
पुरूमेंत फेस्तमध्ये सहभागी झालेल्या महिला या कुठल्याही जत्रेत, बाजारात स्टॉल लावणाऱ्या नव्हत्या. शेतात राबणाऱ्या, रोजची चूल पेटती राहील एवढ्या पुरतं कमवणाऱ्या; पण वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला आवडते अशा सगळ्याजणी होत्या. पणजीतील कांपाल बागेत आम्ही फेस्त आयोजित केले होते. इतके दिवस मी ‘महिलांची लाडकी - महिलांची आवडती'' असे या पुरूमेंत फेस्तचे वर्णन करायचे; पण महिलांसारखी या फेस्तवर जीव ओवाळून टाकणारी पुरुष मंडळी देखील बघायला मिळाली.
मिरची, चिंच, सुकी मासळी यांना पारखून, त्यांचा भाव विचारणारी, चार - पाच स्टॉल फिरून त्या भावाची खात्री करून घेणाऱ्या या पुरुष मंडळींनी इथं येऊन आपल्या आठवणींना उजाळा दिला. यामध्ये गोव्यातील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, चित्रपट दिग्दर्शक, कलेक्टर, नगरसेवक, उद्योजक अशी मान्यवर मंडळी देखील होती.
आपली आई कशी पुरूमेंत तयारी करायची याबद्दल भरभरून बोलताना ते दिसले. खारे नुस्ते (सुकी मासळी), डांगर (एकप्रकारचे पापड) पासून ते तोंडाला पाणी आणणाऱ्या अनेक पदार्थांची आठवण काढत ते पुरूमेंत फेस्तमध्ये रमलेले होते.
खोतीगावच्या सेंद्रिय गूळ आणि मिरचीची विक्रमी विक्री
दोन दिवस चाललेल्या पुरूमेंत फेस्तच्या पहिल्या अर्ध्या दिवसात अनेक गोष्टी संपल्या. काणकोण - खोतीगावच्या तनिष्का गटातील महिलांनी आणलेली काणकोणची प्रसिद्ध सुकी लाल मिरची फेस्त सुरू होता काही तासात संपली. या मिरचीला खूप मागणी असते. फिशकरीच्या वाटणात काणकोणची मिरची वापरली जाते. तिखट नसते, पण यामुळे हुमणाला एक छान चव येते.
बाहेर बाजारात १२०० ते १००० रुपये किलो असणारी काणकोणची मिरची तनिष्का पुरूमेंत फेस्तमध्ये ८००/- रुपये किलो मिळत असल्याने ती हातोहात विकली गेली. दक्षिण गोव्यात काणकोणच्या मिरचीचे वर्चस्व असते; तर उत्तर गोव्यात हरमल (पेडणे)च्या मिरचीला मागणी असते. उत्तरेतले लोक तुलनेनं जरा तिखट हुमण खातात. हरमलची मिरची तिखट असते.
हरमलच्या तनिष्का गटाच्या स्टॉलवर हीच मिरची मुख्य आकर्षण होती. या महिलांनी जितकी मिरची आणली सगळीच्या सगळी विकली गेली. वर्षभर रोजच्या हुमणासाठी, तोणाकमध्ये वापरण्यात येणाऱ्या गरम मसाल्यात आणि सांबर मसाला तयार करण्यासाठी महिलांनी आपापल्या पसंतीची मिरची विकत घेतली.
याशिवाय खोतीगावच्या महिलांनी सेंद्रिय पद्धतीने बनवलेला गूळ आणला होता. कोणतेही रासायनिक पदार्थ न वापरता बनवलेला १२८ किलो गूळ, ३५ लिटर काकवी विकली गेली; तर ७३ किलो मिरची (हरमल आणि काणकोण) विकली गेली. पहिल्याच वर्षी मिळालेला भरघोस प्रतिसाद बघून महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.