Human Evolution: मनुष्य-प्राणी अन् प्राणीच

Human Evolution: प्राचीन काळापासून मनुष्य प्राणी इतर प्राण्यांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेत आला आहे.
Human Evolution
Human EvolutionDainik Gomantak

Human Evolution: प्राचीन काळापासून मनुष्य प्राणी इतर प्राण्यांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेत आला आहे. शेतीचा शोध लागण्यापूर्वी, प्राण्यांची शिकार करून अन्न मिळवणे हे मनुष्य जीवजातीच्या तगून राहण्यासाठी आवश्यकच होते. या मूलभूत गरजेपलीकडे जाऊन माणसाने काही प्राण्यांना माणसाळवले, तर काहींना आपल्या शक्तीचा, बुद्धीचा वापर करून आपल्या कह्यात आणले.

अशा प्राण्यांचा उपयोग अन्न मिळवण्याबरोबरच शेतीची, वाहतुकीची, कष्टाची कामे करून घेण्यासाठी केला गेला. यात काही चुकीचे आहे असा विचारही आरंभी कुणाच्याच मनात आला नाही. मागच्या शतकापासून मात्र प्राण्यांना माणूस देत असलेली वागणूक नैतिकतेच्या दृष्टीने बरोबर आहे की चूक, प्राण्यांना माणसांप्रमाणे काही हक्क असतात की नाही याची चर्चा होत आहे.

पाश्चात्य नीतिमीमांसेत नैतिकतेचा परीघ मुख्यत: मानवी समाजापुरता मर्यादित होता. आज मात्र प्राणीच नव्हे तर सर्व सजीव, तसेच अचेतन निसर्गाचा समावेश होण्याइतका तो विस्तारला आहे. भारतीय परंपरेत अहिंसा या मूल्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. हे मूल्य फक्त माणसालाच नव्हे तर सर्वच सजीवांना लागू होते.

Human Evolution
Goa Liberation Day: असे होते ते दिवस! स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या पिढ्यांना यावर बसणार नाही विश्वास

एकच चैतन्य तत्त्व सर्व सजीवांमध्ये वास करते किंवा सर्व जीव मोक्षाचे अधिकारी आहेत अशा विचारांमुळे भारतीय परंपरेत माणूस आणि इतर सजीव यांच्यामध्ये अगदी मूलभूत फरक आहे अशी कल्पना फारशी आढळत नाही. या उलट प्राचीन ग्रीक काळापासून पाश्चात्य परंपरेत सगळ्या सजीवांची एक उतरंड, एक श्रेणीबद्ध रचना कल्पिलेली आहे.

यात एखाद्या सजीवाचा आपल्यापेक्षा खालच्या पातळीवर असलेल्या सजीवांवर अधिकार असतो असे मानले गेले. या उतरंडीत माणसाचे स्थान अर्थातच सर्वोच्च आहे. त्यामुळे माणसाला प्राण्यांचा स्वत:साठी उपयोगाचा अधिकार आपोआपच मिळतो.

मनुष्य ही ईश्वराची लाडकी निर्मिती आहे. त्याने जीवसृष्टी माणसाच्या उपभोगासाठी निर्माण केली आहे असे सांगणाऱ्या ख्रिश्चन परंपरेने माणसाच्या या अधिकारावर शिक्कामोर्तबच केले. इथे हेही नोंदवणे गरजेचे आहे की वैदिक परंपरेत यज्ञात पशू बळी देण्याची प्रथा होतीच. एक परीने माणूस इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, इतर प्राणी त्याच्या इच्छापूर्तिसाठी वापरणे चुकीचे नाही अशी समजूत त्यामागेही दिसते.

नीति विचार आणि व्यवहारात प्राण्यांना स्थान असावे का, काय स्थान असावे या चर्चेत माणसाचे हे कथित श्रेष्ठत्व हाच कळीचा मुद्दा आहे. या समजुतीला काही आधार आहे का? कुठल्या निकषांच्या आधारे आपण स्वत:ला श्रेष्ठ समजतो? समजा माणूस खरेच श्रेष्ठ असला, तर त्या श्रेष्ठत्वामुळे हक्कांबरोबरच काही जबाबदाऱ्याही त्याच्या वाट्याला येतात की नाही? सगळीच माणसे इतर सजीवांपेक्षा श्रेष्ठ असतात का? असे अनेक प्रश्न या संदर्भात महत्त्वाचे आहेत.

Human Evolution
Blog: प्रगत पाश्‍चात्य देशांची बरोबरी दृष्टिपथात

पाश्चात्य विचारांत माणसाच्या श्रेष्ठत्वाच्या समजुतीला जसा धार्मिक आधार आहे तसाच तात्त्विक आधार द्यायचाही प्रयत्न झालेला आहे. आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक रेने देकार्त यांच्या मते प्राणी म्हणजे जणू आत्मा विहीन यंत्रे. ते सचेतन असले तरी माणसाएवढी प्रगत जाणीव त्यांना नसते. याच धर्तीवर अनेक मुद्दे नंतरही मांडले गेले. प्राण्यांना भाव-भावना, विचार नसतात. प्राण्यांचे वर्तन त्यांच्या मूलभूत प्रेरणांच्या आधारे होते. त्यांना विचार करण्याची क्षमता नसते, भाषिक क्षमता नसतात.

त्यांना दीर्घकालीन स्मृती नसल्यामुळे आपल्या भविष्यकालीन जीवनाबद्दल त्यांच्या काहीच कल्पना, अपेक्षा नसतात. त्यांना नैतिक निर्णय घेता येऊ शकत नाहीत इत्यादी. खरे तर डार्विनप्रणीत उत्क्रांतीच्या सिद्धांताने मनुष्यजात ही काही विशेष दैवी निर्मिती नसून ती सजीवांच्या उत्क्रांतीच्या नैसर्गिक प्रक्रियेत निर्माण झाली आहे हे दाखवून दिले आहे.

वैज्ञानिक पद्धतीने सध्या केला जाणारा सजीवांचा अभ्यास मानवेतर सजीवांच्या स्वरुपावर नवा-नवा प्रकाश टाकतो आहे. यातून माणूस आणि सजीव यांच्यातील पूर्वी माहिती नसलेली साम्यस्थळे समोर येताहेत. प्राण्यांच्या हक्काचा विचार करताना या अभ्यासाला बाजूला सारता येणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com