मडगाव: मडगावचा दिंडी उत्सव हा मडगाववासियांचाच नव्हे तर अखिल गोमन्तक त्याची परीने गोमंतककेतरांना एकत्र आणणारा उत्सव आहे. हा दिंडी उत्सव आज जरी बहरलेला, नावाजलेला असला तरी त्याचे मूळ अवघ्याच जणांना माहिती असेल.
आज हरी मंदिराची नूतन वास्तू दिमाखात उभी आहे. अनेक वर्षे हरी मंदीर शांबा नारायण लोटलीकर यांच्या वास्तूत होते. लोटलीकर चाळ म्हणून तिला ओळखत असत. या चाळीच्या मागच्या बाजूला नरगुंदकर बंधू राहायचे. त्यांचे वडील नित्यनेमाने दरवर्षी मित्र - मंडळीसोबत पंढरपुरची वारी करायचे. वडील निवर्तल्यानंतर ही वारी चालू ठेवणे नरगुंदकर बंधूंना शक्य झाले नाही. पण, बंद ठेवणेही त्यांना बरे वाटेना. काय करावे ?.. लगेच एक विचार त्यांच्या मनात आला व या विचाराला चालनाही मिळाली... मडगावाच्या कोंब वाड्यावर अनंत केसरकर यांच्या निवासस्थानी श्री विठ्ठल रखुमाईची मूर्ती होती. नरगुंदकर बंधूंनी ही कल्पना उचलून धरली. तेव्हापासून केसरकर यांच्या निवासस्थानी ही वारी जाऊ लागली. वारकरी मंडळी या वारीमध्ये सहभागी होऊ लागली. आषाढी एकादशीला पावसाळा, कोंबवाड्यात सर्वत्र पाणी, त्यामुळे वारी नेणे त्रासाचे होऊ लागले. त्यामुळे या वारीमध्ये खंड पडला. कार्तिकी एकादशीची वारी मात्र चालू राहिली. त्यामध्ये पुढे आवश्यकतेनुसार बदल होत गेले. तीच दिंडीची सुरुवात, असे मानायला हरकत नसावी.
लोटलीकरांच्या चाळीमध्ये घोळबा उर्फ गोपाळ शेट मिस्त्री राहात असत. तेही पंढरपुरची वारी करायचे. त्यांनी आपल्या राहत्या जागेमध्ये विठ्ठल रखुमाईचा फोटो लावून समईच्या मंद प्रकाशात हरिनामाचे स्मरण सुरु केले. नामस्मरण, टाळ, मृदुंगाचा आवाज घुमू लागला. जवळपासचे भाविक, श्रद्धाळू भक्त या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ लागले. हळूहळू जमाव वाढू लागला. नित्यनेमाने भक्त तिथे जमायचे. नामस्मरणाच्या कार्यक्रमासोबत पुढच्या वाटचालीच्या दृष्टीने विचारविनिमय व्हायचा. या विचारविनिमयातून सर्वानुमते हरिमंदिर हे नामाभिदान निश्चित करण्यात आले. या नामाभिदानाचा विधी तत्कालीन व्यापारी बाळकृष्ण नेवगी यांच्या करवी पार पडला. पुढे नेवगी, मुंज, दलाल,कामत, सडेकर, मोर्डेकर, लोटलीकर, वेरेकर, कुडतरकर, सावंत, आमोणकर, भाटीकर आदी मडगावमधील कुटुंबीय मंडळी पुढे सरसावली. इथे नित्यनेमाने हरिनामस्मरणासबोत भजने, प्रवचने कीर्तने सुरु झाली. वरील मंडळींच्या या संदर्भात सतत बैठका होऊ लागल्या.
आमच्या वेबसाईटवरच्या अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या कार्यक्रमाला सार्वजनिक रुप देण्याचे ठरले. जेणेकरून जास्तीत जास्त भाविक हा कार्यक्रम आपलाच आहे अशा भावनेने त्यात सहभागी होऊ शकतील. मुख्य कार्यक्रम २४ तासांचा असावाच, तो दिंडीच्या स्वरुपात असावा, दरवर्षी ही दिंडीची वारी कार्तिक शु. त्रयोदशीला हरिमंदिरातून हरिनामाच्या जयघोषाने टाळ मृदुंग, भजनादी नियोजित कार्यक्रमानुसार रात्रभर वाजत - गाजत श्री दामोदर सालामध्ये तशीच पुढे कोंबवाड्यावरील विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये थोडा वेळ विसावून परत श्री हरिमंदिरामध्ये आणावी, असे सर्वांनुमते ठरवण्यात आले. त्याप्रमाणे ही दिंडीची वारी सुरु झाली.
दरवर्षी भाविक उत्साहाने या वारीमध्ये सहभागी होऊ लागले. या वारीला "मडगावचा दिंडी उत्सव" असे संबोधले जाते. आता तर ह्या उत्सवाचे नामांतर मडगाव दिंडी महोत्सवामधये झालेले आहे.
मठग्राम नगरीतील मडगाव दिंडी महोत्सव कार्तिक शु. अष्टमीला सुरु होतो. तो सलग कार्तिक शु. त्रयोदशीपर्यंत विविधांगी संपन्न होतो. चतुर्दशी, हा महोत्सव समारोपाचा दिवास. हा महोत्सव विशेष कार्यक्रमाने संपन्न होतो. आता नवीन प्रशस्त वास्तुमध्ये हा महोत्सव साजरा होतो. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी श्रीस नित्याभिषेक, षो़डषोपचार पुजेने होते. दुपारी आरती, प्रसाद, संध्याकाळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असते. त्यात मुख्यत्वे शालेय मुलांमुलींसाठी चित्रकला, हस्तकला, शुद्धलेखन, वेशभूषा, श्लोक पाठांतर, गीता अध्याय पठन, कथाकथन आदी स्पर्धा तसेच महिलांसाठी मेंदी, पाककला, मोनोलाॅग आदी स्पर्धेचे आयोजन केले जाते. संध्याकाळी सातनंतर विविधा कार्यक्रमात मनोरंजन, गायन वादनादी कार्यक्रमाचे आयोजन असते. अधूनमधून धार्मिक, सामाजिक विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात येतात. उत्कृष्ट गायक, वादक, साहित्यिकांच्या मुलाखती घेण्यात येतात.रात्री ९ नंतर आरती. त्यानंतर नाटके, गायनाची मैफलीचे आयोजन असते.
त्रयोदशी हा दिंडीचा दिवस. सकाळपासूनच भाविकांची हरिदर्शनाला गर्दी असते. हरिनामाचा गजर, भक्तजनाची भजने यांनी परिसर दुमदुमून जातो. या दिवशी दिंडी महोत्सव वारीमध्ये भाग घेण्यासाठी बेळगाव, कोल्हापूर, सांगली, पंढरपूरहून खास वारकरी संप्रदाय, पथकांचे आयोजन केलेले असते. त्या दिवशी दुपारी महाआरती नंतर उपस्थित सकाळ भाविक भक्त परिवाराकरीता महाप्रसादाची व्यवस्था असते.
संध्याकाळी टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी संप्रदायाच्या पथकामवेत "श्री विठ्ठल रखुमाई"ना खास सजवलेल्या पालखी रथामध्ये त्यांच्या आसनावर विराजित केल्यानंतर देवाकडे मागणे मागून परिसर दणाणून सोडणाऱ्या विठ्ठल रखुमाईच्या नामघोषाने दिंडी वारी सुरु होते. ज्ञानबा तुकारामाच्या गजराने आसमंत फुलून जातो. सर्वत्र उमेदीने ओसंडलेले उत्साही वातावरण! विठ्ठल रखुमाईच्या दर्शन आशिर्वादाला भाविकांची गर्दी उसळलेली असते.
या समयी गायन वादनाच्या खास बैठकांचे आयोजन असते. पहिली बैठक हरीमंदिरासमोरील भव्य मंडपात, दुसरी न्यू मार्केटमध्ये व तिसरी पालिका चौकात होते. गायनाच्या या तीन बैठका दिंडी महोत्सवाचे मुख्य आकर्षण असते. प्रसिद्ध गायक - वादकांना या बैठकीमध्ये आमंत्रित केले जाते. तिथून पुढे हरीनामाच्या जयघोषात पालखी श्री दामोदर देवदर्शनाला जाते. तिथून पुढे कोंबवाड्यावरील विठ्ठल मंदिरामध्ये श्री विठ्ठल रखुमाईच्या भेटीला जाते. तिथून पालखीची परतीची वारी सुरु होते. मठग्राम परीसराची प्रदक्षिणा पूर्ण करून परत पूर्वस्थळी येईपर्यंत दुपार होते. त्यानंतर धार्मिक विधीनुसार विठ्ठल रखुमाईची मूर्ती हरिमंदिरात विसावते.
हा एकूण सोहळा अनुपम असतो. यंदा मात्र कोविड संकटामुळे दिंडी महोत्सव मर्यादीत स्वरुपात साजरा करावा लागत आहे. महोत्सवाचे स्वरुप मर्यादीत असले तरी दिंडी महोत्सवाप्रती भाविकांची श्रद्धा अमाप आहे.
- विनायक शेट नार्वेकर