Goa Election: सांताक्रुझ मतदारसंघात भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत शक्य

वीज, पाणी समस्‍येचा गुंता सुटता सुटेना; विकासकामांपासूनही उपेक्षित..!
Goa Election: भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत शक्य
Goa Election: भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत शक्यDainik Gomantak

पणजी: सांताक्रुझ मतदारसंघात भाजपसह काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. आम आदमी पक्षाचेही काम सुरू आहे. मात्र दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी झाल्याने तेथील बंडाळी कोण रोखणार यावरूनच या मतदारसंघाचा आमदार ठरणार आहे. सांताक्रुझ मतदारसंघ राजधानी पणजीच्या जवळ असूनही अनेक वर्षांपासून विकासकामांपासून उपेक्षित राहिलेला मतदारसंघ.

या मतदारसंघातील वीज व पाण्याची समस्या एकाही आमदाराला सोडविता आलेली नाही. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी भाजपचे अनेक नेते निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये प्रवेश केलेले विद्यमान आमदार टोनी फर्नांडिस तसेच बहुजन समाजाचे भाजप नेते अनिल होबळे यांच्यात उमेदवारी मिळवण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. त्यातच भाजप नेते हेमंत गोलतकर व चिंबलचे विद्यमान जिल्हा पंचायत अध्यक्ष गिरीश उस्कैकर हेही या शर्यतीत आहेत. उस्कैकर यांना जिल्हा पंचायतीवर आपण निवडून आणल्याचा दावा अनिल होबळे करीत आहेत. त्यामुळे उस्कैकर कोणाला पाठिंबा देतात हे येणारा काळ ठरवणार आहे. या मतदारसंघात अजून एकाही पक्षाने आपल्या उमेदवारावर शिक्कामोर्तब केलेले नाही. भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळेल हे अजून निश्चित झालेले नाही. आमदार टोनी फर्नांडिस व अनिल होबळे हे दावेदार आहेत.

Dainik Gomantak

उमेदवारीच्‍या स्‍पर्धेत अनेकजण

सांताक्रुझ मतदारसंघात यावेळी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये उमेदवारी मिळवण्यावरून चुरस दिसून येत आहे. काँग्रेसचे माजी आमदार व्हिक्टर गोन्साल्विस यांनी मतदारसंघात आपले बॅनर लावून प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे ते निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे स्थानिक नेते रुडॉल्फ फर्नांडिस हे सुद्धा या उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेत आहेत. मगो पक्षातर्फे अजून या मतदारसंघात कोणी नेता पुढे आलेला नाही. गेल्या 2017 निवडणुकीत मगोतर्फे प्रकाश नाईक यांनी निवडणूक लढविली होती. त्यांचे निधन झाल्यानंतर त्या जागी अजून नवा उमेदवार मगोला सापडलेला नाही. यावेळी सांताक्रुझ मतदारसंघातून मतदार कोणाला निवडतील हे सध्याच्या वातावरणावरून सांगणे कठीणच आहे.

मतदारसंघाचा इतिहास

सांताक्रुझ मतदारसंघात व्हिक्टोरिया फर्नांडिस (मामी) या सक्रिय झाल्या व त्यांनी 1994 साली अपक्ष म्हणून निवडणूक लढवून जिंकूनही आल्या. तीनवेळा त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आल्या. दोनवेळा सतत निवडून येण्याचा विक्रम जॅक सिक्वेरा यांच्या नावावर होता तो व्हिक्टोरिया फर्नांडिस यांनी सलग चारवेळा ( 1994 - 2007 ) निवडून येत मोडला आणि या मतदारसंघावर आपले वर्चस्व स्थापित केले होते. मात्र, 2012 मध्ये बाबूश मोन्सेरात यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळवली. व्हिक्टोरिया फर्नांडिस यांनी आपले पुत्र रुडॉल्फ यांना निवडणुकीत अपक्ष म्‍हणून उतरवले. अटीतटीच्या या निवडणुकीत मोन्सेरात यांनी बाजी मारली.

Goa Election: भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत शक्य
Goa Election: ‘तृणमूल’च्या ‘एन्‍ट्री’ ने गणित बदलणार

‘आप’चाही शिरकाव

गेल्या 2017 च्या निवडणुकीत भाजप-काँग्रेस-अपक्ष रुडॉल्फ फर्नांडिस अशी तिरंगी लढत झाली होती. भाजप व मगोने तेव्हा युती केली नाही त्याचा लाभ काँग्रेसला झाला होता. आंतोनिओ ऊर्फ टोनी फर्नांडिस (6202) हे भाजपचे हेमंत गोलतकर (5560) यांच्यापेक्षा 642 मतांनी विजयी झाले होते. त्यापाठोपाठ अपक्ष उमेदवार रुडॉल्फ फर्नांडिस यांना 5262 मते मिळाली होती. या मतदारसंघात आम आदमी पक्षाने शिरकाव केला आहे. मात्र तेवढा जोर सध्या तरी दिसून येत नाही.आता पुन्हा मोन्सेरात या मतदारसंघात काय पवित्रा घेणार? डावपेचात ते यशस्वी होतात का याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला

सांताक्रुझमध्ये आजपर्यंत भाजपचा उमेदवार निवडून आलेला नाही. हा मतदारसंघ काँग्रेसचा गणला जातो. विद्यमान आमदार टोनी फर्नांडिस यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून त्यांना मतदान केलेले बरेच मतदार दुखावलेले आहेत. मागच्यावेळी व्हिक्टोरिया फर्नांडिस यांचे पुत्र रुडॉल्फ फर्नांडिस यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही. बाबूश मोन्सेरात यांनी पणजीतून काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत त्यांचे समर्थक सांताक्रुझमध्ये टोनी फर्नांडिस यांना उमेदवारी मिळवून दिली होती. ते भाजपमध्ये गेल्याने रुडॉल्फ फर्नांडिस यांची काँग्रेस उमेदवारीची वाट मोकळी झाली आहे. मात्र, त्यांना अडथळा आहे तो काँग्रेसचे माजी आमदार व्हिक्टर गोन्साल्विस यांचा, हे लवकरच समजेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com