लँबर्ट मास्कारेन्हस: तपस्वी पत्रकार आणि साहित्यिक

106 वर्षांचे प्रदीर्घ आणि कृतार्थ आयुष्य लाभलेले पद्मश्री लँबर्ट मास्कारेन्हस काल निवर्तले.
लँबर्ट मास्कारेन्हस यांना राष्ट्पती प्रणव मुखर्जी यांच्याकडुन पद्ममी पुरस्कार स्विकारताना
लँबर्ट मास्कारेन्हस यांना राष्ट्पती प्रणव मुखर्जी यांच्याकडुन पद्ममी पुरस्कार स्विकारताना

वयोवृद्ध पत्रकार लँबर्ट मास्कारेन्हस (Lambert Mascarenhas) म्हणजे गोव्याच्या (Goa) मुक्तीनंतर चार दशके सतत कार्यमग्न राहिलेली चालती- बोलती पत्रकारितेची कार्यशाळा. ‘फॅक्ट’ (Fact) व ‘फिक्शन’ (Fiction) यांची चित्तवेधक सरमिसळ करत लँबर्ट यांनी कथा- कादंबऱ्याही लिहिल्या. एका विशिष्ट कालखंडात गोमंतकीय समाजजीवनातील उलथापालथींचे मनोज्ञ चित्रण करणाऱ्या या साहित्याचा पदवी व पदव्युत्तर स्तरावरील अध्ययनात समावेश झाल्यास ती लँबर्ट यांना खरी आदरांजली ठरेल.

106 वर्षांचे प्रदीर्घ आणि कृतार्थ आयुष्य लाभलेले पद्मश्री लँबर्ट मास्कारेन्हस काल निवर्तले. पत्रकार, साहित्यिक, मुक्ती चळवळीला वैचारिक आधार देणारे शिलेदार, अशी त्यांची बहुआयामी ओळख. हाडाचा पत्रकार कधीच निवृत्त होत नसतो. वयपरत्वे ‘लँबर्टबाब’ यांच्या पत्रकारितेवर अनेक बंधने आली, तरी त्यांच्यातली चौकसबुद्धी सजग होती. त्यांच्या डोळ्यांत सतत एक खट्याळपणाची चमक तरळत असायची आणि ते आपले अंतर्बाह्य निरीक्षण तर करत नाही ना, अशी शंका समोरच्याला यायची. 2009 साली ‘हार्टब्रेक पॅसेज’ ही त्यांची कादंबरी गोव्याच्या साहित्यक्षेत्रातल्या निवडक मातब्बरांच्या उपस्थितीत प्रकाशित झाली, तेव्हा त्यांचे वय 94 वर्षांचे होते आणि त्‍यांचा आवेश तरुणालाही लाजवील असा. सक्रिय पत्रकारितेतून अंग काढून घेतल्यानंतर ते ललित लेखन आणि कथा लेखनाकडे वळले.

लँबर्ट मास्कारेन्हस यांना राष्ट्पती प्रणव मुखर्जी यांच्याकडुन पद्ममी पुरस्कार स्विकारताना
Goa: ‘लोकमान्य’च्‍या मडगाव शाखेचे आज स्थलांतर

पत्रकारितेच्या कालखंडात त्यांनी जे पाहिले व अनुभवले ते या साहित्यातून समोर आले. त्यांच्या या साहित्यसेवेची चिकित्सक दखल गोव्याबाहेर व्यस्त प्रमाणात घेतलेली नाही आणि गोव्यातही या साहित्याचे हवे तितके परिशिलन झालेले नाही. पण, एका मन्वंतरातून गेलेल्या गोमंतकीय समाजाचे, त्यातही दुभांगाचा अनुभव घेतलेल्या ख्रिस्ती समाजाचे मनोज्ञ वर्णन लँबर्ट यांच्या कथांतून आलेले आहे आणि गोव्याच्या सामाजिक अभिसरणात स्वारस्य असलेल्यांनी त्यांचे वाचन- पुनर्वाचन करणे आवश्यक आहे.

गोव्याची परवशता व इथल्या समाजाचे स्खलन सलत होते

समाजाच्या अंतरंग- बहिर्रंगांना शब्दांत पकडताना काही राजकीय भाष्य करण्याची शैली देशातल्या अनेक प्रतिथयश साहित्यिकांनी अंगिकारली. आर. के नारायण, खुशवंत सिंग, अशी काही नावे यासंदर्भात घेता येतील. त्यात ‘लँबर्टबाब’ही होते. त्यांच्या जाण्याने गोव्याने पत्रकारितेतले एक तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व आणि संवेदनशील साहित्यिक गमावला आहे. गोमंतकीय असले, तरी लँबर्ट यांचे उच्च शिक्षण पुण्या- मुंबईत झाले आणि उदरभरणासाठी पत्रकारितेचे क्षेत्र निवडताना त्यानी काही राष्ट्रीय दैनिकांत उमेदवारीही केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या यत्नांना यश लाभण्याच्या सुमारास त्यांची पत्रकारिता भरात आली होती आणि साहजिकच त्यांच्यामधल्या स्वातंत्र्याच्या भोक्त्याला गोव्याची परवशता व इथल्या समाजाचे स्खलन सलत होते.

लँबर्ट मास्कारेन्हस यांना राष्ट्पती प्रणव मुखर्जी यांच्याकडुन पद्ममी पुरस्कार स्विकारताना
Goa Revolution Day 2021: भाग्य बदलणारा ‘तो’ देवदुर्लभ दिवस

गोवा मुक्त झाल्याशिवाय आपण विवाहबद्ध होणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आणि तो तडिसही नेला; यातून त्यांची ध्येयासक्ती दिसून येते. वसाहतवादाच्या विरोधातल्या त्यांच्या लेखनामुळे क्षुब्ध झालेल्या पोर्तुगीज सरकारने त्यांना काही काळ तुरुंगातही टाकले होते. ‘गोवा ट्रिब्युन’ चे संपादक म्हणून 1956 ते 1961या काळात त्यांनी केलेल्या लेखनाची दखल भारतीय नेत्यांना घ्यावी लागली होती आणि गोवा मुक्तीसाठी भारत सरकारची मनोभूमिका तयार होण्यामागे लँबर्ट यांच्या लेखनाचा खारीचा वाटा होता.

‘गोवा टुडे’ हे नियतकालिक त्यांचेच अपत्य

मुक्त गोव्यातल्या पहिल्या इंग्रजी दैनिकाचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले आणि तटस्थ पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून दिला. ‘गोवा टुडे’ हे नियतकालिक त्यांचेच अपत्य. या नियतकालिकाचे संपादक म्हणून त्यांनी तब्बल वीस वर्षे काम पाहिले. मुक्तीनंतरच्या पहिल्या दशकांत पत्रकारितेची जबाबदारी केवळ वृत्तसंकलन आणि वृत्तसंपादनापुरती मर्यादित नव्हती, तर भांबावलेल्या समाजाचे जीवनमान नव्या अनुभवांनी अधिक गोंधळून जाऊ नये म्हणून प्रबोधनाचे कामही या काळातल्या ज्येष्ठ पत्रकारांनी केले. त्यात लँबर्ट यांचे योगदान महत्त्वाचे होते. पत्रकारांच्या काही पिढ्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडल्या. या काळात गोव्यात अनेक सामाजिक व राजकीय चळवळी आकारास आल्या.

लँबर्ट मास्कारेन्हस यांना राष्ट्पती प्रणव मुखर्जी यांच्याकडुन पद्ममी पुरस्कार स्विकारताना
ज्येष्ठ पत्रकार व पद्मश्री लॅम्बर्ट मास्कारेन्हास यांचे निधन

कादंबरी विशेष लक्षात राहाण्याजोगी

विलिनीकरणाच्या प्रश्नाने गोमंतकीय समाज दुभंगतो की काय, असे वाटण्याजोगी परिस्थती निर्माण झाली होती. बहुजन समाजाला आपले राजकीय सामर्थ्य कळल्यामुळे प्रस्थापित समाजव्यवस्थेस हादरे बसत होते. कष्टकरी जनतेला जमिनीवरल्या स्वामित्वाचे वेध लागले होते आणि त्यांच्या आशा-अपेक्षांना न्याय देताना सरकारला इथली सामाजिक उतरंड, आमुलाग्र बदलण्याची क्षमता असलेले कायदे करावे लागले. या स्थित्यंतराचा नेमका अर्थ सुशिक्षित गोमंतकीयांसाठी लावत त्यांना पुरोगामित्वाचे भान देणारी जबाबदार पत्रकारिता लँबर्ट आणि त्यांच्या तत्कालिन सहयोग्यांनी केली. एक अव्वल साहित्यिक म्हणूनही लँबर्ट मास्कारेन्हस यांची दखल घेणे क्रमप्राप्त आहे. सकस साहित्याची निर्मिती करताना त्यांनी कादंबरी, कथा आणि नाट्य हे साहित्यप्रकार हाताळले असले तरी ‘सॉरोविंग लायज माय लँड’ ही गोवा मुक्तीपूर्वी, 1955 साली प्रकाशित झालेली त्यांची कादंबरी विशेष लक्षात राहाण्याजोगी.

दुसऱ्या महायुद्धामुळे गोव्याची दैना

मराठी- कोकणीसह तेलगू आणि पोर्तुगीज भाषेत तिचे भाषांतर झालेले आहे. गोव्याच्या मुक्तीलढ्याची पार्श्वभूमी असलेली ही राजकीय कादंबरी तत्कालिन शिक्षण व्यवस्था, धर्माचे अवडंबर, गोव्याची आर्थिक अवनती, धार्मिक द्वैत आणि अर्थातच नागरी हक्कांसाठीच्या संघर्षावर भाष्य करते. दुसऱ्या महायुद्धामुळे गोव्याची झालेली दैना आणि तिला तोंड देताना स्थलांतर करून देशांत अन्यत्र गेलेल्या गोमंतकीयांत सजग झालेल्या स्वातंत्र्याच्या जाणिवा, यांचे चित्रण या कादंबरीत असल्याने ती केवळ एक कल्पित कादंबरी न राहाता गोव्याच्या सामाजिक इतिहासाचे भान देणारा दस्तावेजही ठरते. लँबर्ट यांच्या साहित्याची दखल घेणे हे गोवा विद्यापीठाचे कर्तव्य ठरते. गोमंतकीय पत्रकारितेतल्या या भिष्माचार्याला ‘गोमन्‍तक’चे वंदन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com