महिला पोलिसांना सन्मान!

विद्या राणे
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

करोनाच्या काळात लोकांनी आम्हाला भरभरून प्रेम दिले. आम्ही जेथे जेथे बंदोबस्ताला होतो तेथे लोक स्वतः चहा नाश्ता जेवण घेऊन येत होते.

करोनाच्या काळात लोकांनी आम्हाला भरभरून प्रेम दिले. आम्ही जेथे जेथे बंदोबस्ताला होतो तेथे लोक स्वतः चहा नाश्ता जेवण घेऊन येत होते. आम्हाला अजून काही हवे नको ही चौकशी करत होते. या काळात लोकांनी आम्हाला खूप आदराने वागवले, जे गेली २४ वर्ष मी कधीच अनुभवले नव्हते. त्यामुळे हा करोना कितीही वाईट असला तरी आम्हाला सन्मान देऊन गेला.

माझी एक मैत्रीण महिला पोलीस आहे. तिने सांगितले की, गेली चोवीस वर्षे मी ही नोकरी करत आहे, खूप वेगवेगळ्या ठिकाणी ड्युटी केली. मग तो व्हीआयपी  लोकांचा  बंदोबस्त असू दे किंवा इफ्फीतील बंदोबस्त असू दे. आम्हाला कधीच आदराने वागवले गेले नाही. लोकांनी कधी आमच्याकडे माणुसकीने पाहिले नाही. पोलीस या नात्याने आमच्याकडे काही भावनाच नाहीत, असे लोकांचे वर्तन आत्तापर्यंत आम्ही अनुभवले. पण या करोनाच्या काळात लोकांनी आम्हाला भरभरून प्रेम दिले. आम्ही जेथे जेथे बंदोबस्ताला होतो तेथे लोक स्वतः चहा नाश्ता जेवण घेऊन येत होते. आम्हाला अजून काही हवे नको ही चौकशी करत होते. या काळात लोकांनी आम्हाला खूप आदराने वागवले, जे गेली २४ वर्ष मी कधीच अनुभवले नव्हते. त्यामुळे हा करोना कितीही वाईट असला तरी आम्हाला सन्मान देऊन गेला असे मला वाटते.

करोनाने सगळीकडे थैमान घातले आहे. मार्च महिन्यापासून लोक हैराण झाले आहेत. लोकांच्या मनात करोनाची भीती वाढत चालली आहे. प्रत्येकजण आपापल्या स्तरावर करोनाच्या लढाईत योगदान देत आहे. या लढाईत डॉक्टर, नर्स यांच्यासोबत पोलिसही रात्रंदिवस काम करत आहेत. प्रामुख्याने मला इथे उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे महिला पोलिसांचा. गेले पाच-सहा महिने या महिला पोलिसांची तारेवरची कसरत चालू आहे. लोकहितासाठी त्या अहोरात्र काम करत आहेत.  लॉकडाउनच्या काळापासून आळीपाळीने तीन शिफ्टमध्ये त्या काम करत आहेत. सात सात तास रोडवर उभे राहून जनजागृतीचे, नाका-बंदी चे काम त्या पार पाडत आहेत. लॉक डाऊनच्या काळात लोकांना कारण नसताना रोडवर फिरू नका, मास्क वापरा तसेच प्रत्येक वाड्यावर जाऊन जनजागृती त्या करत आहेत. या दरम्यान त्यांच्याकडे चांगल्या-वाईट अनुभवाची एक शिदोरी तयार झाली आहे.

काही महिला पोलिसांशी बोलल्यानंतर त्या सांगतात, आम्ही महिला पोलिसांनी जिथे जिथे ड्युटी केली तेथील वयोवृद्ध लोकांना आम्ही खूप मदत केली. घरातील सामान आणून देणे, औषधे आणून देणे यासारखी अनेक कामे आम्ही केली. या दिवसात गरीब लोकांचे खूप हाल झाले. त्यांना जेवढे शक्य आहे, त्या परीने मदत केली. अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे या करोना काळात आम्ही सहकारी एकमेकांची खूप काळजी घेत होतो. या कारणाने आम्हा सर्वांना जवळ आणले असेही म्हणता येईल.

पण या कोरोना काळात आमचे स्वतःच्या घराकडे मात्र खूप दुर्लक्ष झाले. आमच्या घरातील वयोवृद्ध आणि आणि मुलांची खूप आबाळ झाली. आम्हाला त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळत नव्हता. स्वतःच्या घरातच स्वतंत्र राहावे लागत होते. कारण चुकून आपल्याला करोनाची लागण झाली, त्याचा त्रास घरातील इतर कोणाला होऊ नये यासाठी ही काळजी घेणे महत्त्वाचे होते. आम्ही बाहेर सर्वांना खूप मदत करत होतो, पण आमच्याच घरातले सामान भरायला वेळ मिळत नव्हता. तसेच वयोवृद्ध लोकांना डॉक्टरकडे सुद्धा घेऊन जाऊ शकत नव्हतो.

जगात सगळीच माणसे सारखी नसतात. चांगले लोक चांगले अनुभव देऊन जातात. तसेच काही वाईट अनुभवही आले. महिला पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होत्या. सकाळी सात ते एक अशी ड्युटी काही महिला पोलिस करत होत्या. काही ठिकाणी महिला पोलिसांना बाथरूमचीही सोय नव्हती. तसेच या महिला घरातून लवकर बाहेर पडत होत्या, त्यामुळे त्यांच्या नाष्टा, जेवणाचेही खूप हाल झाले. काही काही वेळेला बिस्कीट खाऊन पोट भरावे लागत होते. महिला पोलीस लोकांच्या कल्याणासाठी हितासाठी आपले काम व्यवस्थित पार पाडत होत्या. पण काही ठिकाणी लोक त्यांच्याबरोबर वादावादी करत होते. महिला पोलिसांनी नाकाबंदीचे काम अगदी व्यवस्थित पार पाडले. त्यानंतर जे बाहेरगावचे लोक क्वारंटाईन करून ठेवले होते त्यांच्या देखरेखीसाठी पण या महिला पोलीस काम करत होत्या. लोक जेव्हा रेल्वेने आपापल्या गावी जाऊ लागले त्यावेळी या महिला पोलिसांनी तिथेही आपले काम चोख पार पाडले.अशा या गोवा महिला पोलिसांना माझा ‘सॅल्युट!’

संबंधित बातम्या