Marcel Bus Stand: मासळी मार्केट, ग्रंथालय बंदच

माशेल बसस्थानक मध्यवर्ती असल्यामुळे संपूर्ण गोवाभर जाण्यासाठी, तसेच बेळगाव, सावंतवाडी, कारवारकडे जाण्यासाठीही सोयीचे आहे.
Marcel Bus Stand
Marcel Bus StandDainik Gomantak

खांडोळा: विस्तारणाऱ्या माशेल पंचक्रोशीत सुसज्ज बसस्थानकासाठी (Marcel Bus Stand) तत्कालीन सरपंच विनायक नार्वेकर व तत्कालीन पंचायत मंडळाच्या दूरदृष्टीने भूखंडाचे नियोजन करण्यात आले. त्या जागेवर बहुउद्देशीय बसस्थानक बांधण्यात आला आणि या बसस्थानकाचे दोन वेळा उद्‍घाटनही झाले, पण अद्याप या बसस्थानकाचा ‘बहुउद्देश’ साध्य झाला नाही. बसस्थानकात आत येण्यासाठी रस्ता आहे, पण बाहेर जाण्यासाठी रस्ताच नाही. एकाच गेटमधून आत-बाहेरचा खेळ सुरू आहे.

या बसस्थानकाचे ग्रामस्थांतर्फे एकदा उद्‍घाटन झाले, त्यानंतर शासकीय पातळीवर पुन्हा उद्‍घाटन झाले. त्यानंतर बसस्थानकावरून काही बस-येजा करतात. याशिवाय इतर कोणत्याही सुविधांचा लाभ प्रवाशांना होत नाही. त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ या बसस्थानकाच्या इतर सुविधांपासून वंचित आहेत. बसस्थानकावर ग्रंथालय, तिकिट आरक्षण सुविधा, आंतरराज्य बससुविधेचे नियोजन केले होते. पण अद्याप त्यासंदर्भात काहीच हालचाल दिसत नाही. शिवाय पंचायत कार्यालयाचे अद्याप स्थलांतरही झालेले नाही. फक्त उद्‍घाटन तेवढेच झाले. पंचायत कार्यालयाच्या भाड्याचा वादही कायम आहे.

Marcel Bus Stand
Goa Vaccination: दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये वाढ

माशेल बसस्थानक मध्यवर्ती असल्यामुळे संपूर्ण गोवाभर जाण्यासाठी, तसेच बेळगाव, सावंतवाडी, कारवारकडे जाण्यासाठीही सोयीचे आहे. डिचोली, सत्तरीच्या प्रवाशांसाठी माशेलमार्गे कमी अंतराचा प्रवास होते. माशेलात साखळी, वाळपई, पणजी, फोंडा, मडगाव, वास्कोपर्यंत धावणाऱ्या बसेस येतात-जातात. परंतु अद्याप येथून आंतरराज्य बसेस धावत नाहीत. अपवाद म्हणून मडगाव – बेळगावला दोन बसेस धावत होत्या. टाळेबंदीनंतर ही सुविधाही बंदच आहे. अनमोड घाट रस्ता बंद असल्यामुळे कर्नाटकपरिवहन मंडळाच्या हुबळी, धारवाड, बेळगावला जाणाऱ्या बऱ्याच गाड्या माशेलातून जातात. पण त्यापैकी एकही गाडी बसस्थानकात येत नाही. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकाबाहेर बगलमार्गावर थांबावे लागते.

माशेल बसस्थानकाभोवतीच किमान पाच बसथांबे आहेत. पण एकाही बस थांब्यावर विशेष शेडची व्यवस्था नाही. तरीसुद्धा बरेच लोक या थांब्यावर उभे असतात, ते बसस्थानकात येत नाहीत. प्रत्येक बस तेथे थांबते.

आरक्षण सुविधेचा अभाव

मडगाव, फोंडा, पणजी, वास्को, वेर्णा, साखळी, वाळपई, बेळगाव, कोल्हापूरला थेट जाण्यासाठी येथून थेट गाड्या सुरू करणे शक्य आहे. त्यासंदर्भात फलकही लावले आहेत. पण अद्याप आरक्षण सुविधा उपलब्ध नाही. कार्यालयही पूर्ण क्षमतेने सुरू केले नाही. त्यामुळे प्रवाशांना या सोयीसाठी पणजी, फोंड्याला जावे लागते. माशेलातून चोर्लामार्गे हुबळी, धारवाड, हैदराबादलाही अनेक गाड्या जातात, पण त्या गाड्या बसस्थानकात येत नाहीत.

Marcel Bus Stand
Goa Politics: ‘बिजली का जवाब पानी से’

ग्रंथालयाची प्रतीक्षा

या बस्थानकावर ग्रंथालय सुरू करण्यात येणार होते. पण अद्याप कोणतीही सुविधा निर्माण करण्यात आलेली नाही. माशेलात असलेल्या दोन्ही छोट्या ग्रंथालयात जागा कमी आहेत. तेथे वाचन कक्ष आहे, पण पुरेशी जागा नाही. त्यामुळे ग्रंथालयाच्या इतर सुविधा देता येत नाही.

भाजी मार्केटचे उद्‍घाटन करण्यात आले. परंतु मासळी मार्केटचे स्थलांतर न झाल्यामुळे तेथे सकाळी गर्दी कायम आहे. मासळी मार्केटमधील विक्रेत्यांच्या काही समस्या आहेत. त्यामुळे माशेलात दोन ठिकाणी मासळी विक्रेते बसतात. शिवाय खांडोळा महाविद्यालयाजवळच्या बगलमार्गावरही काही मासेविक्रेते बसतात. त्यामुळे त्वरित मासळी मार्केटच्या समस्या सोडविल्यास बाजारातील गर्दीचा प्रश्न निकालात निघेल. त्यासाठी पंचायत मंडळाने त्वरित कार्यवाही करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

"माशेलात सुसज्ज बसस्थानक असूनही त्याचा वापर होत नाही. शासनाने मासळी मार्केट, ग्रंथालय, आरक्षण सुविधा त्वरित उपलब्ध करायला हव्यात. त्याचप्रमाणे आंतरराज्य बस, तसेच माशेलातून राज्यातील प्रमुख शहरापर्यंतही बससेवा सुरू करायला हवी."

- फ्रान्सिस लोबो,उपसरपंच, तिवरे-वरगाव पंचायत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com