आज राष्ट्रीय गणित दिवस आहे. महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीच्या निमित्ताने भारतात हा दिवस साजरा कऱण्यात येतो. अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात रामानुजन यांनी ४ हजारांहून अधिक प्रमेयांवर संशोधन केले. त्यांचे हे संशोधन समजण्यास जगभरातील गणिततज्ञांना अनेक वर्षे लागली. रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७मध्ये तामिळनाडूत झाला होता. त्यांना गणिताव्यतिरिक्त दुसऱ्या विषयांमध्ये रस नव्हता. ते ११वीत गणित सोडता सर्वच विषयांमध्ये नापास झाले होते. यानंतर १२वीतही त्यांना नापास व्हावे लागले होते. ज्या शाळेत ते नापास झाले होते. आज त्याच शाळेला रामानुजन यांचे नाव देण्यात आले आहे.
वयाच्या १६ वर्षीच लग्न झाल्यावरही त्यांनी संसारात लक्ष न घालता गणिताचा अभ्यास सुरूच ठेवत आपले काही सुत्र केंब्रीज विद्यापीठाचे प्रोफेसर जीएच हार्डी यांना पाठवले. हार्डी यांनी त्यांच्या सुत्रांचे महत्व लक्षात घेता रामानुजन यांना लंडनमध्येच बोलवून घेतले. ते रामानुजन यांचे मार्गदर्शक बनले. या दोघांनी मिळून गणिताचे कित्येक शोधनिबंध प्रसिद्ध केले. त्यांच्या या संशोधनाचे इंग्रजांकडूनही अत्यंत कौतूक करण्यात आले. त्यांना इंग्लंडमधील रॉयल सोसायटीमध्ये जागा मिळाली. याबरोबरच ते ट्रि्निटी महाविजद्यालयाची फेलोशिप मिळवणारे पहिले भारतीयही ठरले.
त्यांनी गणित विश्वाला लंडनमध्ये राहून खूप काही दिले. मात्र, याच लंडनचे वातावरण त्यांना मानवले नाही. त्यांना लंडनमध्ये असतानाच क्षयाची लागण झाली. आणि १९२०मध्ये त्यांचे निधनही झाले. जगाला आपल्या गणिताने अधिक उज्वल करणाऱ्या रामानुजन यांच्या पदरी मात्र समाजाचा तिरस्कार आला. समुद्री यात्रेहून परतल्यानंतर त्यांनी प्रायश्चित्त म्हणून रामेश्वरमची यात्रा केली नाही म्हणून त्यांच्या मृत्यूनंतर पंडितांनी त्यांच्या मृतदेहाला मुखाग्नि देण्यास नकार दिला. २०१५मध्ये रामानुजन यांच्या जीवनावर 'द मॅन हू न्यू इन्फिनिटी' हा सिनेमादेखील चित्रीत कऱण्यात आला आहे. या सिनेमामध्ये देव पटेल याने त्यांचे पात्र केले होते. हा सिनेमा रॉबर्ट कॅनिगल यांच्या 'द मॅन हू न्यू इन्फिनिटी: अ लाइफ ऑफ द जीनियस रामानुजन' या पुस्तकावर आधारित आहे.
गणितात १७२९ही एक खास संख्या मानण्यात येते. या संख्येच्या संशोधनाचे श्रेय महान गणितज्ञ रामानुजन यांना जाते. याच संख्येला रामानुजन संख्या किंवा हार्डी रामानुजन संख्या असेही म्हणतात.
गणितात १७२९ही एक खास संख्या मानण्यात येते. या संख्येच्या संशोधनाचे श्रेय महान गणितज्ञ रामानुजन यांना जाते. याच संख्येला रामानुजन संख्या किंवा हार्डी रामानुजन संख्या असेही म्हणतात. असे का म्हणतात त्यामागे एक छोटीशी गोष्ट आहे. रामानुजन इंग्लंडमध्ये असताना आजारी पडले होते. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या दरम्यान त्यांना भेटण्यासाठी त्यांचे मित्र जी. एच. हार्डी हॉस्पिटलमध्ये पोहचले. हार्डी केंब्रिज विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते. ते एका टॅक्सीने आपल्या मित्राला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहचले. रामानुजन यांना हार्डी हे टॅक्सीने आल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी हार्डी यांना तात्काळ त्यांच्या टॅक्सीचा नंबर विचारला. हार्डी यांनी १७२९ असे उत्तर देताना सांगितले की ही अत्यंत कंटाळवाणी संख्या आहे. त्यावर रामानुजन यांनी उत्तर देताना ही संख्या कंटाळवाणी नसून अतिशय रोचक असल्याचे सांगितले. ही अशी संख्या आहे जिला वेगवेगळ्या पद्धतीने दोन घनांच्या योग्य रुपात लिहिले जावू शकते. त्या दिवसापासूनच १७२९ या संख्येला या दोन महान गणितज्ञ द्वयींच्या सन्मानार्थ हार्डी-रामानुजन नंबर असेच ओळखले जाते. हा एक टॅक्सीचा नंबर असल्याने याला टॅक्सीकॅब नंबरही म्हटले जाते.
चला थोडं यामागील गणित लक्षात घेऊ-
जर तुम्हाला आकडेमोड व गणित विषयात आवड असेल तर तुम्हाला 1729 ही संख्या स्तब्ध करुन सोडेल. 1729 ही खुप प्रसिद्ध संख्या आहे कारण ही संख्या वेगवेगळ्या गणिती पद्धतीने आपल्याला मिळवता येऊ शकते. 1729 ही संख्या अनेक इतर पद्धतीने मांडता येते.
उदा:
Power 2:
1729= 6^2 + 18^2 + 37^2
=8^2 + 12^2 + 39^2
=8^2 + 24^2 + 33^2
=10^2 + 27^2 + 30^2
=12^2 + 17^2 + 36^2
=18^2 + 26^2 + 27^2
Power 3:
1729= 1^3 + 12^3
=9^3 + 10^3
=1^3 + 6^3 + 8^3 + 10^3
=1^3 + 3^3 + 4^3 + 5^3+ 8^3 + 10^3
1729 ही सर्वात छोटी संख्या आहे जी दोन वेगवेगळ्या पद्धतीने दोन वेगळ्या संख्यांच्या घनाची(cube) बेरीज करुन मिळते. अजून अश्या बऱ्याच इतर गणिती पद्धती आहेत ज्यात 1729 ही संख्या मिळवता येते. म्हणूनच रामानुजन म्हटले होते की ही संख्या सामान्य किंवा कंटाळवाणी नाही.