पुरूषी बळ आणि विकृती

पुरूषी बळ आणि विकृती
vikruti image
विशेष
हेमा नायक


पुरूषी बळ आणि विकृती
.


पुष्कळ वर्षांनी दिसली ‘ती’. मनात आले तिच्या मुलीची चौकशी करून पुढे जायचे. तिने मला बघितले. थोडीशी संकोचली. मला भेटायचे टाळू पाहत होती. मागे वळून परस्पर जायला बघत होती आणि तेवढ्यात आमची नजरानजर झाली. मी झटक्यात तिला गाठली, खुशाली विचारली. ओळख तर पटली होती. म्हटले, मुलगी काय करते? सांगायला कचरू लागली. विचारले, मॅट्रिक पर्यंत शिकवलेस ना? अपराधी झाल्यासारखी तिने मान खाली घातली होती. म्हणाली, ‘लग्न केले.’ ‘काय? एवढ्या लहान वयात?’ मी किंचाळलीच एकदम. मला ठाऊक असलेलेच कारण तिने सांगितले. चौथी शिकणारी पोरगी. दुपारी तिला एकटी गाठून गावातील एका साधारण तिशीतल्या माणसाने तिच्यावर बलात्कार केला. वायुवेगाने ही बातमी गावभर पसरली. कोण व्यक्ती हे सर्वांनाच ठाऊक होते. पण कोणीच नाव घेईना अथवा त्याला विचारण्याच्या भानगडीत पडेना. त्याच रात्री त्या गरीब बिचाऱ्या बाईने आपल्या मुलीला नेऊन आपल्या भावाकडे ठेवले आणि सोळा वर्षांची पोरगी होता क्षणी तिच्या मामाने तिला बायको मेलेल्या तीस वर्षाच्या एका विधुराबरोबर दोन वर्षांपूर्वी लग्न केले. एक मुलगी देखील आहे आणि आता दुसऱ्यांदा गरोदर.
तिची व्यथा मला कळत होती. ती लहानगी पोर, शाळेत असताना कुसकरून टाकली एका नराधमाने. गावात शी थू झाले माय लेकीचे. तो पुरुष सुटला. त्याला कोणी वाळीत नाही टाकले. नंतर कितीजणीवर त्याने जबरदस्ती केली असेल कोणास ठाऊक! शेवटी अबला ती स्त्रीच. तोंडून गजर करतो स्त्रिस्वातंत्र्याचा. पण या विकृतीला कोण नाही आवरू शकत.
त्या नजरेतून स्त्रीला अजूनही दुर्बळ घटक मानलेली आहे. एकदा तिला आडवी टाकली म्हणजे त्याच्या शक्ती समोर ती निर्बळाच बनते. कवी निलबा खांडेकर यांनी अशा अन्यायांवर प्रकाश टाकणाऱ्या कविता लिहिल्या आहेत. सभोवताली घडणाऱ्या समाजातील वाईट गोष्टींवर त्यांच्या साहित्याची नजर जाते. त्यांच्या संवेदनातील तीव्रता आम्हाला दुःखी करतात. जगात मातलेली पाशवी मानवता, माणसाने माणसाकडे वागण्याची हीन वृत्ती त्यांच्या कवितेतून आपल्याला स्पर्शून जाते. निर्भयावर झालेला सामूहिक बलात्कार, गँग रेप केस, अरुणा शानभागवर झालेला लैंगिक पाशवी बलात्कार यावर कवी मनाच्या संवेदनशीलतेने स्त्रियांना हालवून सोडले.
कवी एका कवितेत म्हणतात – सामूहिक बलात्कार कोठे, केव्हा, कधी आणि तो कोणी कोणावर करावा याची नियमावली अथवा वेळापत्रक कधीच कोणी जाहीर केलेले आठवत नाही.
बलात्कार किती किळसवाणा प्रकार असतो. याची जाणीव फक्त स्त्रियांना असेल. पुरुषांना जाणवेल फक्त संवेदना आणि व्यक्त करतील आपल्या भावना. यालाही लागते धैर्य आणि धाडस. ते सगळ्यांना नसते. एक लक्षात ठेवले पाहिजे, स्त्रीचे शरीर हे तिचे स्वतःचे असते. त्याच्यावर तिचा स्वतःचा सोडून कोणाचाच अधिकार नसतो. आपल्या शरीराला कोणी स्पर्श करावा हे तिने ठरवायचे असते. पण पुरुषाच्या बळापुढे ती निर्बलाच ठरते.
अशा प्रकारचे प्रभावी साहित्य हिंदी भाषेत पुष्कळ आले आहे. पण गोव्यात अशा प्रकारचे लेखन तर नाहीच परंतु वाचनही होत नाही. हिंदीतील सुप्रसिद्ध लेखक कमलेश्वर यासारख्या थोर लेखकांचे साहित्य वाचले म्हणजे आपण लेखक म्हणून कोठे आहोत, याची जाणीव होईल. त्यांच्या 'कितने पाकिस्तान' पुस्तकातील बलात्कारासंबंधी एक प्रसंग द्यावासा वाटतो. घरात पतीपत्नी दोघं असतात. पण प्रदेश जिंकल्या कारणाने अधिकारी आणि सैनिक खूश असतात. एक अधिकारी त्या स्त्रीजवळ जातो. दिसायला सुंदर होती. पण त्याला जाणवले, तिच्या चेहऱ्यावर तसेच शरीरात कसल्याच संवेदना झाल्या नाहीत. त्याने तिच्या पतीला बाहेर पाठविले. तो गेल्यावर ती एखाद्या मूर्तीप्रमाणे स्तब्ध राहिली. क्षणात ती हलली आणि बाहेर धावली. त्या ऑफिसरने तिच्यावर झडप घातली आणि कंबरेला घट्ट पकडले. तिने त्याच्या मनगटाचा चावा घेतला. त्याने तिच्या कंबरेवर एक मूठ मारली. ती किंचाळली नाही. तिने आपल्या दोन्ही हातांच्या नखांनी त्याचे तोंड ओरबाडले आणि दुसऱ्याच क्षणात त्याने तिचा ताबा घेतला. तिचे हात पाठी मागून घट पकडले. ऑफिसरने तिचे कपडे फाडून टाकले. त्याची वासना उचंबळून आली होती...आणि तिला हतबल करून तिच्यावर केलेल्या बलात्काराचे वर्णन करतात. एवढ्यात संपत नाही. सैनिक

आत येतात आणि ऑफिसरला तुझे काम संपले तू आता बाहेर जा म्हणून सांगतात आणि ते सगळे एकाच बरोबर तिच्यावर तुटून पडतात. जी गत ऑफिसरने केली तीच गत ते सगळेजण करतात. मजेची गोष्ट म्हणजे शेवटी तिच्या प्रदेशातील काही इंग्रजी पत्रकार येतात. ती स्त्री विवस्त्र उभी होती. टेपरेकॉर्डर चालू झाला आणि तिचे म्हणणे नोंद होऊ लागले... मी माझ्या देशाच्या सैन्यांचे स्वागत करते. त्यांनी मोठ्या धाडसाने आमचे रक्षण केले. आमची अब्रू राखली...त्यांचे आचरण, मानवनिष्ठा आणि अब्रू या चांगल्या गुणांची स्तुती करायला हवी.
बलात्कार झालेली स्त्री आयुष्यातून बरबाद होते तर ज्याने केला तो पुरुष मात्र आपल्या बळाची स्तुती माजवीत असतो.
 
 
No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com