ब्राझिलमध्ये निर्यात होऊ लागली. आज गोव्याच्या (goa) पश्चिम किनारपट्टीवर समुद्राची जी पातळी आहे, त्याच्यापेक्षा ती बरीच उंचावर होती, त्याचे पुरावे मेडियोच्या जीवाश्माद्वारे राष्ट्रीय सागर विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांना कुठ्ठाळी- सांकवाळ महामार्गासाठी खोदकाम केल्यानंतर दृप्टीस पडले होते.

टेकड्याच्या उतरणीवर 50 ते 70 मीटर उंचीपर्यंत समुद्राचे पाणी खेळत होते आणि तिथल्या मातीत मेडियोचे जीवाश्म दृष्टीस पडले होते. दोन हजार वर्षांपूर्वी समुद्राच्या (sea) पाण्याची पातळी आजच्यापेक्षा उंचीवर होती, याची प्रचिती संशोधनांती शास्त्रज्ञांना आली होती. खिडक्यांच्या तावदानासाठी या कालवांचा वापर होत असल्याने, त्यांची मागणी सातत्याने वाढली होती आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांच्या होणाऱ्या लयलुटीवर काही अंशी निर्बंध यावेत, अशी तरतूद वन्यजीव संरक्षण कायद्याद्वारे करण्यात आलेली आहे. या कायद्याच्या चौथ्या परिशिष्टाद्वारे या कालवांना संरक्षण लाभलेले आहे. वास्को- कुठ्ठाळी सागर किनाऱ्यावरच्या खडकांवर कालवांची एकेकाळी विपुल पैदासी व्हायची.

आज वाढते जलप्रदूषण, केरकचऱ्याचे सागरातील वाढते प्रस्थ, सिमेंट- काँक्रिटची बांधकामे, जहाजांद्वारे इंधन आणि अन्य घटकांचे होणारे उत्सर्जन यांचे दुष्परिणाम कालवांच्या एकूण पैदासीवर झालेले आहे. त्यासाठी चिखली ग्रामपंचायत क्षेत्रातल्या जैवविविधता व्यवस्थापन समितीतर्फे विंडो पेन ऑयस्टरच्या पैदासी क्षेत्राला नैसर्गिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. चिखली परिसरातील वेरेग हे बेट कालवे, तिसऱ्या आदी मृदुकाय संघाच्या शिंपाधारी जलीय जीवांसाठी ख्यात होते. बदलते हवामान, सागराच्या पाण्याची वाढती पातळी, दिवसेंदिवस वाढले जाणारे पाण्यातले प्रदूषणकारी घटक आदींच्या प्रादुर्भावापासून मेडियोचे संवर्धन आणि संरक्षण होणे गरजेचे आहे. - राजेंद्र केरकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com