तरल प्रेमाचा अनुराग अनुभवण्यासाठी १९७२ चा हा चित्रपट पाहायलाच हवा

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

नुराग...अर्थात, एका पवित्र-प्रसन्न भावनेने एखाद्या व्यक्तीच्या अधिक जवळ येणे... तिच्यावर भक्ती करणे!

नुराग...अर्थात, एका पवित्र-प्रसन्न भावनेने एखाद्या व्यक्तीच्या अधिक जवळ येणे... तिच्यावर भक्ती करणे! पण या नेमकेपणाने वापरलेल्या शब्दाची भावव्याप्ती जाणून घ्यायची तर दिग्दर्शक शक्ती सामंत यांनी अत्यंत तरलपणे हाताळलेला १९७२ चा ‘अनुराग’ चित्रपट पाहायलाच हवा. राग, द्वेष, इर्ष्या, मत्सर, अहंकार... या असंख्य भावनांच्या पलीकडे जाऊन हा चित्रपट मनुष्य स्वभावातील अनादी अनंत काळापासून त्याच्या हृदयात असणारा प्रेमाचा भाव प्रत्येकाच्या डोळ्यांत प्रतिबिंबीत करतो. कदाचित म्हणूनच आधी कित्येकांनी नाकारलेल्या चित्रपटाचे मर्म ओळखून अभिनेते राजेश खन्ना यांनी शक्ती सामंत यांना हा चित्रपट दिग्दर्शित करण्यास प्रोत्साहन दिले. आणि हा चित्रपट नुसताच बॉक्‍स ऑफिसवर हिट झाला नाही, तर प्रकाश मेहरा यांचा ‘जंजीर’, राज कपूर यांचा ‘बॉबी’ आणि गुलजार यांचा ‘कोशिश’... या चित्रपटांच्या मांदियाळीत त्याला महत्त्वाचे स्थान मिळाले. या चित्रपटाची कथाही शक्ती सामंत यांचीच होती. 

सोनम कपूर सेलिब्रेशन मोडमध्ये -

राजेश (विनोद मेहरा) एक अतिशय श्रीमंत घरातला मुलगा. एक दिवस समुद्रावर फिरायला गेला असताना त्याची भेट शिवानी (मौसमी चॅटर्जी) नावाच्या एका अंध मुलीशी होते. तिचा नाजूकपणा, तिचे सौंदर्य आणि तिचा साधेपणा यामुळे राजेशचा तिच्यावर जीव जडतो. शिवानी एका आश्रमात राहत असते. त्या आश्रमाजवळच राहणारा एक छोटा मुलगा चंदन (मास्टर सत्यजित) याच्याशी तिची मैत्री होते. चंदनची आई (नूतन) शिवानीला दत्तक घेते. चंदनला कर्करोग झालेला आहे. राजेश शिवानीशीची लग्न करणार असल्याचे घरी सांगतो. आई तयार होते, पण त्याचे वडील तयार होत नाहीत. त्यावेळी चंदनचे आजोबा सेठ अमीरचंद (अशोककुमार) शिवानीच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेचा खर्च करायला तयार होतात. शिवानीला दिसायला लागते. त्यानंतर राजेशचे वडील त्यांच्या लग्नाला परवानगी देतात. शिवानीला मिळालेले डोळे हे तिच्या मानस भावाचे, अर्थात चंदनचे असतात. कर्करोगामुळे चंदनचा मृत्यू होतो. इतके दिवस ज्या आपल्या भावाबरोबर ती खेळली, त्याचे शेवटचे दर्शनही ती आपल्या डोळ्यांनी घेऊ शकत नाही. 

एक अत्यंत साधी सरळ कथा. पण, यातील संवाद, अभिनय आणि हृदयस्थ करणाऱ्या प्रसंगांनी अक्षरश: गलबलून जायला होतं. चंदनला कर्करोग होणे, त्याने आपले डोळे शिवानीला देणे, राजेशने शिवानीशी लग्न करण्याचा निश्‍चय करणे... असे प्रसंग काळजाला स्पर्श करून जातात. या भावनिक बाजू ज्या गांभीर्याने आणि संयमाने हाताळल्या गेल्या आहेत, त्याला तोडच नाही. सुपरस्टार राजेश खन्ना यांत गेस्ट अपिअरन्समध्ये असूनही त्यांची उपस्थिती सतत जाणवत राहते. चंदनच्या आईची भूमिका साकारणाऱ्या नूतन यांचा तर प्रश्‍नच नाही. 

महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या मौसमी चॅटर्जी यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट. पण, भूमिकेवर असणारी जबरदस्त पकड त्यांचे पाय भक्कमपणे हिंदी चित्रपटसृष्टीत रोवणारी ठरली. एका अंध शिल्पकाराचे सारे गुण त्यांनी मोठ्या खुबीने रंगविले. 

संगीत दिग्दर्शक एस.डी. बर्मन यांच्या संगीताने चित्रपटातील प्रत्येक प्रसंग अधिक उठावदार केला. ‘सुन री पवन पवन पुरवय्या...’, ‘तेरे नैनो के मैं...’, ‘निंद चुराये चैन चुराये डाका डाले तेरी बन्सी...’, ‘मेरा राजा बेटा...’, ‘राम करे बबुआ...’, ‘वो क्‍या है...’ अशा एकापेक्षा एक सुंदर सुरेल गीतांनी चित्रपटातील प्रत्येक प्रसंगाला उठावदार केले आहे. एका अंध, पण असहायतेला छेद देणाऱ्या एका मुलीचा आयुष्यप्रवासही, जगात जर संवेदनशील माणसे असतील, तर कसा यशस्वी होऊ शकतो, याचे नेमके उदाहरण घालून देणाऱ्या या चित्रपटाने रसिकांचे वैचारिक बंधही अधिक घट्ट केले. 

-अश्विनी टेंबे

संबंधित बातम्या