Karnataka Election Result 2023: कर्नाटक निकालाचे धडे आणि गृहपाठ

इस्लामिक कट्टरपंथीयांना आळा घालणे ही कदाचित एक आवश्यक गोष्ट आहे, परंतु त्यासाठी कर्नाटकात हिंदूंना कट्टर बनवणे लोकांना रुचले नाही.
Karnataka Election Result 2023
Karnataka Election Result 2023 Dainik Gomantak

डॉ. ऑस्कर रिबेलो

‘एखाद्या परग्रहावर स्वत:च्याच कोशात गुफटलेल्या डाव्या लिबरांडू (उदारमतवादी) लोकांप्रमाणेच भ्रष्टाचारात बरबटलेल्या प्रदेशात राहणाऱ्या आमच्यासारख्यांनाही इथे वाळीत टाकले जाते, बदनाम केले जाते’, अशी प्रतिक्रिया भाजपच्या कट्टर समर्थकांनी देणे ही घटना ऐतिहासिक आणि कर्नाटक भूमीशी नाते सांगणाऱ्या निकालाइतकीच विचित्र व अधिक आश्चर्यकारक आहे.

भाजपच्या असह्य उद्दामपणाचा मुकाबला करण्याचे शिवधनुष्य उचलणाऱ्या विजयी कॉंग्रेससाठी आणि पराभूत भाजपसाठी काही माझी निरीक्षणे आणि गिरवण्यासाठी धडे मी येथे देत आहे. तेव्हा पाटी व खडू घेऊन सज्ज व्हा..

एकांगी कट्टरपणा

अब्रहमिक पंथांप्रमाणे हिंदूंना एकांगी व कट्टर बनवण्याच्या संघ व भाजपच्या प्रयत्नांना, भिन्न विचारधारांवर विश्‍वास असलेल्या स्वभावत:च उदारमत असलेल्या हिंदूंनी एकमुखी नाकारले. झाले एवढे खूप झाले, आता आणखी नको, असे म्हटले.

इस्लामिक कट्टरपंथीयांना आळा घालणे ही कदाचित एक आवश्यक गोष्ट आहे, परंतु त्यासाठी कर्नाटकात हिंदूंना कट्टर बनवणे लोकांना रुचले नाही. खास करून शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या निष्पाप मुस्लीम मुलींविरुद्ध केलेल्या गुंडगिरीमुळे पाणी डोक्यावरून जाऊ लागले होते.

मी हे पुन्हा पुन्हा सांगतो, हा देश लोकशाहीवादी आणि विविधतेत एकता मानणारा आहे. जगातील कोणतीही शक्ती भारताचे हे स्वरूप बदलू शकत नाही. तुम्ही काही काळापुरते, काही हिंदूंना मूर्ख बनवू शकता, परंतु सर्व हिंदूंना सर्वकाळ मूर्ख बनवू शकत नाही, ही गोष्ट भाजप पराभूत होऊन, जमिनीवर आपटून झाल्यावर लक्षात आली आहे.

बहुवचन आहे कारण नियमित हिंदू त्याच्या/तिच्या विश्वासात लोकशाही आणि बहुवचन आहे. मोदी आणि शहांचा रथ इथे रुतला आहे. असार जीवनाचे हेच तर सार आहे.

भ्रष्टाचार

भ्रष्टाचार हा लहानशा खोलीतल्या हत्तीसारखा आहे. हत्ती आत कसा शिरला, हा प्रश्‍न अनेकांना पडतो. त्याचे उत्तर असे आहे की, हत्ती खोलीत नाही शिरला, भ्रष्टाचाराच्या हत्तीभोवती व्यवस्थेची खोली बांधण्यात आली आहे.

हत्तीला बाहेर काढायचे असेल, तर खोली मोडण्याशिवाय गत्यंतर नाही. ते तर केवळ अशक्य आहे. म्हणूनच भ्रष्टाचाराचा हा हत्ती सुखेनैव राहतो. कर्नाटकात भाजपच्या काळात भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात वाढला. त्याचा परिणाम मतपेटीत दिसून आला.

पण, जिंकलेल्या व सत्तेत येणाऱ्या कॉंग्रेसचा कारभार भ्रष्टाचारमुक्त असेल, अशा भ्रमात अजिबात राहू नका. सत्तेतले बदलत राहतात, व्यवस्थेतला भ्रष्टाचार कायम तिथेच असतो. अगदी त्या खोलीतल्या हत्तीसारखा.

इस्लामी कट्टरता

कर्नाटकातील विजयामुळे राज्यातील अल्पसंख्याकांना मोठा दिलासा मिळू शकेल. सामान्य मुस्लिम आणि ख्रिश्चन हे कट्टर उजव्या विचारसरणीच्या वेढ्यात अडकले होते. पण त्याचबरोबर मुल्ला आणि पाद्र्यांनी हे लक्षात घ्यावे की, हा विजय म्हणजे इस्लामीकरण किंवा ख्रिस्तीकरण करण्याची मोकळीक नव्हे.

लोकशाहीविरोधी आणि ‘जगात आम्हीच काय ते श्रेष्ठ’, असला बकवास प्रचार करण्यासाठी कॉंग्रेसच्या नवीन सरकारमध्ये मिळालेली परवानगी नाही. जर आपण हिंदुत्वाच्या उजव्या कट्टर विचारसरणीची निंदा नालस्ती करत असू, तर इस्लामीकरण करणाऱ्या मुल्लांची व ख्रिस्तीकरण करणाऱ्या पाद्र्यांचीही तितक्याच प्रकर्षाने निंदा नालस्ती केली पाहिजे, ही गोष्ट कॉंग्रेस किंवा इतर सेक्युलर पक्षांनी नीट लक्षांत ठेवली पाहिजे, त्यानुसार वागलेही पाहिजे.

Karnataka Election Result 2023
National Games 2023: लगोरी, रोल बॉल, काल्लियारापट्टू'सह विविध पारंपरिक खेळांचे राष्ट्रीय स्पर्धेत पदार्पण

भविष्य

कर्नाटकचा विजय आनंददायी असला तरीही एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवा मोदी कुठेही जाणार नाहीत, त्यांना याचा धक्का लागणार नाही. त्यांचे संघटनकौशल्य व पराभवाला पुढच्या यशाची पायरी बनवणे त्यांना जमते. भारतीय राजकारणासाठी लागणारा तेवढा निर्दयीपणा आणि धूर्तपणा त्यांच्याजवळ आहे.

त्यामानाने राहुल गांधी खूपच पिछाडीवर आहेत. त्यांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे. गरीब सावरकरांच्या विरोधात राहुल गांधी यांनी दाखवलेला निर्दयीपणा वास्तविक त्यांनी सावरकर विचारधारेशी दाखवायला हवा होता. चारित्र्यहनन करण्याची जी चूक भाजपवाले नेहरूंच्याबाबतीत करतात, तीच चूक राहुल गांधी यांनी सावरकरांच्याबाबतीत केली.

वैचारिक मतभेद असणे वेगळे आणि त्यासाठी देशभक्तांच्या देशभक्तीवर शंका घेणे वेगळे. सावरकरांनी भोगलेल्या तुरुंगवासाची थट्टा करणे केवळ असह्य आणि त्रासदायकच नाही, तर ते नेहरूंचे बलिदान नाकारण्याइतकेच देशद्रोहीपणाचे आहे.

राजकारणात माजलेला हा वैचारिक कोतेपणा, उर्फी जावेदच्या कपड्यांइतकाच, जे झाकायचे तेच न झाकणारा आहे. सारांश, समायोजन, तडजोड आणि मोठ्या मनाने तयार असलेल्या कॉंग्रेससोबत विरोधी पक्ष एकत्र येऊ शकत नसतील तर 2024 ला मोदीच पुन्हा येतील.

Karnataka Election Result 2023
Gomantak Editorial: पुढले रणांगण!

गोव्यावर प्रभाव

मला अनेकांनी विचारले आहे की कर्नाटकसारखे गोव्यात का घडू शकत नाही? इथल्या उच्च पातळीवरील भ्रष्टाचार आणि राजकीय खलबते लक्षात घेता, याचे थोडक्यात उत्तर आहे गोव्यात मोन्सेरात, राणे, लोबो इत्यादी संस्थानिकांचे राज्य आहे.

ते कुठल्या पक्षात आहेत, याला काहीच महत्त्व नाही. पक्षाची लेबले भोळ्या लोकांना मूर्ख बनवतात. कर्मधर्मसंयोगाने 2024 मध्ये भाजपचा पराभव झालाच आणि कॉंग्रेस सत्तेवर आली, तर सध्याचे सर्व 37 आमदार (आप आणि आरजीचे लोक सोडून) या वेशीवरून त्या वेशीवर जाण्यासाठी ओरडू लागतील.

त्यामुळे गोव्यातील मतदारांना माझा प्रामाणिक सल्ला आहे की, लोकशाहीवर विसंबून राहू नका. तुम्ही स्वतःवरच ओढवून घेतलेले भाग्य स्वीकारा. तुमच्याजवळ अन्य पर्याय नाही. कारण तुम्ही स्वतःच स्वत:च्या आशा-आकांक्षांचा लिलाव मांडून त्यांना सर्वोच्च बोली लावणाऱ्याला विकले आहे.

Karnataka Election Result 2023
Civil Supplies Department: ‘नागरी पुरवठ्या’चा पाय अधिकच खोलात!

गृहपाठ

1. हिंदू हा महाकाय जाहिराती आणि ‘शाही’ रोड शो यांना भुलून स्वत:ला विनाशाच्या मार्गावर नेणारा मूर्ख नाही.

2. मुस्लीम पंथगुरूंनी फालतू लोकशाहीविरोधी शरिया बोलणे बंद केले पाहिजे आणि लोकशाही व उदारमतवादी मूल्ये यांविषयी बोलायला शिकले पाहिजे.

3. भ्रष्टाचार सहन करण्यापलीकडे गेल्यास शिक्षा होईल.

4. प्रत्येक सरकारी यंत्रणेचा, विरोधकांविरुद्ध केलेला शस्त्रासारखा वापर करण्याची ‘अमित शाह रणनिती’ काही काळानंतर उलटते.

तात्पर्य : काही काळासाठी तुम्ही एखाद्या भारतीयाला लोकशाहीतून बाहेर काढू शकता, पण शेवटी लक्षात येईल की, तुम्ही कुठल्याही भारतीयातून लोकशाहीला कायमचे बाहेर काढू शकत नाही!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com