उर्फान मुल्लांच्या रुपाने बेरजेचे राजकारण

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020
  • काँग्रेसमधून ‘राजीनामा दिला की हकालपट्टी झाली’ याविषयी दुमत असलेले उर्फान मुल्ला यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते भाजपमध्ये जातील अशी अटकळ होती. मात्र, मुल्ला यांनी तसे स्पष्ट संकेत दिले नव्हते.

काँग्रेसमधून ‘राजीनामा दिला की हकालपट्टी झाली’ याविषयी दुमत असलेले उर्फान मुल्ला यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते भाजपमध्ये जातील अशी अटकळ होती. मात्र, मुल्ला यांनी तसे स्पष्ट संकेत दिले नव्हते. आपला सन्मान करणाऱ्या पक्षात जाणार असे ते सांगत होते. आता भाजप त्यांचा सन्मान कशा प्रकारे करेल, हे पहावे लागणार आहे. मुल्ला यांनी ‘अर्ध्या गोवऱ्या स्मशानात गेलेल्यांना काँग्रेसमध्ये उमेदवारी दिली जाते’, असा जो आरोप केला आहे, यावरून मुल्ला हे उमेदवारीसाठी इच्छूक असल्याचे स्पष्टपणे जाणवते. त्यामुळे मुल्ला यांना भाजपने उमेदवारीचे आश्वासन दिलेले असणार. मुल्ला यांचे हृदयपरिवर्तन का झाले व कसे झाले? याची कथा कधीतरी सर्वांसमोर येणारच आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मुल्ला यांच्या पक्ष प्रवेशावेळी मुल्ला हे याआधी नावेली मतदारसंघातून शेख जीना यांना भाजपने उमेदवारी द्यावी, यासाठी तत्कालीन नेते मनोहर पर्रीकर यांना भेटले होते, असा गौप्यस्फोट करून मुल्ला यांचीच पोलखोल केली आहे. त्यामुळे मुल्ला यांची काँग्रेसवरील निष्ठा किती ठाम होती, हेही त्यांनी अप्रत्यक्षपणे दाखवून दिले आहे.

या कार्यक्रमाचे निमित्त साधून उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी काँग्रेसवर तोंडसुख घेतले. आपण काँग्रेस का सोडली हे सांगण्याची संधी त्यांनी सोडली नाही. मुल्ला यांच्या पाठोपाठ काँग्रेसमधून कोण बाहेर पडणार, यावरच सारेकाही बऱ्यापैकी अवलंबून आहे. मुल्ला यांना तीन दिवसांत भाजपने पायघड्या घातल्या यावरून काँग्रेसमुक्त भारत या संकल्पनेवर भाजपचे आजही काम सुरू असल्याचे दिसते. यापुढील निवडणुकीत काँग्रेस वा अन्य पक्षातून उमेदवार निवडून आले तरी ते भाजपमध्ये येतील, असे वातावरण तयार करण्यात भाजप यशस्वी झाला आहे.  
याआधी काँग्रेस नको म्हणून भाजपला मतदान झाले. आता भाजप नको म्हणून काँग्रेसला मतदान होणार असे नाही. आम आदमी पक्षाने दोनशे युनिट मोफत विजेचे आश्वासन देऊन मतदारांना आणखी एक पर्याय देण्याची तयारी सुरू केली आहे. आम आदमी पक्षाची संघटनात्मक ताकद किती वैगेरे प्रश्नात सध्या जायचे कारण नाही. कारण निवडणूक अद्याप फार दूर आहे. मात्र, भाजपचा सामना करण्यासाठी काँग्रेसची तयारी आहे का? हा खरा प्रश्न आहे.

काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश प्रमुख उर्फान मुल्ला यांची अपेक्षेप्रमाणे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी हकालपट्टी केली. त्याआधी मुल्ला यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवले आहे. त्यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची बरीच पोलखोल केली आहे. ज्या कारणामुळे काँग्रेसला सर्वाधिक आमदार निवडून येऊनही विधिमंडळ गटनेता निवडण्यात यश आले नव्हते. परिणामी सत्तेच्या खेळात त्यांना पराभूत व्हावे 
लागले होते, त्याचे नेमके कारणही मुल्ला यांनी उघड केले आहे. आजवर त्याची केवळ चर्चा होती. मात्र, त्यावेळी आतील गोटात वावर असलेल्या मुल्ला यांनीच ते कारण जाहीर केल्यामुळे त्यात तथ्य नाही, असे म्हणता येणार नाही.

काँग्रेस अधून मधून आंदोलने करत आहे, त्यात सातत्य ठेवण्यात त्यांना यश येत आहे तरीही पुढील निवडणुकीत सत्ताधारी भाजपला काँग्रेस टक्कर देऊ शकेल, अशी आशा जनतेला ठेवता येणार असे वाटत नाही. २०१४ मध्ये बिहार हरले. त्यानंतर मध्यप्रदेश, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, पंजाब काँग्रेसने एकहाती जिंकले. गुजरातमध्ये सत्ताधाऱ्यांना घाम फोडला आणि ८० पेक्षा जास्त जागा घेतल्या. गोवा, मणिपूरमध्ये क्रमांक एकचा पक्ष म्हणून काँग्रेस उभी राहिली. केवळ त्रिपुरा आणि उत्तरप्रदेशात काँग्रेसचा दारूण पराभव झाला, हे मान्य असले तरी झारखंडमध्येही मित्रपक्षाच्या मदतीने काँग्रेसने भाजपला रोखले. पण या यशाला यश म्हणायचेच नाही, असे असेल तर अवघड आहे. काँग्रेसला खूप काम करण्याची गरज असली, तरी वाटते तेवढे आणि दाखवले जाते तेवढे पानिपत झालेले नाही हे सत्य आहे. सर्व यंत्रणा विरोधात असताना वर उल्लेख केलेल्या राज्यांत लोकांच्या मतांची पसंती मिळवली आहे. 

काँग्रेस पुन्हा उभारी घेऊ शकते. अगदी राज्याचा विचार केला तरी काँग्रेस पुन्हा उभी राहू शकते. त्यानी फक्त काँग्रेसमधील दरबारी नेते हटवले पाहिजेत. काँग्रेस आहे तिथेच आहे. पण, दरबारी नेत्यांच्या कोंडबळ्यात अडकली आहे. केवळ निवडणुका आणि विचार समोर ठेऊन चालत नाही. केडर लागते त्यासाठी गाभा गटात (कोअर ग्रुप) संघटनेची भूमिका ठाम मांडणारे नेतृत्व लागते. त्याने सत्तेपासून दूर राहून काम केले पाहिजे तर आणि तरच!

मात्र, असे होण्याची शक्यता फार धुसर आहे. सध्या तरी डावपेचात भाजपने काँग्रेसवर मात केल्याचे दिसत आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्यांत बहुतांश आमदार हे ख्रिस्ती समाजाचे आहे. ‘चर्च आणि भाजप’ यांचे सध्या किती सख्य आहे हे जगजाहीर आहे. त्यामुळे ख्रिस्ती समाज भाजपपासून पुढे - मागे दुरावला तर मुस्लीम समाज भाजपसोबत असेल, अशी हे समीकरण आकाराला आणले गेले आहे. भाजपने यानिमित्ताने बेरेजेचे राजकारण केले आहे. मुल्ला यांनी अलीकडे अल्पसंख्याक म्हणजे मुस्लीम समाजाचा नेता म्हणून मान्यता मिळवली होती. अल्पसंख्याक समाजाचे विषय सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मुल्ला यांनी ज्या पद्धतीने सरकारची स्तुती केली होती, त्याचवेळी पाणी कुठेतरी मुरते आहे, याचा संशय आला होता. मात्र, शेख जीना यांच्या भाजपच्या उमेदवारी देण्यावेळी मुल्ला हे भाजपच्या आतील गोटापर्यंत कसे पोचले होते यावरून त्यांचा सर्वत्र संचार कसा होता हे दाखवून देते.

मुल्ला यांच्या भाजप प्रवेश २४ तास आधी ठरूनही केवळ सांताक्रुझमधीलच नव्हे, तर राज्यभरातील मुस्लीम समाजातील युवा वर्ग ज्या संख्येने भाजप कार्यालयाजवळ एकवटला होता. त्यावरून भाजपने केलेले हे बेरजेचे राजकारण किती फलदायी ठरणार हे ठरून गेलेले आहे. भाजपने केलेले हे मतांचे धृवीकरण पाहता येणाऱ्या काळात होणाऱ्या पालिका आणि जिल्हा पंचायत निवडणुका भाजपने फारच गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे. मुस्लीम समाजाची राज्यात अलीकडे संख्या वाढत असल्याचे जनगणनेच्या आकडेवारीवरून दिसते. त्यातही ख्रिस्ती समाजातील अनेकांनी भारतीय नागरिकत्व त्यागल्याने त्यांनी मतदानाचा अधिकार गमावला आहे. त्यामुळे मुस्लीम समाज भाजपसोबत आला तर भाजपच्या राजकारणाला त्यामुळे बळच मिळणार आहे. मुल्ला यांच्या रुपाने एक हुकमी एक्का भाजपच्या हाती आला आहे. त्याचा वापर भाजप कसा करणार त्यावर राज्याच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे. एक मुल्ला भाजपमध्ये गेला म्हणून काय फरक पडतो, असे म्हणणाऱ्यांना त्याचे उत्तर आगामी विधानसभा निवडणुकीतच मिळणार आहे. भाजपचे सबका साथ, सबका विकास हे धोरण आणखी कोणा कोणाला आपल्यात सामावून घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

हे सारे घडत असताना काँग्रेसने त्यापासून काहीच धडा घेतला नाही, तर काँग्रेस भाजपला तोडीस तोड प्रतिस्पर्धी म्हणून उभी राहू शकणार नाही. काँग्रेसमधील अंतर्गत कलह काय आहे? तो ओळखून त्यावर आताच उपाययोजना केली तरच काँग्रेस पुन्हा उभारी घेऊ शकेल. आहे त्याच पद्धतीने काँग्रेसने वाटचाल सुरू ठेवली, तर त्यातून हाती काय येईल हे आताच सांगता येणार नाही. मात्र, नवीन चेहरे समोर आणले नाहीत, तर काँग्रेसला भवितव्य नाही हे आज स्वच्छपणे दिसते आहे.

अधिक वाचा : 

पेडणे भागात आज व उद्या वीजपुरवठा बंद

डिचोलीत कोरोना नियंत्रणात

 

संबंधित बातम्या