Music Day: प्रत्येक मानवी शरीरात संगीत दडलेले आहे, ते ओळखा व जगा

Music Day: प्रत्येक मानवी शरीरात संगीत दडलेले आहे, ते ओळखा व जगा
World Music Day

‘संगीत’(Music) ही साधना आहे. संगीतामुळे अनेकांचे आयुष्य बदलून गेले आहे. अनेकांच्या आयुष्यात प्रकाश, आनंद व जगण्याची उमेद निर्माण केली आहे. आज जागतिक संगीतदिन(Music Day). ‘प्रत्येक मानवी शरीरात संगीत दडलेले आहे, ते ओळखा व जगा’, असा संदेश संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी दै. ‘गोमन्तक’शी बोलताना दिला. 

1982 पासून दरवर्षी 21 जून हा जागतिक संगीतदिन म्हणून पाळला जातो. त्याची सुरवात पॅरीस, फ्रान्समधून झाली व आता 120 देशांतील 700 पेक्षा जास्त शहरात हा दिन साजरा केला जातो. यात भारतासह, फ्रान्स, जपान, अमेरिका, चीन रशिया ऑस्ट्रेलिया या व इतर देशांचा समावेश आहे. संगीतामध्ये जगातील सर्वांना आकर्षित करण्याची ताकद आहे, म्हणूनच जागतिक संगीतदिन साजरा करण्याची कल्पना फ्रान्सचे तेव्हाचे संस्कृतीमंत्री जॅक लॅंग यांना सुचली असावी.

‘कोविड’मुळे हा दिवस गतवर्षी अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. यंदाही कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण जगतात नैराश्येचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या दिवशी आयोजित केलेले संगीत कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने साजरे होणार असल्याचे गोव्यातील कलाकारांनी सांगितले.

वेदकाळापासून संगीत...
ज्येष्ठ संगीत शिक्षक रामराव नायक यांनी सांगितले, वेदकाळापासून संगीत सुरू झाले. सामवेदामध्ये संगीत रागांचे वर्णन करण्यात आले आहे. हिंदुस्तानी संगीत लोकसंगीतातून प्रगट झाले असून संगीत मानवाच्या जीवनाकडे निगडीत आहे, असे नायक यांनी सांगितले. हिंदुस्तानी संगीत हे नवरसांचे मिश्रण असल्याचे ते म्हणाले.

सर्वांना एकत्र आणण्याचे साधन
रवीन्द्र भवन मडगावचे अध्यक्ष दामोदर नाईक यांनी सांगितले, संगीत सर्वाना एकत्र आणण्याचे साधन आहे. संगीत हे सर्व सृष्टीमध्येच सामावलेले आहे. उद्या योग दिवसही आहे. आरोग्य व संगीताची सांगड घालून जीवन आनंददायी व आल्हाददायक होण्यास त्याची मदतच होईल, असे नाईक यांनी सांगितले.

माणसाने संगीताचे महत्त्व ओळखले
मडगावच्या गोमंत विद्या निकेतनचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर यांनी सांगितले की, संगीताचा माणसाशी निकटचा संबंध आहे. संगीताचा माणसाकडे अध्यात्मिक संबंध आहे. संगीत हे निसर्गात आहे. माणूस हा निसर्गातील सर्व शक्तीमान असल्याने त्याने या निसर्गातील संगीताचे महत्व ओळखळे. त्यामुळेच बासरी, शंख व इतर वाद्ये तयार झाली.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com