होळयेच्या देवराईची खरी शान होती महाकाय वृक्ष!

होळयेच्या देवराईची खरी शान होती महाकाय वृक्ष!
History of Holi in Goa

या उत्सवाचा समारोप काही ठिकाणी ग्रामदैवताच्या मुख्य मंदिरासमोर तर काही ठिकाणी उत्सवाच्या प्रारंभी खणलेल्या खड्ड्यात वृक्षांचा खांब आम्रपल्लवांनी सजवून उभा केला जातो. या खांबावरती असलेला नारळ टोकावरती बांधला जातो तसेच त्यावरती छोटेखानी ध्वजही फडकवला जातो. गावातल्या जंगलात अथवा बागायतीत उपलब्ध वृक्षानुसार हा खांब उभा करणे आणि त्याची गंधपुष्प,धुपारतीने पूजा करणे महत्त्वाचे मानले जाते.

त्यानंतर त्याच्याभोवती गवत जाळले जाते. मंदिरासमोर ठराविक काळापुरता आम्रपल्लवांनी अलंकृत आणि उभा असलेला हा खांबच गोवा-कोकणातल्या बऱ्याच गावांत होळी म्हणून ओळखला जातो. पश्‍चिम घाटात वसलेल्या बऱ्याच गावांत होळी सणासाठी जो खांब उभा केला जातो, तो ग्रामस्थ देवराईतून उंच आणि सरळसोट असा वृक्ष कापून ढोल ताशांच्या निनादात मिरवणुकीद्वारे आणतात आणि नाना विविध संकेतांचे काटेकोरपणे पालन करून उभा करतात. अंत्रुज महाल हा माड, पोफळींनी युक्त हिरव्यागार कुळागरांचा असल्याकारणाने, इथल्या गावोगावच्या मंदिरात पोफळीचा खांब होळी म्हणून सजवून उभा केला जातो, तर सत्तरी आणि परिसरातल्या बऱ्याच गावांत तेथील देवराईतला सरळ आणि उंच असलेला वृक्ष होळी म्हणून उभा केला जातो.

चांद्रकालगणनेतला फाल्गुन या शेवटच्या महिन्याला निरोप देऊन चैत्रादी महिन्याच्या नववर्षाचा प्रारंभ करण्यासाठी ऊर्जा लाभावी म्हणून वैविध्यपूर्ण लोककलांचा सुंदर आविष्कार कष्टकरी पुरुष मंडळी घडविण्यासाठी सिद्ध व्हायची. पानगळतीच्या जंगलातले बरेच वृक्ष आपला जुना पर्णसंभार त्यागून नवपल्लवांच्या सौंदर्याचे दर्शन घडवायचे आणि त्यामुळे त्याला शिशिरोत्सव ही संज्ञा रूढ आहे. शिशिराची समाप्ती झाल्यावर पश्‍चिम घाटात ऋतुराज वसंताचे आगमन व्हायचे आणि त्यासाठी निसर्गातल्या विविध वृक्ष वनस्पती आदी घटकांतून उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक रंगगंधांचा आविष्कार रगपंचमीद्वारे कष्टकरी समाज उस्फूर्तरित्या घडवायचा. सत्तरी तालुक्याच्या एका टोकाला असलेला सावर्डे ग्रामपंचायत क्षेत्रातला करंझोळ गाव, गोव्याच्या मध्ययुगीन इतिहासात गजबजलेला होता. मोगल साम्राज्यात समविष्ट होणाऱ्या भीमगड परगण्याकडे जाणारा मार्ग करंझोळ गावातून जायचा.

तसेच गोवा कदंब राजसत्तेखाली राजपुत्र विष्णुचित्ते यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या राजधानी हळशीला जोडणारा जुना केळ घाटातला मार्ग इथूनच जात असल्याने त्याला विशेष महत्त्व लाभले होते. प्राचीन, मध्ययुगीन इतिहासाच्या विविध पैैलुंचे दर्शन घडवणाऱ्या करंझोळ गावात तसेच त्याच्या परिसरातल्या बोंदीर, साटेलीत असणाऱ्या पाषाण मूर्ती आहेत. या साऱ्या संचितांतून इतिहासातल्या गतवैभवाच्या खाणाखुणा प्रतिबिंबित होतात. करंझोळ गावाला इतिहास, पुरातत्व, संस्कृतीचा जसा समृद्ध वारसा लाभलेला आहे तसेच सुंदर नैसर्गिक वैभव व इथल्या देवरायांद्वारे घडते. करंझोळात ज्या देवराया आहेत, त्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेली "होळयेची देवराई' या पंचक्रोशीतली सगळ्यात मोठी सधन अशीच आहे.

दरवर्षी गावातल्या शांतादुर्गेच्या मंदिरासमोर जी उंच होळी म्हणून उभी केली जाते त्याच्यासाठी पिढ्यानपिढ्यापासून होळयेच्या राईतून उंच वृक्ष कापून आणला जातो. देवराईतील वृक्षवेली, पशुपक्षी यांना जरी पूर्णपणे संरक्षण असले तरी शिमग्यात होळीसाठी पुजल्या जाणाऱ्या वृक्षाचा खांब येथील प्रचलित लोक परंपरेनुसार होळयेच्या राईतूनच आणला जातो. करंझोळ गावातले बहुतांश भौगोलिक क्षेत्रफळ जंगलसमृद्ध असून, म्हादई अभयारण्याची अधिसूचना अंमलात येण्यापूर्वी इथल्या. कष्टकरी समाजाने कुमेरी शेतीच्या विस्तारापायी घनदाट जंगलांचा विध्वंस केला जाऊ नये म्हणून देवराईची संकल्पना अमूर्त केली. करंझोळ, कुमठोळ, काजेरेघाट, बाेंदीर इथल्या लोकवस्ती, शेती, बगायतीच्या क्षेत्रापासून पूर्णपणे अलग असलेल्या देवराईचे २७ हेक्टर वनक्षेत्र आहे.

एकेकाळी आकाशाला गवसणी घालण्यास सिद्ध झालेले महाकाय वृक्षही होळयेच्या देवराईची खरी शान होती. वर्षातून नारळी पौर्णिमा, दसरा, शिमगा, गुढी पाडवा वगळता ग्रामस्थ अभावानेच अशा देवरायांत प्रवेश करायचे आणि त्यामुळे वृक्षवेली, पशुपक्षी कृमीकीटक आदी जैविक संपदेच्या घटकांचे लोकश्रध्देद्वारे रक्षण व्हायचे. मद्यपान, धुम्रपान आदींना देवरायांत प्रतिबंध असायचा आणि त्यामुळे त्याचे पावित्र्य जतन केले जायचे. भेरलीमाड, किंदळ, माडत, चांदीवडा, वड, पिंपळ, बांद्रुक, कुंभा, नाणो, जामो, जांभूळ, असण अशा वृक्षसंपदेबरोबर या देवराईत नागीन नावाने ओळखले जाणारे सरळसोट, उंच वृक्ष असून, करंझोळच्या होळीप्रित्यर्थ पुजल्या जाणाऱ्या पवित्र खांबासाठी नागीन वृक्षालाच प्राधान्य दिले जाते. फाल्गुन पौर्णिमेच्या सातव्या दिवशी करंझोळ गावात नागीन वृक्षाच्या होळीच्या सान्निध्यात रात्रीच्या प्रारंभी चोरोत्सव संपन्न होतो. करंझोळच्या लोकजीवनात होळयेच्या राईला आदराचे स्थान असून, इथे जैविक संपदेच्या वैभवाबरोबर ऐतिहासिक संचितांचेही दर्शन घडते.

सत्तरी तालुक्यावर जेव्हा पोर्तुगीजांनी आपली सत्ता प्रस्थापित केली तेव्हा इथल्या कष्टकरी समाजाने राणे,सरदेसाईच्या नेतृत्वाखाली बंडाचे निशाण उभारले आणि पोर्तुगीजांना नामोहरण केले. राणे आणि त्यांच्या साथिदारांनी बंड करण्यापूर्वी करंझोळ येथील होळयेच्या देवराईत येऊन तेथील पवित्र शिळेच्या पूजनाची आणि दर्शनाची परंपरा आत्मीयतेनं पाळलेली होती. या देवराईतल्या पवित्र शिळेचे बंडाचा नेता आणि प्रमुख साथीदार पूजा करून तिला संयुक्तरित्या हात लावून ढकलण्याचा प्रयत्न करायचे. ही शिळा आपल्या जागेवरून हलली तर देवाचा बंडासाठी कौल मिळाला, असे मानले जायचे.

त्यामुळे राणे मंडळींच्या बंडाच्या इतिहासात करंझोळ गावातल्या होळयेच्या देवराईला अनन्य साधारण असे महत्त्व लाभले होते. आज ही पवित्र शिळा देवराईतून कोठे लुप्त झाली याची गावातल्या मंडळीला माहिती नसून इथे ये-जा करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने तेथे वास्तव्यास असणाऱ्या पशुपक्ष्यांसाठी ही देवराई नैसर्गिक अधिवास आहे. शिमग्यासाठी होळीचा पवित्र वृक्ष या देवराईतून दरवर्षी आणला जात असल्याकारणाने ग्रामस्थांचे स्नेहबंध तिच्याशी अतुट राहिलेले आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com