लोकसाहित्यात स्त्रीचे प्रकटीकरण

हेमा नायक
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

फुगड्यांची रचनाकार तर स्त्रीच आहे, का? कारण आपल्या पतीकडून जास्त त्रास सहन करावा लागतो, तो स्त्रीला. स्त्रीचे मानसिक दु:ख आणि तिला होत असलेल्या वेदना ती कोणा जवळ बोलू शकत नाही

फुगड्यांची रचनाकार तर स्त्रीच आहे, का? कारण आपल्या पतीकडून जास्त त्रास सहन करावा लागतो, तो स्त्रीला. स्त्रीचे मानसिक दु:ख आणि तिला होत असलेल्या वेदना ती कोणा जवळ बोलू शकत नाही. म्हणून तिच्याकडून फुगड्यांच्या रचना घडत गेल्या. लग्न होऊन पुष्कळ वर्षे उलटली, तरी तिला मूल होत नाही तेव्हा वडीलधारी माणसे देवाला आंगवण करतात ते गीत तिला ठाऊक आहे.

वर्ष पध्दतीप्रमाणे मागच्या आठवड्यात तिथीनुसार चतुर्थीचा सण साजरा झाला. कोरोनारोगी वातावरण आणि त्यापासून निर्माण झालेल्या गंभीर स्वरूपातून पार पडलेल्या या उत्सवाने नाही म्हटल्यास थोडासा आनंद लाभला. सेनिटायजरच्या वासात अगरबत्ती, कापूर आणि धूपाचा सुगंधित परमळ. हा सण म्हणजे महिलांच्या हर्ष उमेदीचा आणि उत्साहाचा. चतुर्थीच्या अधल्या दिवशी येणाऱ्या हरितालिकेचे त्यांना पुष्कळ अप्रूप आणि कौतुक. मोठ्या भक्तिभावाने त्या हरितालिकेचा उपवास धरतात. गौरीची पूजा करताना तिच्या मनात विचारांचा कल्लोळ माजलेला असतो.

लग्न होऊन या घरात आल्यापासून तिचा हा क्रम सहसा कधी चुकला नाही. भक्तिभावा पेक्षा रूढ होऊन बसलेल्या परंपरा आणि शास्त्रांचे पालन करण्याचे शिक्षण प्रत्येक स्त्रीला आपल्या आईकडूनच मिळालेले असते. दर दिवशी तिन्हीसांजेला अंगणातील तुळशी समोर निरांजन लावताना आई म्हणायची, घरच्या काही रूढी असतात त्या सांभाळाव्या. तिन्हीसांजेला हात जोडून तुळशीला पाया पडावे आणि मग ही सवय तिला आपसूकच चिकटून राहिली. आई खूष झालेली बघून तिलाही ते  बरे वाटायचे. पाया पडताना तिला आपल्या नजरेसमोर काल परवा वडिलांनी तुळशीत लावलेले  तुळशीचे रोप दिसायचे. अवघ्याच दिवसात ते रोप वाढत गेले, भरगच्च पाने आणि केसरे तिच्या डोळ्यांना सुखवित होते.

आता गौरीची पूजा करताना तिने माहेरच्या आठवणीं सहीत मनांतल्या मनांतच आनंद मानून घेतला. गौरीच्या गळ्यात काळ्या पिड्डुकांचा दोर बांधताना तिने आपल्या गळ्यातील मणी चाचपून बघितला. सोन्याच्या जाड सरीने गुंतलेले ते मंगळसूत्र! सौभाग्यवतीची ती खूण म्हणून  महिलांना त्याचे अप्रूप. पूजा करून ती आत किचनात येते. हळदीच्या पानावर तिने छान पातोळ्या केल्या, दोन तीन प्रकारच्या भाज्या केल्या.जेवणानंतर तिला  आपल्या मैत्रिणींना भेटण्याची तीव्र इच्छा झाली. आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी तिला त्या हव्या होत्या. पण कोरोनाच्या भीतीमुळे ती हल्ली कोठेच बाहेर पडली नाही.

आज गौरीच्या गळ्यात मणी बांधताना ती आपल्या भावनांनी आतल्या आत घुस्पटू लागली. गळ्यात जाडजूड मंगळसूत्र पण प्रत्यक्षात आपला पती मात्र विश्वासू नाही लेहे शल्य तिला बोचू लागले. आपण एक निरुपद्रवी बाई माणूस म्हणून या घरात वावरतो. जायांचा सुगंध मात्र दुसरीच कडे दरवळतो. आपण नुसते सहन करायचे. अशा वेळेला आपण व्यक्त झाले पाहिजे, नाही तर आपल्याला त्रास होणार हे तिला जाणवू लागले. आई म्हणायची घरच्या गोष्टी लोकांकडे बोलू नयेत, वारे लागलेले शीत मुठीत येत नाही. आई असे खूप बोलायची. म्हणायची कधी कधी... माझ्या बापाकडे बारा म्हशी आणि मी काढते इथे उठाबशी. या म्हणी देखील महिलांनीच रचून ठेवल्यात, अशी भाषा आणि वाक्ये जो अनुभवतो तोच बोलू शकतो.

ती पण आता सज्ज झाली. फुगड्यांच्या रचनाकार तर स्त्रीच आहे, का? कारण आपल्या पतीकडून जास्त त्रास सहन करावा लागतो, तो स्त्रीला. स्त्रीचे मानसिक दु:ख आणि तिला होत असलेल्या वेदना ती कोणा जवळ बोलू शकत नाही. म्हणून तिच्याकडून फुगड्यांच्या रचना घडत गेल्या. लग्न होऊन पुष्कळ वर्षे उलटली, तरी तिला मूल होत नाही तेव्हा वडीलधारी माणसे देवाला आंगवण करतात ते गीत तिला ठाऊक आहे. गणपती देवा, करीन तुझी पुजा, नवस फेडीन रे आणि हे गीत पुढे पुढे जात राहते. आपल्या मनाची अवस्था मांडण्यासाठी फुगडी हे उत्तम साधन हे तिला पटून आले आणि ती जुन्या फुगड्या गिरवायच्या सोडून तिच्या तोंडातून नव्या फुगड्या घोळू लागल्या. चार पाच वर्षामागे घोळत असलेली फुगडी. कितली म्हारगाय गे सायबिणी, संसार कसो करचो आमी, बाजारात गेल्यार दुडू पावना, शंभराचे नोटीक मोल ना. आणि मग तिला सामाजिक गोष्टींचे भान आले. सगळी दु:खे आपल्यावरच केंद्रित न करता तिला झपाट्यात विविध विषय सापडत गेले. सध्याच्या वातावरणात लोकांना बाधलेली कोरोना विषाणू बाधा. दारात आलेला कोरोना आणि दुखावलेली आपली मने. आमच्या मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जायला लागलेय याचे भान तिला आहे. 

खेडेगावात इंटरनेट न मिळाल्याने मुलांची शिक्षणात होत असलेली गैरसोय याचे तिला पडलेले आहे. तिने पेपर पेन उचलले आणि ती भराभर लिहू लागली. तिने दहा बारा गीते एकाच बरोबर रचून घेतली आणि एक मोकळा श्वास सोडला.

तिला खूप बरे वाटले. ही गीते, या फुगड्या सगळ्यासाठी हव्या आहेत. आमच्या वडीलधाऱ्या माणसांनी आमच्यासाठी ओठावर गात ठेवलेल्या रचनांची आज संकलने प्रसिद्ध होत आहेत. या कोरोनाच्या वातावरणात अशाही गीतांची रचना व्हायला हवी जी पुढे जाणकारांना उपयोगी पडेल. अशा सृजन निर्माणाची प्रक्रिया घडत असताना तिला आपल्या दु:खांचाही विसर पडत गेला. मोठ्या खुषीत ती चतुर्थीसाठी सज्ज झाली.

संबंधित बातम्या