पाच दिवसांच्‍या गणरायाला ‘निरोप’

पणजी फटाक्‍यांची आतिषबाजी, ‘गणपती बाप्‍पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्‍या वर्षी लवकर या’च्‍या जयघोषात पाच दिवसांच्‍या गणपतींचे राज्‍यभरात विसर्जन करण्‍यात आले. गेल्‍या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने आज उसंत घेतल्‍याने गणेशभक्‍तांच्‍या उत्‍साहाला उधाण आले होते.
 कोरगाव : सार्वजनिक गाणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे येथील तळ्यात विसर्जन करण्यात आले
कोरगाव : सार्वजनिक गाणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे येथील तळ्यात विसर्जन करण्यात आले Dainik Gomantak

आगरवाडात शापोरा

नदीत विसर्जन

मोरजी : आगरवाडा येथील पाच दिवसीय गणपतीचे विसर्जन येथील शापोरा नदीत पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. संपूर्ण गावातील गणपतींना मिरवणुकीने दिंडीच्या तालावर वाजत गाजत, फटाक्‍यांच्‍या आतषबाजीत नदी तीरावरील घुमकार मंदिरात एकत्रित करण्यात आले. त्याठिकाणी सामूहिक आरती झाल्यानंतर सामूहिक गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर येथील युवकांनी होड्या एकत्रित बांधून तयार केलेल्या सांगडवर श्री गणेश मूर्ती ठेवून रात्री उशिरा नदीपात्रात विसर्जित करण्यात आल्या. ‘कोरोना’ चे संकट दूर होऊ दे!

शापोरा नदी तीरावर विसर्जनासाठी आणलेले गणपती
शापोरा नदी तीरावर विसर्जनासाठी आणलेले गणपती Dainik Gomantak

पेडणे: पेडणे तालुक्यातील विविध भागांत पाच दिवसांच्या गणपतींना निरोप देण्यात आला. कोरोना महामारीच्या पाश्वर्भूमीवर संध्याकाळी सहा वाजल्यापासून गणपती विसर्जनासाठी नेले जात होते. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विसर्जनासाठी गणेशभक्तांची गर्दी जाणवत नव्हती, तसेच मिरवणुकाही नव्हत्या. यावेळी पारंपरिक गाऱ्हाण्यासोबत ‘कोरोना महामारीचे उच्चाटन होऊ दे’, अशी विनवणी गणरायाला करण्यात आली. बहुतांश ठिकाणी फटाक्‍यांची आतषबाजी टाळण्यात आली.

विसर्जनासाठी गणेशमूर्ती नेताना भाविक आणि जिवरक्षक
विसर्जनासाठी गणेशमूर्ती नेताना भाविक आणि जिवरक्षक Dainik Gomantak

वास्‍कोत दिंड्या नाहीत

दाबोळी : पाच दिवसांच्या गणपतींचे थाटात विसर्जन करण्यात आले. वास्को येथील वाडे तळ्यात, खारीवाडा, बायणा समुद्रकिनारी संध्याकाळपासून विसर्जनाला सुरुवात झाली. प्रत्येक ठिकाणी जीवरक्षक गणेशमूर्तींचे खोल पाण्यात विर्सजन करीत होते. तसेच वाडे तळ्याच्या मधोमध गणपतीचे विसर्जन करत होते. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. यंदा दिंड्यांना फाटा देण्यात आला होता. दरम्‍यान, येथील जयरामनगर येथील तथास्तू रिव्हीएरा को. ऑपरेटिव्ह सोसायटीच्‍या गणेशमूर्तीचे वाडे येथील तळ्यात विसर्जन करण्यात आले. यावेळी सोसायटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोना महामारीमुळे यंदाही साधेपणाने गणेशोत्सव साजरा केल्याचे माजी नगराध्यक्ष तथा सोसायटीचे सदस्य शेखर खडपकर यांनी सांगितले.

मये येथे गणेश विसर्जन करतांना युवक
मये येथे गणेश विसर्जन करतांना युवक Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com