
मिलिंद म्हाडगुत
नुकताच लागलेला कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल हा भल्याभल्यांना अचंबित करून टाकणारा होता. केवळ कॉंग्रेस जिंकली म्हणून नव्हे तर महत्त्वाकांक्षांच्या गगनात विहार करणाऱ्यांना जमिनीवर यावे लागेल म्हणून.
ब्रिटिश राज्यात सूर्य कधीच मावळत नसतो, असे पूर्वी बोलले जायचे. याचे कारण म्हणजे त्यावेळी अधिकतम देश हे ब्रिटिशांच्या कह्यात होते. सध्या भाजपची तशीच समजूत झालेली आहे.
आज देशावर भाजपची सत्ता आहेच, पण अनेक राज्यांतही त्यांची सत्ता दिसते आहे. भाजपला निवडणुका कशा लढवायच्या हे माहीत असल्याचे डांगोरे पिटले जात आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी एक हाती विजय मिळवला होता.
याचेच पुढचे पाऊल म्हणून त्यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जय्यत तयारीने उतरण्याचे ठरवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांसह अनेक दिग्गज नेते रणभूमीवर उतरले. कर्नाटकावर झेंडा लावायचाच या निर्धाराने त्यांनी मोर्चेबांधणी केली.
खरे तर कर्नाटकावर भाजपचेच राज्य होते. त्यांना फक्त ही सत्ता टिकवायची होती. आणि त्यांची रणनीती पाहिल्यास हे काम अशक्यही नव्हते. पूर्ण बहुमत न मिळाल्यास काय करायचे याचा बी प्लॅन ही तयार होता.
त्यामुळे भाजप करता ’अब दिल्ली दूर नही’ अशीच परिस्थिती असल्यासारखे वाटत होते. कॉंग्रेसला सत्तेकरता बरेच हातपाय मारावे लागणार असेच चित्र समोर येत होते. पण झाले उलटेच. भाजपचे अक्षरशः पानिपत झाले,कॉंग्रेसने एक हाती विजय मिळवला.
या विजयाला तसे बरेच कंगोरे आहेत. जनतेला कोणीही गृहीत धरू नये हाच या निकाला मागचा खरा संदेश आहे. मागे १९७७साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही आणीबाणी लावून जनतेला असेच गृहीत धरले होते.
पण जनतेने त्यांनाच आसमान दाखवले. स्वतः पंतप्रधान इंदिरा गांधी एक लाख मतांच्या फरकाने पराभूत झाल्या. त्यांची चूक होती ती भारतीय जनतेला गृहीत धरणे. आज भाजप तीच चूक करत आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जे काय रामायण झाले त्याची थोडीशी चुणूक नुकत्याच पार पडलेल्या फोंडा पालिका निवडणुकीतही पाहायला मिळाली. पालिका निवडणुका व विधानसभा निवडणुका यात जमीन आसमानाचे अंतर असले तरी जनतेला गृहीत धरल्यावर काय होते हे यातून कळते.
फोंड्यातील प्रभाग क्रमांक 11 हा खरे तर नगराध्यक्षांचा प्रभाग. गेल्यावेळी याच प्रभागातून फोंड्याचे विद्यमान नगराध्यक्ष रितेश नाईक हे तब्बल ३८० मतांनी विजयी झाले होते. यावेळी हा प्रभाग महिलांकरता आरक्षित झाल्यामुळे रितेश दुसऱ्या प्रभागात गेले आणि त्यांच्या जागी भाजपने चुकीच्या उमेदवाराला उमेदवारी दिली.
भाजपचा उमेदवार म्हटल्यावर लोक मते देणारच, असे त्यांनी गृहीत धरून टाकले असावे. पण त्याची परिणती अशी झाली की भाजपला तिसऱ्या क्रमांकावर जावे लागले. मतदारांना गृहीत धरल्यावर काय होऊ शकते याचे हे आणखी एक उदाहरण.
मतदार सुज्ञ असतात. मतपेटीद्वारा आपला रोष कसा व्यक्त करायचा यांचे त्यांना चांगले ज्ञान असते आणि याचाच प्रत्यय कर्नाटकात आला आहे. त्यामुळे यापुढे भाजपला सावध पावले उचलावी लागणार आहेत. पंतप्रधान आले किंवा मंत्री आले म्हणजे निवडणूक जिंकली जाते, असा जो समज बाळगला जात आहे तो आधी दूर करावा लागणार आहे.
आता लोकसभा निवडणुका फक्त दहा महिने दूर आहेत. भाजपजवळ आज जास्त मित्र पक्ष राहिलेले नाहीत. बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र व आता कर्नाटक अशी काही महत्त्वाची राज्ये भाजपच्या हातातून निसटताना दिसत आहेत.
महाराष्ट्रासारखे बिन्नीचे राज्यही ज्वालामुखीच्या तोंडावर बसल्यासारखे वाटत आहे. राजस्थान, मध्य प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांत काय होणार हे डिसेंबरमध्ये होणाऱ्या या राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर समजणार आहे. पण भाजपच्या दृष्टीने परिस्थिती म्हणावी तशी ’आलबेल’ वाटत नाही.
सगळे विरोधी पक्ष एकत्र झाले तर काय होईल, हे सांगणे आज कठीण वाटत असले तरी यामुळे भाजप विरोधकांना एक नवी दिशा मिळू शकेल एवढे निश्चित आहे. कर्नाटकाने विरोधकांतील सुप्त शक्ती जागवण्याचा प्रयत्न केला आहे यात शंकाच नाही.
याचा अर्थ लोकसभा निवडणुकीत कर्नाटकाची पुनरावृत्ती होईल, असे सध्या तरी म्हणता येत नाही. पण ते अशक्यही नाही. कर्नाटक निवडणूक होण्यापूर्वी ही गोष्ट अशक्यप्राय वाटत होती. पण आज ती विरोधकाच्या नजरेत आल्यासारखी वाटत आहे.
अर्थात हे ’मृगजळ’ही ठरू शकेल. भाजप आपली रणनीती बदलून परत एकदा गड काबीज करू शकेलही. पण सामना एक हाती होणार नाही याचा ’ट्रेलर’ आतापासूनच दिसायला लागला आहे. मरगळलेले विरोधक जागृत होताना दिसायला लागले आहेत.
भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत शंभर जागासुद्धा मिळणार नाही, असे जे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे त्या याच नव्याने निर्माण झालेल्या आत्मविश्वासापोटीच.
आत्मविश्वास हा महत्त्वाचा असतो यात शंकाच नाही, पण तो अतिआत्मविश्वास होता कामा नये याचीही दक्षता विरोधकांना घ्यावी लागणार आहे..
अर्थात, हा अतिआत्मविश्वास होता की काय हे दहा महिन्यानंतरच कळणार आहे. पण कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने विरोधकांना तसेच जनतेला प्रयत्न केल्यास काहीही अशक्य नाही हा संदेश दिला आहे एवढे निश्चित.
आणि हा संदेश आत्मसात करून तशी पावले उचलल्यास ’हम होंगे कामयाब’ असे म्हणत भाजप विरोधकांनी विजयरथाकडे कूच केल्यास आश्चर्य वाटायला नको.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.