तरुणाईच्या स्वप्नामधून एक अतुल्य भारत जन्मास येणार पण.......!

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

तरुण पिढीला देशाचा भक्कम पाया मानलं जातं आणि यावरच आपला भावी देश उभा राहणार असतो. याच तरुणाईच्या स्वप्नामधून एक अतुल्य भारत जन्मास येणार असतो आणि हीच अशी तरुणाई कळत किंवा नकळतपणे मानसिक ताण तसेच चिंतेला सामोरी जात असते.

तरुण पिढीला देशाचा भक्कम पाया मानलं जातं आणि यावरच आपला भावी देश उभा राहणार असतो. याच तरुणाईच्या स्वप्नामधून एक अतुल्य भारत जन्मास येणार असतो आणि हीच अशी तरुणाई कळत किंवा नकळतपणे मानसिक ताण तसेच चिंतेला सामोरी जात असते. आजकालच्या जगाला आपण स्पर्धात्मक जग म्हणू शकतो, ज्यात जो सर्वात आधी बाजी मारेल त्याचं राज्य आणि जो मागे राहिला त्याच्यासाठी संपूर्ण खेळच संपल्याप्रमाणे आहे. अशा या स्पर्धात्मक जगात स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी सतत घ्यावे लागणारे परिश्रम हे एका दृष्टीने आजच्या तरुण पिढीसाठी ताण निर्माण करणारे किंवा चिंता उत्पन्न करणारे घटक ठरू शकतात. तरुणाई हा असा एक टप्पा आहे, ज्यामध्ये माणूस स्वतःला घडवत असतो, स्वतःला नव्याने शोधत असतो, आपल्यामधील गुणांची त्याला नव्याने ओळख होत असते, यामध्ये कधी त्याला इतर कोणाच्या साथीची गरज भासणे किंवा समोरच्या व्यक्तीविषयी आकर्षण वाटणे ही त्या वयातील युवक - युवतींसाठी एक साधारण गोष्ट आहे. अशात संबंधांमध्ये निर्माण होणारे वाद किंवा तंटे हे माणसाच्या मनात ताण निर्माण करण्याचे काम करत असतात. या वयात झालेला ‘ब्रेकप’ पचवू न शकल्यामुळे आत्महत्या किंवा इतर प्रकार सातत्याने घडत असतात. 

या काळात आपल्या परिवारापेक्षा आपल्याला आपला मित्र परिवार हा जास्त जवळचा वाटू लागतो, त्यांच्याशी संवाद साधणे हे आपल्याला सोयीचं वाटतं, त्यांच्याशी आपण अनेकदा आपल्या वैयक्तिक गोष्टींविषयी चर्चा करत असतो. अशा परिस्थितीत आपल्या आजूबाजूला असे एखादे मित्र मंडळ नसणे किंवा आपल्याला एका गटात सामील करून न घेणे देखील एखाद्या तरुणाच्या मनाला आघात पोहोचवू शकते. ‘पेटीतील एक कुजका आंबा बाकी सर्व आंब्यांना कुजवण्याचे काम करतो’ असं म्हणतात. त्यामुळे या वयात आपण कोणता गट निवडतो किंवा कोणता मित्र परिवार बनवतो यावर आपले भविष्य अवलंबून असते. आपल्या आजूबाजूला वावरणारा गट ज्याला आपण ‘पियर ग्रुप’ असे म्हणतो, त्याच्याशी जुळवून घेताना अनेक बदल तरुण मन आपल्यात आणण्याचा प्रयत्न करत असते, ज्यामध्ये कधीतरी दारू किंवा अमलीपदार्थांचे सेवन, महागड्या वस्तूंची खरेदी, वर्ग चुकवून केलेली मजा मस्ती अशा अनेक लहान-मोठ्या गोष्टी सामील असतात. आपल्या ‘पियर ग्रुप’शी  समानता निर्माण व्हावी या हेतूने सततची धडपड सुरू असते. त्यामुळे आपला बनवलेला ‘पियर ग्रुप’ देखील कधी तरी आपल्यासाठी ताण तणाव व चिंतेचा विषय ठरू शकतो.

या तरुण वयात एकंदरीतच आपल्या समाज आपल्याला कुठल्या दृष्टीने बघतोय किंवा समाजाच्या दृष्टीने आपण नेमके कुठे उभे आहोत, ही गोष्ट फार महत्त्वाची असते. आपल्या समाजामध्ये एखाद्या गोष्टीवरून किंवा एका चुकीवरून माणसाला नाव ठेवण्याची फार वाईट अशी सवय आहे आणि आपण उचललेलं एखादं पाऊल आपल्याला अशाच एका नावांना (लेबलिंग) बळी पडणार नाही या विचाराने देखील अनेक तरुणांच्या मनावर ताण येण्याची शक्यता असते. या सर्व घटकांबरोबर घरातील परिस्थिती घरातील माणसांची एकमेकांबरोबर असलेली वागणूक, उदाहरण द्यायचं झालं, तर एखाद्या घरात सतत दारू पिऊन आलेले वडील, आई-वडिलांमध्ये सतत निर्माण होणारे मतभेद, घरच्या मंडळींचे परस्परांशी असलेले वाद अशा अनेक गोष्टी तरुण मनावर ताण आणण्याचे काम करीत असतात.
आत्महत्या हा आज कालच्या जगात वाढत चाललेला एक गंभीर प्रकार आहे आणि आत्महत्येच्या मागे दिले जाणारे एकमेव कारण म्हणजे डिप्रेशन (नैराश्य) होय. आता डिप्रेशन म्हणजे नेमकं काय आहे हेच आपल्याला ठाऊक नसल्याने, एखाद्या छोट्याशा दुःखाला सामोरे न जाऊ शकल्याने किंवा एखाद्या क्षुल्लक गोष्टीला डिप्रेशन असे नाव देऊन आत्महत्येचे प्रकार घडत असतात. नैराश्य हा एक मानसिक आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीला नेहमी उदास व निराश वाटते व दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील आनंद कमी होतो. सर्वसाधारणपणे दोन आठवडयांपेक्षा जास्त दिवस त्रास झाल्यास त्यास आजार संबोधले जाते. त्याचा नात्यावर कुटुंबावरही तसेच दररोजच्या कामावर सुध्दा परिणाम होतो आणि सर्वात मोठा परिणाम म्हणजे आत्महत्या. त्यामुळे एखाद्या सर्वसामान्य घटनेमुळे मनावर आलेला ताणाला किंवा दुःखाला डिप्रेशनचे नाव देऊन, चुकीचे पाऊल उचलणे बरोबर नाही. या उलट आपण काय करू शकतो, तर आपल्या मित्र परिवाराशी आपल्या अडचणींविषयी चर्चा करणे, त्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणे, आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांशी संवाद कायम ठेवणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही परिस्थितीत समोर खचून न जाता ताठ मानेने सकारात्मक दृष्टी ठेवून पाऊल उचलणे हा मार्ग आहे. कठीण काळ हा नदीतील गढूळ पाण्याप्रमाणे आहे. तो काही वेळाने आपोआप नाहीसा होतोच. नदीला तिचे पूर्वरूप प्राप्त होणारच आहे. एखादा प्रसंग आपल्यावर का ओढवला? आपण त्या कठीण प्रसंगातून काय शिकलो? असे प्रश्न स्वतःला विचारून, आत्मपरीक्षण करणे आणि पुन्हा आपल्या हातून अशी चूक न घडण्याची खूणगाठ बांधणे महत्त्वाचे. आयुष्यात माणूस अनेक चांगल्या वाईट प्रसंगाला सामोरा जात असतो, एखादा चांगला प्रसंग हा आनंददायी असतो, तर वाईट प्रसंग हा काहीतरी नक्की शिकवून जातो. 

आमच्या वेबसाईटवरच्या अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारताला लाभलेला आशीर्वाद म्हणजे योग साधना होय! भारतीय मानसशास्त्रात तसेच आयुर्वेदात योगाभ्यासाला एक महत्वाचे स्थान आहे. आपल्या दैनंदिन जीवनात योगाभ्यास तसेच ध्यानधारणा यांचा उपयोग करून आपण आपल्या चंचल मनावर ताबा मिळवू शकतो. स्वपरीक्षणासाठी योगाभ्यासाइतका चांगला उपाय नाही. ध्यानधारणेमुळे मन शांत होऊन सकारात्मक विचार करण्याची क्षमता निर्माण होते. मन तसेच बाकी इंद्रियांवर आपण ताबा मिळवू शकतो, एखाद्या बिंदूवर किंवा विषयावर एकाग्रता साधण्याची कला प्राप्त होते.
शेवटी ज्याने आपल्या मनावर ताबा मिळवला तोच खरा विजयी वीर नाही का?
वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः म्हणजेच ज्याचा इंद्रियांवर ताबा असतो, तो स्थितप्रज्ञ असतो. - भगवद्गीता.
-अक्षता छत्रे

संबंधित बातम्या