स्तनाच्या कर्करोगातील रूग्णांमध्ये आठ टक्क्यांनी वाढ

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

राज्यात दरवर्षी  6 ते 8 टक्के स्तन कर्करोग रूग्णांची नव्याने नोंद होत आहे. 30 ते 50 वयोगटाच्या महिलांमध्ये स्तन कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक असल्याची माहिती कर्करोगतज्ञ डॉ. शेखर साळकर यांनी दिली.  

स्तन कर्करोग हा आजार आता झपाट्याने  देशासह राज्यातही पसरत चालला आहे. राज्यात दरवर्षी नोंद होणाऱ्या कर्करोग रूग्णांच्या संख्येची नुकतीत पडताळणी करण्यात आली. यात राज्यात दरवर्षी  6 ते 8 टक्के स्तन कर्करोग रूग्णांची नव्याने नोंद होत आहे. 30 ते 50 वयोगटाच्या महिलांमध्ये स्तन कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक असल्याची माहिती कर्करोगतज्ञ डॉ. शेखर साळकर यांनी दिली.  

स्तन कर्करोग होण्याची कारणे आहेत. बदललेली जीवनशैली हा प्रमुख घटक सर्व प्रकारच्या कर्करोगाच्या वाढीसाठी कारणीभूत असल्याचे दिसून येते. स्तन कर्करोगाचे जितके लवक निदान होईल तितके उपचार चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. स्वनिदान हा या कर्करोगाचे निदान करण्यास मदत करू शकते. स्त्रियांना त्यांचे स्तन सामान्यत: कसे दिसतात आणि जाणवतात, ते योग्य रित्या माहिती असायला हवे. स्तनातील कोणताही बदल प्रत्येक स्त्री अचूक हेरू शकते. डॉक्टरांचा सल्ला घेतला, तर वेळीच निदान करता येऊ शकते. लवकर निदान झाल्यास स्तन वाचवणे शक्य़ होत असल्याचे डॉ. साळकर म्हणाले. 

काय असतात शक्यता? 

राज्यात दरवर्षी 1300 ते 1500 लोकांना कर्करोग होतो. यातील 250 ते 300 रूग्ण स्तन कर्करोगाचे असतात. स्तन कर्करोग जर पहिल्या टप्यातील असेल तर बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के आहे, दुसऱ्या टप्प्यातील असेल तर रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्के आहे. तिसऱ्या टप्प्यात गेलेल्या रूग्णांना मात्र थोडा धोका असून यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 50 टक्केच आहे. यातील अधिक प्रतिकूल स्थिती ओढवते ती चौथ्या टप्प्यात. यात रूग्ण बरे होण्याचे  प्रमाण 10 टक्केच आहे.    

संबंधित बातम्या