खड्डे बुजवा, जीव वाचवा...

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

चोर्ला घाट किती धोकादायक आहे, हे सांगण्यासाठी शब्दच तोकडे पडतील इतकी दयनीय स्थिती या घाटमार्गाची झाली आहे. रस्त्यावर पावलोपावली खड्डे आणि खड्डेच..! या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना छातीवर दगड ठेवूनच मार्गक्रमण करावे लागते. अनमोड घाटमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाल्यापासून चोर्ला घाटमार्गावरील वाहतुकीचा ताण वाढला.

चोर्ला घाट किती धोकादायक आहे, हे सांगण्यासाठी शब्दच तोकडे पडतील इतकी दयनीय स्थिती या घाटमार्गाची झाली आहे. रस्त्यावर पावलोपावली खड्डे आणि खड्डेच..! या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना छातीवर दगड ठेवूनच मार्गक्रमण करावे लागते. अनमोड घाटमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाल्यापासून चोर्ला घाटमार्गावरील वाहतुकीचा ताण वाढला. त्यातच अवजड वाहनांचीही वाहतूक सुरू झाल्याने हा घाटमार्ग पूर्णपणे खड्ड्यात गेला. गेल्या दोन वर्षांपासून हा रस्ता वाहतुकीस जीवघेणा ठरला आहे. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी म्हणून वाहनचालकांसह अनेकजण आरोळी ठोकत आहेत, पण सरकारला जाग येईल तर शपथ..!

टाळेबंदीनंतर राज्याच्या सीमा खुल्या केल्यापासून परराज्यातून राज्यात येणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. टाळेबंदीच्या काळात या घाटमार्गावरून लोकांचे येणे - जाणे नव्हते. त्यावेळी आता लॉकडाऊनचा काळ संपल्यानंतर तरी या मार्गावरील खड्डे बुजवून हॉटमिक्स डांबरीकरण होईल अशी वाहनचालकांची अपेक्षा होती, पण लोकांची ही अपेक्षा सरकारने फोल ठरविली आहे. भाजप सरकारच्या कारकिर्दीत चोर्ला घाटमार्गाची अशी दैना होईल, त्याकडे दुर्लक्ष केले जाईल असे भोळ्या भाबड्या जनतेला कधीच वाटले नव्हते, परंतु त्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले हे सत्यच आहे. वाहतुकीचे ओझे वाहून वाहून चिंधड्या चिंधड्या झालेला मरणासन्न स्थितीतील हा रस्ता सरकारकडे जगण्यासाठी पाण्याची, मलमपट्टीची भीक मागतो आहे. सरकार आपल्याकडे कधी लक्ष देणार आणि आपल्याला कधी ठणठणीत बरे करणार यासाठी हा घाटमार्ग आर्त हाक मारतो आहे..!

या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी नागरिकांनी अनेक मागण्या, विनंत्या, निवेदने दिली, पण सरकारने या रस्त्याच्या दुरुस्तीकामाकडे आजपावेतो केवळ दुर्लक्षच केले आहे. हा घाटमार्ग येत्या पंधरा दिवसात दुरुस्त करावा, अशा मागणीची निवेदने देण्याबरोबरच नागरिकांकडून कडक इशारेही दिले गेले, पण त्या इशाऱ्यांना आणि निवेदनांना सरकारने केराची टोपलीच दाखवली. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर आज असते, तर या घाटमार्गाची अशी स्थिती झाली नसती. रस्ते, पाणी, वीज, पूल आदी मुलभूत गरजा नागरिकांना पुरविण्याकडे त्यांचा कटाक्ष होता. त्यांच्याच नेतृत्वाखाली राज्यात पाळेमुळे रोवलेल्या आणि सत्तास्थानी विराजमान झालेल्या भाजप सरकारकडून ही अपेक्षा नाही. हा रस्ता सुस्थितीत असावा यासाठी माजी मुख्यमंत्री तथा आमदार प्रतापसिंह राणे वेळोवेळी सरकारला कानपिचक्या देतात. अनेकदा त्यांच्या शब्दाला मान देऊन या रस्त्याची दुरुस्तीही झालेली आहे. मग आताच सरकारचे दुर्लक्ष का?

बेळगावहून चोर्ला घाटमार्गे राज्यात येणाऱ्या या रस्त्यावरून अनेक पर्यटकांची दररोज रिघ लागलेली असते, परंतु कर्नाटकची हद्द संपल्यानंतर गोवा राज्यात प्रवेश करताच पर्यटकांच्या वाहनांचे चाक पडते ते भल्या मोठ्या खड्ड्यात..! आणि मग सुरू होतो खड्ड्यातून जीव वाचवत गोव्यात येण्याचा प्रवास. गोव्याहून चोर्लाघाटातून बेळगावकडे जाणारा रस्ता अतिशय सुंदर आहे. वाहनचालकांना मोहवून टाकील इतका तो सुंदर रस्ता आहेच, शिवाय या रस्त्याकडेला कर्नाटकच्या पर्यटन खात्याने लावलेले पर्यटन स्थळांचे होर्डिंगही प्रवाशांचे लक्ष वेधून घेतात. मात्र, आमच्या गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना मात्र खड्ड्यांतून हळू हळू वाट काढत कसाबसा जीव मुठीत घेऊन यावे लागते. गोवा हद्द सुरू झाल्यापासून संपेपर्यंतच्या खड्ड्यातून प्रवास करून आलेले पर्यटक नको हा गोवा म्हटल्याशिवाय रहात नाहीत. पर्यटनदृष्ट्या सुंदर असलेल्या गोव्याची या खड्डेमय रस्त्यामुळे बदनामी होत आहे. पर्यटन हे एकमेव उत्पन्नाचे साधन असलेल्या गोवा सरकारने गोव्यात येणाऱ्या या रस्त्याकडे इतके दुर्लक्ष करणे हे निंदनीय आहे. सरकारने आता कोणतीही वेळ न दवडता या रस्त्याचे काम त्वरित हाती घेऊन गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचा प्रवास सुखकर करावा व गोव्याची होणारी बदनामी टाळावी.

संबंधित बातम्या